यंदा बारा सरकारी शाळा बंद

0
118

>> ७५-८० प्राथमिक शिक्षक अतिरिक्त

राज्यातील सरकारी शाळांच्या संख्येत घट झाल्याने यावर्षी ७५ ते ८० प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सामावून घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. यावर्षी एकूण १२ शाळांना टाळे ठोकावे लागले असून १४ शाळांना अन्य नजिकच्या शाळांना जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.
काही शिक्षक सीसीएल, प्रसुती रजा, आजारी अशा रजांवर गेलेले आहेत. अशा शाळांमध्ये जादा ठरलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे सांगण्यात आले. काही शिक्षक दुर्गम भागात जाऊन काम करण्यास राजी नसतात. परंतु अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आपली नोकरी वाचविण्याचे झाल्यास अन्य पर्याय राहाणार नाहीत. दर वर्षी दहा ते पंधरा सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत आहेत. सरकारी शाळांतील शिक्षकांचा दर्जा खालावलेला असतो, अशी पालकांची मानसिकता झाल्याने पालक आपल्या पाल्यांना शहरातील खाजगी शाळांमध्येच पाठविणे पसंत करतात. त्याचबरोबर राज्यातील मुलांच्या जन्माचे प्रमाणही कमी झाले आहे. या अनेक कारणांमुळे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
यावर्षी बंद पडलेल्या शाळा बार्देश, पेडणे व ङ्गोंडा तालुक्यातील आहेत. तर पेडणे, बार्देश व मुरगाव तालुक्यातील सर्वाधिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षण खात्याने मंगळवारी राज्यातील सर्व भाग शिक्षणाधिकारी व अन्य संबंधितांची बैठक घेऊन शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शिक्षणाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीकोनातही चर्चा करण्यात आली. दर्जा वाढविण्यासंबंधीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर दिली असून प्रत्येक मुख्याध्यापकांना शाळा निश्‍चित करून दिल्या जातील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या बाबतीत दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, त्यादृष्टीकोनातून शिक्षण संचालक श्री. भट यांनी गंभीरपणे पाऊले उचलली आहेत.