टीम इंडिया दिमाखात उपांत्य फेरीत

0
99

चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील काल झालेल्या निर्णायक साखळी सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून धुव्वा उडवीत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताची टक्कर बांगलादेशबरोबर होणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध साखळी सामन्यात तब्बल तीनशेहून धावा करून पराभूत व्हावे लागल्याने टीम इंडियासाठी कालच्या सामन्यात ‘जिंकू किंवा मरू’ अशी स्थिती होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या शिलेदारांनी भेदक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि जबाबदार फलंदाजी अशा सांघिक बळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला.
दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर डी’कॉक व हशिम अमला यांनी चांगली सुरुवात केल्यावर टीम इंडियाचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन यांनी अमलाला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. तद्नंतर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांच्या धारदार गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांची सुंदर साथ मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १९१ धावांमध्ये आटोपला.
आफ्रिकेने समोर ठेवलेले माफक आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या फॉर्मात असलेला रोहित शर्मा १२ धावा काढून लगेच परतला. त्यानंतर शिखर धवन (७८) बाद होेण्यापूर्वी धवन-विराट जोडीने १२८ धावांची भागीदारी रचत विजय खेचून आणला. विराटने नाबाद ७६ धावांची खेळी साकारली. भारताला ५ धावांची गरज असताना युवराजने (नाबाद २३) षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.