जेटी – हार्बर येथील ३५ घरे खाली करा

0
56

>> एमपीटीने घरमालकांना नोटिसा बजावल्याने खळबळ

एमपीटीने जेटी, हार्बर येथील ३५ घर मालकांना तीन महिन्यांत घरे खाली करावीत अशी नोटीस बजावल्याने घरमालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. पोर्तुगीजकालीन असलेली घरे खाली करण्यासाठी एमपीटी कोणत्या कायद्याने नोटिसा बजावू शकतात असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे.
एमपीटीने मुरगाव बंदराच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. खारीवाडा जेटी ते स्मशान भूमीपर्यंत विस्तारीकरण प्रकल्पाचा ध्यास घेतल्यानंतर आता हार्बर येथील टेकडीवरील घरे तसेच जेटी येथील खाप्रेश्‍वर देवळाजवळील घरमालकांना नोटिसा बजावून ९० दिवसांत घरे खाली करा अन्यथा १९७१ सालचा नियम अंमलात आणून जबरदस्तीने घरे खाली केली जातील असा इशारा नोटीसीद्वारे दिला आहे. त्यामुळे येथील ३५ घरमालकांमध्ये खळबळ माजली आहे.
एमपीटीने बजावलेल्या या नोटीसीची धास्ती घेऊन येथील घरमालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घरे पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात आहेत. त्यावेळी मुरगाव बंदरात ‘सदन रेल्वे’चा कारभार होता. या रेल्वेत काम करणार्‍या लोकांची इथे घरे होती. तर एमपीटी गोवा मुक्तीनंतर येथे सुरू झाली. त्यामुळे एमपीटी कसा काय आपला हक्क या जागेवर दावा करू शकते असा सवाल लोक करीत आहेत. एमपीटी येण्यापूर्वीपासून तिथे घरे असल्याचे पुरावे लोकांकडे आहेत. सदर घरमालक मुरगाव पालिकेला कायदेशीर घरपट्टी देत असून त्यांच्या वीज, पाणी जोडण्या कायदेशीर आहेत. मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणाने हैराण झालेल्या जनतेने तसेच एमपीटीच्या विस्तारीत प्रकल्पांना होत असलेला विरोध याचा धसका एमपीटीने घेतला असून आता त्यांनी येथील नागरिकांची छळवणूक करण्याचे षडयंत्र रचल्याचा नागरिकांकडून संशय व्यक्त होत आहे.