ट्रक – स्कूटर अपघातात मुळगाव येथे युवक ठार

0
79

मुळगाव, डिचोली हमरस्त्यावर गुरुवारी रात्री एका ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने हरगो सहदेव गावकर (वय २७) हा शेळपे, गवाणे – सत्तरी येथील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेली पोलीस कॉन्स्टेबल रंजना गावस (सत्तरी) ही युवती गंभीर जखमी झाली. तिच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हरगो गावस व रंजना जीएयूजे ९५८६ या ऍक्टिवा दुचाकीवरून जात होते. मुळगाव सुपरमार्केट परिसरात समोरून येणार्‍या एमएच – १६ – १३८९ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात हरगो याला गंभीर मार लागला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला डिचोली आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऍक्टिवाच्या मागे बसलेली पोलीस कॉन्स्टेबल संजना गावस गंभीर जखमी झाली. तिला गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. ती हणजुण पोलीस स्थानकावर कामाला
आहे. पोलिसांनी हरगो गावकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणी नंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक संतोष उमप्पा याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.