पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार

0
54

>> खासदार शांताराम नाईक

पक्षश्रेष्ठींनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारणार असल्याचे राज्यसभा खासदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शांताराम नाईक यांनी काल सांगितले. आपणाला पदाची लालसा नाही. पण पक्षश्रेष्ठी व अन्य स्थानिक नेत्यांनी आपणावर जर ती जबाबदारी सोपवली तर ती आपण आनंदाने घेणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
काही स्थानिक नेत्यांनी मी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा माझ्याशी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या मताला मी मान देत आहे. पण तसे असले तरी जोपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून तसा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आपण कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे नाईक यांनी बोलताना स्पष्ट केले.
आपण कोणत्याही पदावर असो किंवा नसो. आपण सदैव पक्षासाठी काम करीत राहणार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक १७ जागा मिळूनही त्यांना राज्यात सरकार स्थापन करता आले नाही याबद्दल पक्षावर व पक्षाच्या काही नेत्यांवर लोकांकडून जी कडक टीका झाली त्याविषयी बोलताना त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. ते म्हणाले की एखादे नवे सरकार स्थापन करण्यास एक-दोन दिवस हे लागतातच. निवडून आलेल्या आमदारांना बैठकीत आपला विधीमंडळ नेता निवडावा लागतो. एका रात्रीत काही सरकार स्थापन होत नसते. मात्र, स्वतःकडे बहुमत नसलेल्या भाजपने एका रात्रीतच सरकार स्थापन केल्याचे ते म्हणाले.