काश्मीरच्या अंतरंगात…

0
172

चिनार डायरीज्
परेश वासुदेव प्रभू

धुमसते, धगधगते काश्मीर, सुरक्षा दलांवर बेफाम दगडफेक करणारी तरुणांची टोळकी, दिवसागणिक आपल्या जवानांना लक्ष्य करणारे दहशतवादी, नाहक जाणारे निष्पापांचे बळी याचे अत्यंत भयावह, भेदक चित्रण गेले कित्येक महिने आपण वृत्तवाहिन्यांवर तिन्ही त्रिकाळ पाहतो आहोत. दिवसागणित हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहून पर्यटकांनी काश्मीरकडे यंदा पाठ फिरवली. यंदा तब्बल ५६ टक्क्यांनी पर्यटकांची संख्या कमी झाली. काश्मीरकडे येणारा पर्यटक लेह-लडाखकडे वळू लागला, अन्य सुरक्षित स्थळी जाऊ लागला. पर्यटनावर आधारित काश्मीरी अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा या सार्‍यामुळे बसला आहे. ओस पडलेली हॉटेले, रिकाम्या पडलेल्या हाऊसबोटी, व्यवसाय नसल्याने हवालदिल झालेले वाहनचालक, घोडेवाले, गाईड या सगळ्यांपुढे रोजीरोटीचा समरप्रसंग उभा ठाकला आहे. पण पर्यटकांनी भीतीने सपशेल पाठ फिरवावी एवढे भयप्रद वातावरण खरोखरच काश्मीरमध्ये आहे? वृत्तवाहिन्यांवर जे दिसते ते संपूर्ण काश्मीर खोर्‍याला खरोखरच व्यापून राहिले आहे? या प्रश्‍नांची उत्तरे आणि काश्मीरी जनतेच्या अस्वस्थतेची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्रातील निवडक ज्येष्ठ पत्रकारांनी सध्या थेट काश्मीर गाठले आहे. गोव्याचे प्रतिनिधित्व करायला मीही त्यांच्यासोबत श्रीनगर गाठले. येथे उतरल्यापासून जे दिसते आहे ते मात्र काही वेगळेच चित्र आहे. लोक अस्वस्थ आहेत, पण त्याची अनेक कारणे आहेत. हळूहळू अस्वस्थ काश्मीरची ही खरीखुरी कहाणी माझ्या डोळ्यांपुढे उलगडू लागली आहे. नव्या जाणिवा देऊ लागली आहे.
विमानतळावरून न्यायला आलेल्या इनोव्हाचालक मेहराज माझ्या एका प्रश्‍नावर सार्‍या समस्येचे सारच बोलून गेला. काश्मीरची व्यथा वेगळी आहे. काश्मीरची वेदना वेगळी आहे. फुटिरतावाद हा काश्मीरचा समग्र चेहरा नाही. ते केवळ एक अंग आहे. त्याला सहानुभूती मिळते त्यालाही कारणे आहेत. काश्मीर विकासाला वंचित आहे, रोजगाराला वंचित आहे. इथला विकास कसा रखडलाय त्याचे दर्शन वाटेतच घडले. तीन वर्षांपूर्वी काश्मीरला आलो होतो, तेव्हा एका फ्लायओव्हरचे काम चालू होते. आजही ते अर्धवट स्थितीतच दिसले. तेच धूळ भरलेले रस्ते, रया गेलेली दुकाने, गरिबीचा एक झाकोळ श्रीनगरवर पसरलेला आहे. व्हीआयपींच्या गुपकार रोडवर किंवा राजबागेत तुम्हाला तो दिसणार नाही, पण जरा गल्लीबोळ आडवे घातले की ही काजळी जाणवत राहते.
काश्मीरची परिस्थिती जेवढी टीव्हीवाले दाखवतात तेवढी भयप्रद नाही असे मेहराजचे म्हणणे. तोच नव्हे, जे काश्मीरी तरुण भेटतात ते हेच ठासून सांगतात. खुद्द काश्मीर खोर्‍यात १० जिल्हे आहेत. त्यातले केवळ तीन जिल्हे दहशतवाद प्रभावीत आहेत. त्यातही जिल्ह्यात कुठे काही घडले की त्या गावाच्या नावाऐवजी जिल्ह्याच्या केंद्राचे नाव घेतले जाते, त्यामुळे नाहक भीती निर्माण होते असे त्यांचे म्हणणे.
‘बघा इथे तुम्हाला काही भीतीदायक दिसतेय का? श्रीनगरचा उपमहापौर राहिलेला शुजा थेट लाल चौकात मला प्रश्‍न करतो. लाल चौक हा श्रीनगरचा आत्माच. पण श्रीनगरमध्ये आल्या आल्या थेट ह्या लाल चौकात आम्ही दाखल झालो आहोत. हवेत छान गारवा आहे. पाऊसही रिमझिमतोय. लाल चौकाचा सगळा परिसर लवकरच येणार्‍या रमजान ईदच्या खरेदीसाठी गजबजलाय. फक्त या उत्ङ्गुल्ल वातावरणाला असलेली अवस्थतेची किनार ठायी ठायी उभे असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान दाखवून देतात. त्यांची करडी नजर, हातातील शस्त्रे आणि चिलखती गाड्या जरब बसवून असल्या तरी त्यांची उपस्थितीच वातावरण तणावपूर्ण करते असे शुजाचे म्हणणे. पर्यटकांना काश्मीरींपासून धोका नाही हे जो तो सांगतो आहे. जम्मू काश्मीर पर्यटन विकास महामंडळाच्या पदाधिकार्‍यांपासून रस्त्यावरच्या आम नागरिकांपर्यंत. लाल चौकात आम्ही उतरताच सर्वप्रथम सामोरे आले ते स्थानिक दुकानदार, ‘शाल घेता का? दुकानात येता का?’ अशी त्यांची आर्जवे चालतात, पण आम्ही खरेदीसाठी आलेलो नाही हे कळताच ते काढता पाय घेतात.
लाल चौकात पहारा देणार्‍या जवानांत एक मराठी माणूस निघतो. त्याचे नाव संतोष मुसमाडे. तो नुकताच काश्मीरमध्ये पोस्टींगवर आलाय. पूर्वी गोंदियात होता. लाल चौकात सध्या त्याची ड्यूटी आहे.
मराठी बोलणारे माणूस भेटल्याने तो आनंदतो. पण स्थानिक काश्मीरींबद्दल त्याचे मत चांगले नाही. ‘‘हे लोक आपले नाहीत’’ असे त्याला वाटते. त्याला कारण परवाच पाकिस्तानकडून भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर याच लालचौकात रात्रभर कसे फटाके फुटले ते त्याच्या डोळ्यांसमोर आहे. खरे तर मोजके म्होरके जमावाच्या मानसिकतेचा फायदा उठवतात. आम
काश्मीरी त्यात भरडला जातो आहे.
शुजाने श्रीनगरच्या सलोख्याचा एक दाखला दिला. जुन्या श्रीनगरमध्ये – ज्याचा ‘डाऊनटाऊन’ असा नेहमी उल्लेख होतो – तिथे पिढ्यानपिढ्याच्या सुवर्णकारागिरांची दुकाने आहेत, विशेष म्हणजे ते मराठी आहेत. त्यांच्याकडे घेऊन जायची त्याची तयारी आहे. खाली जाऊन बघा, हवाल चौकात बिहारी मजुरांचे तांडे दिसतील. याच श्रीनगरात हे हिंदू मजूर रोजीरोटी कमावतात. सगळा माहौल नेते मंडळी खराब करतात! तो रोखठोक सांगून जातो. एका वेगळ्या श्रीनगरचे येथे दर्शन घडतेय. रोजच्या
तुफानी दगडफेकीपेक्षा हे वेगळे आहे. ते अवस्थ आहे, जरूर आहे, पण त्याची कारणे वेगळी आहेत, व्यथा वेगळ्या आहेत. खरेखुरे काश्मीर आमच्यापुढे हळूहळू उलगडू लागले आहे.