विक्रमादित्य ‘पंकज’

0
267

– शब्दांकन ः नीला भोजराज

विक्रमादित्य पंकज अरविंद सायनेकर… हो! पंकज नव्हे विक्रम… त्याचं नाव विक्रम असायला पाहिजे… कारण केवळ १२ तासांमध्ये २०१५ सूर्यनमस्कार घालण्याचा त्यानं जागतिक विक्रम केलाय… आणि असे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत… भविष्यातही तो करेलच. तर कसं शक्य झालं त्याला हे सर्व… पाहू या त्याच्याच शब्दात…

प्र. १ ः सूर्यनमस्कार मॅराथॉन किंवा विक्रम करण्याची कल्पना तुला केव्हा सुचली? किती वर्षांपासून तू योगाचा सराव करीत आहेस?

उत्तर ः मी जवळ जवळ २००७ सालापासून योगाचा सराव करीत आलो आहे. त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार घालणे मला अतिशय आवडत होते. त्यावेळी मी शाळेत असताना आमचे शारीरिक शिक्षण प्रमुख शिक्षक श्री. संदेश बाराजणकर हे नेहमी निराळ्या पद्धतीच्या स्पर्धा घ्यायचे. तिथेच माझ्या डोक्यात ‘सूर्यनमस्कार मॅराथॉन’ची कल्पना आली. त्यावेळी शाळेत वार्षिक क्रीडा कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या सूर्यनमस्काराच्या स्पर्धेत मी ३ तासांमध्ये ७२० सूर्यनमस्कार घातले होते. आणि आज काही दिवसांपूर्वी याच वर्षी, १४ जानेवारीला मी केवळ ४ तासांमध्ये १४९४ सूर्यनमस्कार घालण्यात यशस्वी झालो.

प्र. २ ः १२ तासांत २०१५ सूर्यनमस्कार काढण्याचा जागतिक विक्रम जो केलायस, ते तुला कसे शक्य झाले? तुला कोणापासून प्रेरणा मिळाली?
उत्तर ः जेव्हा मी जागतिक विक्रम केला त्यावेळी वातावरणात भयंकर उष्णता होती, त्यामुळे मी लवकरच थकून जात होतो. पण तरीही, मी सूर्यनमस्कार घालणे चालूच ठेवले कारण माझी आई – सौ. विशाखा सायनेकर, माझ्यासमोर बसलेली होती. स्वतःच्या क्षमतेवर सुद्धा माझा पूर्ण विश्‍वास होता आणि म्हणूनच १२ तासांचे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो. मी १२ तास सूर्यनमस्कार घालण्याचे ठरवलेलेच होते.
प्रेरणेबद्दल विचाराल तर मी असे म्हणेन की आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशा गोष्टी निश्‍चितपणे असतात ज्या आपल्याला साचेबद्ध जीवनाच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा देत असतात.

प्र. ः तू तुझे शिक्षण म्हणजेच अभ्यास आणि योगा या दोहोंमधले संतुलन कसे काय साधले आहेस?
उत्तर ः ज्याप्रमाणे आधी मी सांगितले, मला सूर्यनमस्कार अतिशय आवडतात- त्यातील प्रत्येक स्थिती किंवा आसन, प्रत्येक मंत्र मला आवडतो. तसेच सूर्यनमस्कारामध्ये आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. यामध्ये फक्त फिजिकल म्हणजे शारीरिकच नाही तर आपल्या श्‍वसन संस्थेलासुद्धा फायदा होतो. जो सूर्यनमस्काराचा व्यायाम करतो त्याला अन्य कुठलाच व्यायाम करण्याची गरज नसते. त्यांमुळेच मला सर्वकाही करता येते.

प्र. ५ ः सूर्यनमस्काराशिवाय आणखीही कुठले आसन तुला आवडते का? कोणते?
उत्तर ः सूर्यनमस्काराशिवाय मला ‘शिर्षासन’ देखील आवडते. त्याला ‘आसनांचा राजा’ असे म्हणतात. त्यासाठी आपली मान आणि हात बलवान असणे गरजेचे असते. तसेच त्याला आपल्या शरीराची संतुलन करण्याची शक्ती म्हणजेच बॅलेन्सिंग पॉवर उत्तम असण्याची आवश्यकता असते. मला इतरही काही आसनं आवडतात – जसे मयुरासन, मत्स्यासन, बकासन इत्यादी जी थोडी आव्हानात्मक आहेत.
तसेही मी सांगितलेच आहे की मला सगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडतात, त्यामुळे असा कुठलाच व्यायाम प्रकार नाही जो मला आवडत नाही!

प्र. ६ ः एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा विक्रमाआधी तू काय तयारी करतोस?
उत्तर ः प्राथमिकतः मॅराथॉन हा माझा अतिशय प्रिय विषय आहे. फक्त शर्यत किंवा स्पर्धेपुरताच नाही तर जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी या जास्त काळपर्यंत टिकणार्‍या असतात. म्हणून याने मला माझ्यातील क्षमता – दोन्ही म्हणजे शारीरिक व मानसिक वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
आता सरावाबद्दल बोलायचे झाले तर दररोज मी एक तास सराव करतोच. पण विक्रम करण्याच्या दृष्टीने सराव करायचा होता त्यावेळी तर मी दिवसातून चार तास सराव करत असे.

प्र. ः तुझे सर्वांत मोठे प्रेरणास्थान कोणते?
उत्तर ः माझे शिक्षक संदेश बाराजणकर हे माझे सर्वांत मोठे प्रेरणास्थान! जरी ते शारीरिक शिक्षक होते, ते योग सुद्धा उत्कृष्टपणे शिकवतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी योग करण्यास प्रवृत्त झालो. तसेच बाबा रामदेव सुद्धा माझे मोठे प्रेरणास्थान आहे, ज्यांनी योग क्षेत्रात फार मोठी क्रांति घडवून आणली आहे. मी त्यांचा मोठा प्रशंसक आहे.
त्याशिवाय माझे आईवडील – ज्यांनी मला वेळोवेळी – जशी गरज असेल तसे प्रोत्साहन आणि सहकार्य केले आहे त्यामुळेच मी हे करू शकलो.

प्र. ८ ः तुझ्या कुटुंबात म्हणजे आजी-आजोबा किंवा आई-वडील यांपैकी कुणी योग विषयात पारंगत होते का? नियमित सराव करत होते का?
उत्तर ः जसं मी सांगितलं की मी १३ वर्षांचा होतो त्यावेळपासून मी योगा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझ्या कुटुंबातील कुणीही योगाचा सराव करीत नव्हते.

प्र. ९ ः गोव्यातील तुझा अनुभव कसा आहे?
उत्तर ः मला एक गोष्ट सांगाविशी वाटते की योग हा विषय गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यासुद्धा अतिशय आवडीचा आहे. त्या घरीच दररोज योगाचा नियमित सराव करतात. सूर्यनमस्काराची तर त्यांनाही लहानपणापासूनच आवड होती.

प्र. १० ः गोव्यातील तरुण पिढीसाठी तू काही करतो आहेस का?
उत्तर ः गोव्यातील तरुण पिढीबद्दल बोलायचे झाल्यास चित्र फासरे आशादायी नाही. पण तरीही पाचपैकी दोन तरुणांना याची आवड दिसून येते. मी सूर्यनमस्कार शिकवण्यासाठी गोव्यात नेहमी एका आठवड्याचे किंवा दोन-दोन दिवसांचे सत्र किंवा प्रशिक्षण वर्ग घेतो आहे.
शिवाय पतंजली योगपीठातर्फे गोव्यात ठिकठिकाणी योगवर्ग चालू असतात ज्यामध्ये प्रशिक्षकांतर्फे सूर्यनमस्कारांचे महत्त्व सांगितले जाते. पण त्या विषयात अजून जागृती करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

प्र. ११ ः आत्ता तू अहमदाबादला आहेस असं तुझे वडील श्री. अरविंद सायनेकर यांच्याकडून कळलं. तर तिथे नेमका कोणता कार्यक्रम आहे?
उत्तर ः अहमदाबाद येथे पतंजली योगपीठ आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने योगाचे सत्र आयोजित केलेले आहे. त्यामध्ये मी सूर्योदय ते सूर्यास्त असे तेरा तास जास्तीत जास्त सूर्यनमस्कार काढण्याचा नवीन उपक्रम करणार आहे.