वाळपईत कॉंग्रेसतर्फे सत्यविजय नाईक?

0
95

वाळपई मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे निवडणूक लढवणार असल्याने कॉंग्रेसतर्फे सदर मतदारसंघातून सत्यविजय नाईक यांना उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, सत्यविजय नाईक यांनी भाजपचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास ते शक्य होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सत्यविजय नाईक यांना ही पोटनिवडणूक लढवण्यास रस असल्यास कॉंग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत वाळपई मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार विश्वजीत राणे यांच्याविरोधात भाजपतर्फे सत्यविजय नाईक यांनी निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाळपई मतदारसंघातून विजयी झालेले कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत राणे यांनी राज्यात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सध्या रिक्त झालेल्या ह्या मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असून ह्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडे वाळपईत म्हणावा तसा उमेदवार नसल्याने सत्यविजय नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाने विचार करावा, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्याबाबत एकमत झाल्यास सत्यविजय नाईक यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.