गोमेकॉच्या निवासी इमारतीचा भाग कोसळला

0
103

>> सुदैवाने आतील पाच कुटुंबे सुखरूप

मुसळधार पावसामुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या निवासी इमारतीचा जीर्ण कोसळला. ही दुर्घटना काल पहाटेच्या दरम्यान घडली. या इमारतीत गोमेकॉत कामाला असलेल्या कर्मचार्‍यांची पाच कुटुंबे राहत असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले.
काल पहाटे बांबोळी येथील गोमेकॉचे कर्मचारी राहत असलेल्या एका जुन्या इमारतीचा दर्शनी भाग कोसळून पडल्याच्या आवाजाने झोपेत असलेल्या लोकांना जाग आली. त्यावेळी बाहेर धो धो पाऊस पडत होता. जाग आलेल्या लोकांनी वसाहतीतील लोकांना जागे केले. सगळे सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
सकाळी इमारतीचा काही भाग कोसळल्याची बातमी सर्वत्र पसरताच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जवळपासच्या लोकांनी दुर्घटनास्थळी गर्दी केली होती. सदर इमारत बरीच जुनी असून आवश्यक ती डागडुजी न करण्यात आल्याने ती धोकादायक बनली आहे. त्यामुळे या इमारतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांना जीव मुठीत धरून येथे रहावे लागते.