बिहारचे राज्यपाल कोविंद रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

0
120

अखेर भाजपने रालोआतर्फे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना सांगितले की, कोविंद यांच्या या निवडीबाबत आघाडीतील घटक पक्षांना कळविण्यात आले आहे. कोविंद येत्या २३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडीची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांनाही दिली असल्याचे शहा यांनी सांगितले.
त्याआधी भाजपच्या संसदीय समितीची काल बैठक घेण्यात आली व त्यात कोविंद यांच्या उमेदवारीवर अंतिम मोहोर उठविण्यात आली. दलित नेते असलेले कोविंद हे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहेत. १२ वर्षे राज्यसभा खासदार राहिलेल्या कोविंद यांच्या नावाचा विचार या उमेदवारीसाठी होण्याआधी आम्ही सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर त्याविषयी घटक पक्षांना माहिती दिली असे शहा यांनी सांगितले.
भाजपतर्फे राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. त्यात प्रारंभी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांचा त्यात समावेश होता. तर भाजपचा घटक पक्ष शिवसेनेने सरसंघचालक मोहन भागवत तसेच स्वामीनाथन यांची नावे पुढे केली होती. रविवारी अमित शहा यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. मात्र त्यावेळी शहा यांनी कोविंद यांचे नाव घेतले नव्हते. त्यामुळे नाव निश्‍चितीनंतर शिवसेनेची भूमिका कळवू असे शहा यांना ठाकरे यांनी सांगितले होते.

भाजपकडून उमेदवार निवड
एकतर्फी : सीताराम येच्युरी

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची निवड भाजपने एकतर्फीपणे केल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी काल केली.
भाजपच्या या कृतीनंतर आता विरोधी पक्ष आपली या संदर्भातील रणनीती ठरविण्यासाठी येत्या दि. २२ रोजी बैठक घेणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार आहे.
राष्ट्रपतीपदासाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात आतापर्यंत केवळ एक वेळेचा अपवाद सोडल्यास निवडणूक झाली आहे असा इतिहास आहे. त्यामुळे या विषयावर आता विरोधी पक्ष निर्णय घेणार असल्याचे येच्युरी यानी सांगितले. राष्ट्रपती निवडण्याच्या इतिहासात नीलम संजीव रेड्डी यांचीच निवड बिनविरोध झाली आहे. १९७७ ते १९८२ या काळात ते राष्ट्रपती होते.
आपला उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर रालोआ विरोधी पक्षांकडे बोलतील असा प्रस्ताव होता. मात्र तसे झालेले नाही. त्यांनी एकतर्फीपणे उमेदवार ठरविला. असे येच्युरी यांनी पत्रकारांना
सांगितले.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत एकमत घडवून आणण्यासाठी निवडलेल्या त्रिसदस्यीय समितीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू एक सदस्य होते. आता त्यांनी आपल्याला रालोआच्या उमेदवार निवडीची माहिती दिली असे येच्युरी म्हणाले. आता विरोधी पक्ष एकत्र येऊन समान निर्णय घेणार आहत असे त्यांनी स्पष्ट
केले.