दहावी-बारावी परीक्षेतील क्रीडा गुण वेगळे दाखवा

0
109

>> मानव संसाधन मंत्रालयाची शिफारस

दहावी व बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत क्रीडापटूंसाठी असलेल्या गुणांचा अन्य विषयांसाठीच्या गुणांमध्ये समावेश न करता ते गुण पत्रिकेवर वेगळे दाखविण्याची शिङ्गारस मानव संसाधन मंत्रालयाने गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाला केली आहे. त्यामुळे यासंबंधी सरकारला निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जुझे रिबेलो यांनी दिली.
मंडळाने वरील माहिती शिक्षण खात्यालाही दिली आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर मंडळाला त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल. परीक्षेसाठी असलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या गुणांमध्येच क्रीडा गुणांचा समावेश केल्यास क्रीडा गुण किती मिळाले हे कळणे कठीण होते. ते कळले पाहिजे असे मानव संसाधन मंत्रालयाचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत मंत्रालयात झालेल्या शालांत मंडळाचे अध्यक्ष व अन्य संबंधितांच्या बैठकीत वरील शिङ्गारस करण्यात आली होती. मंडळाच्या पुढील बैठकीसमोर हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, क्रीडा गुणांप्रमाणेच संगीत, अन्य प्रकारच्या कला क्षेत्रात कामगिरी बजावणार्‍या विद्यार्थ्यांनाही वरील परीक्षांसाठी गुण देण्याच्या प्रस्तावावर कला आणि संस्कृती खात्याने अभ्यास सुरू केला आहे. वरील गुण देण्यासाठी निकष निश्‍चित करणे बरेच कठीण असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नावर वरील प्रस्तावावर जनतेचीही मते अजमावावी लागतील, असे त्यांनी म्हटले होते. टक्केवारी वाढवून दाखविण्यासाठी क्रीडा गुणांचा वापर करण्याच्या धोरणास अनेकांचा विरोध आहे. यापूर्वी क्रीडागुण नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठीच वापरले जात होते.

शैक्षणिक कृती कार्यक्रम
ठरवण्यासाठी आज बैठक
शिक्षण क्षेत्रातील चालू वर्षातील कृती कार्यक्रम निश्‍चित करण्याच्या पार्श्‍वभूमीवर आज शिक्षण खात्याने भागशिक्षणाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. यावर्षी किती सरकारी शाळा बंद पडल्या त्याची माहिती आज बैठकीनंतर उपलब्ध होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी झाली याचा संपूर्ण तपशील संबंधित अधिकारी खात्याला सादर करतील. माध्यान्ह आहार तसेच अन्य वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत बैठकीत ऊहापोह होईल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शिक्षण अधिकार्‍यांची बैठक घेऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर कृती कार्यक्रम तयार करण्यास खात्याला सांगितले होते. यासंबंधी मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्याची सूचनाही पर्रीकर यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व आहे.