लाचखोर अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना जामीन मंजूर

0
113

लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले पणजीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेटये यांना काल पणजी विशेष न्यायालयाने १ लाख रु. च्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला.
यापूर्वी पणजी सत्र न्यायालयाने साबाजी शेट्ये यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे त्यांची रवानगी लाचलुचपत विरोधी पोलिसांच्या कोठडीत करण्यात आली होती. तत्पूर्वी, आपल्या छातीत दुखत असल्याचे सांगून शेटये हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, गेल्या गुरुवारी तेथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. नंतर त्यांची रवानगी लाचलुचपत विरोधी पोलिसांच्या कोठडीत करण्यात आली होती. तेथे पोलिसांनी लाच प्रकरणी त्यांची जबानी घेतली होती.
गेल्या ६ जून रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचारविरोधी पथकाने पुराव्यांसह अटक केली होती. स्फोटक पदार्थांच्या गोदामांना दिलेल्या नाहरकत दाखल्यांचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर सौदा ९५ हजारांवर पक्का झाल्यानंतर पहिला हप्ता घेताना त्यांना पकडण्यात आले होते.
निरीक्षक ङ्ग्रान्सिस कोर्त हे या प्रकरणी तपासकाम करीत असून आता पणजी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शेटये यांना दिलासा मिळाला आहे.