कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही : मुख्यमंत्री

0
143

कोणत्याही परिस्थितीत आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जाऊ शकत नाही; परंतु कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पणजीतील क्रांतीदिनाच्या कार्यक्रमावेळी सांगितले.
स्वच्छ भारत योजनेच्या बाबतीत सरकार अत्यंत गंभीर आहे. जुलै २०१८ पर्यंत गोवा प्लास्टिकमुक्त करण्यात येणार असून त्याची सुरुवात १ जुलैपासून सुरू होईल असे ते म्हणाले.
सरकारतर्फे बसेसमध्येही कचर्‍यापेट्या उपलब्ध केल्या जातील. प्लास्टिकमुळेच स्वच्छता अधिक बिघडते. पातळ प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याच्या कायद्याची सरकार अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मयेवासियांचा प्रश्‍नही पूर्णपणे सोडविण्याचे पर्रीकर यांनी आश्‍वासन दिले.
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्याची प्रशंसा करताना स्वच्छ भारत योजनेखाली राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाचे स्वागत केले. येथील वास्तव्यात आपण कोकणी, मराठी साहित्य वाचनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. पर्रीकर व राज्यपाल यांनी स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली व त्या शूर वीरांच्या बलिदानामुळेच देश स्वतंत्र झाला व त्यांच्या स्वप्नांची फळे सर्वजण चाखत असल्याचेही सांगितले. यावेळी पांडुरंग कुंकळकर व चंद्रकांत पेडणेकर यांची स्वातंत्र्य सैनिक संघटनेचा नेत्यांची भाषणे झाली.