टी. बी. कुन्हा यांचे तैलचित्र विधानसभेत लावण्याकडे दुर्लक्ष

0
114

>> एदुआर्द फालेरो यांचा सरकारवर आरोप

गोवा मुक्ती लढ्यात टी. बी. कुन्हा यांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांचे एक तैलचित्र गोवा विधानसभेत लावण्यात यावे अशी मागणी आपण राजेंद्र आर्लेकर हे सभापती असताना त्यांच्याकडे केली होती. मात्र, सदर मागणी अजून पूर्ण झाली नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
टी. बी. कुन्हा यांनी गोवा मुक्ती लढ्यावर एक सुंदर पुस्तक लिहिलेले आहे. मात्र, सध्या ते पुस्तक उपलब्ध नाही. हे पुस्तक पुनर्मुद्रीत करण्यात यावे व ते अभ्यासक्रमात लागू करावे, अशीही मागणी आपण केली होती, असे ते म्हणाले. टी. बी. कुन्हा यांच्याच सारख्या थोर नेत्याचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याची गरज असून त्यातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळू शकेल, असे गोवा क्रांती दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना फालेरो म्हणाले.
सरकारी शाळा सुधारा
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांची स्थिती दयनीय असून या शाळांची सुधारणा होण्याची गरज आहे. सरकारी प्राथमिक शाळांतील साधनसुविधा वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सोयीं अभावी चांगले शिक्षण मिळू शकत नाही. काही शाळांनी वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांसाठी एकच वर्ग अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांसाठी शौचालये नाहीत. बसायला बाक नाहीत अशीही स्थिती असल्याचे ते म्हणाले. सरकारी प्राथमिक शाळांत शिकणारी मुले ही गरीब पालकांची असून सोयींच्या अभावामुळे एका प्रकारे त्यांच्यावर अन्यायच होत असल्याचे फालेरो म्हणाले.
योग शिक्षणाची जबाबदारी
पतंजलीकडे सोपवू नका
शाळांमध्ये योग शिक्षण सुरू करण्याची योजना चांगली आहे. मात्र, रामदेवबाबा यांच्या पतंजलीकडे त्याची जबाबदारी सोपवू नये. कारण ते धर्मनिरपेक्ष विचारांचे नसल्याचे फालेरो यांनी नमूद केले. सरकार शाळांत मूल्याधिष्ठीत शिक्षण सुरू करू पाहत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ते धर्मनिरपेक्ष असायला हवे, असे मतही फालेरो यांनी व्यक्त केले.