गुंडगिरी प्रकरणी पोलिसांना जबाबदार धरणार : मुख्यमंत्री

0
100

>> मेरशीतील हल्ल्यानंतर सज्जड इशारा

बुधवारी मेरशी येथे स्थानिक गुंडांकडून पर्यटकांवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित भागातील पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

मेरशी सारख्या गैर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांचे असते. अन्य भागातील पोलिसांच्या तुलनेत येथील पोलीस तेवढे कडक नसल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारांमुळे राज्याच्या प्रतिमेवर विनाकारण परिणाम होतो. आपले सरकार गुंडगिरीचे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मेरशी येथे घडलेल्या घटनेसंबंधी आपण पोलिसांना तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले असून अशा गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
राज्यात वेगवेगळ्या निवडणुका होतात. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने विकास कामांना खीळ बसतो. त्याचा नोकरशहाही फायदा घेतात. सरकार त्यावर गंभीरपणे विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बुधवारी मेरशी येथे पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी वेळेवर पोचले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वरील भूमिकेमुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे. मेरशी येथे स्थानिक गुंडांनी तलवारी व चॉपरसह पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात १४ प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी चार गुंडांना अटक केली आहे.