श्री साई समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने…

0
142

– शशांक मो. गुळगुळे (मुंबई)

श्री साईबाबांनी विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली होती त्यामुळे यंदाच्या (२०१७) विजयादशमीपासून ते २०१८ च्या विजयादशमीपर्यंत समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार असला तरी या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बरेच लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा निर्णय साई संस्थानच्या विश्‍वस्तांनी घेतला असून यातील काही उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याविषयी…

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यामुळे, त्यांच्या तेथील समाधीमुळे आज जागतिक पातळीवर माहीत झाले आहे. या ठिकाणास रोज हजारोंच्या संख्येने भक्त भेट देतात. सध्या तेथे आंध्र प्रदेशातून येणार्‍या भक्तांची संख्या फार मोठी आहे. भारतातील आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, मुंबईतील सिद्धी विनायक व शिर्डी या देवस्थानांचे उत्पन्न भारतातील कित्येक नगरपालिकांच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
साईबाबांनी विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली होती त्यामुळे यंदाच्या (२०१७) विजयादशमीपासून ते २०१८ च्या विजयादशमीपर्यंत समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार असला तरी या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बरेच लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा निर्णय साई संस्थानच्या विश्‍वस्तांनी घेतला असून यातील काही उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
साईसेवक योजना
श्रीसाईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येतात. तसेच राज्यातून मुंबई, पुणे, नाशिक, शहापूर, भिवंडी, औरंगाबाद, अहमदनगर, जळगांव, धुळे यादी ठिकाणांहून व इतर राज्यांच्या कानाकोपर्‍यातून संपूर्ण वर्षभर शेकडो पदयात्री पालख्या घेऊन शिर्डीत येत असतात. यांपैकी अनेकांनी संस्थानाकडे सेवेची विनंती केलेली आहे. शेगावच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्याचा संस्थानचा मानस असून श्रीसाईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढविणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. श्रीसाईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साईबाबा संस्थानाला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. यामुळे पालखीसोबत येणार्‍या पदयात्री भाविकांना ‘साईसेवक’ हा सन्मान देण्याचा आणि साईंची सेवा करण्याची संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे.
यासाठी पालखीसोबत येणार्‍या साईभक्तांनी २१ व्यक्तींचा एक गट तयार करून त्यांची नोंदणी संस्थानाकडे करायची आहे. या गटामध्ये २० सदस्य व एक प्रमुख राहील. या गटाला वर्षातून फक्त सात दिवस सेवा करण्याची संधी दिली जाईल. अशा सुमारे दहाहजार पाचशे साई सेवकांची मदत श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षात होणार असून ही सेवा करण्याचा पहिला मान पालखीसोबत येणार्‍या पदयात्री भाविकांना देण्यात येईल. ही सेवा साईसेवकांनी मोफत द्यायची आहे. संस्थानच्या वतीने साईसेवकांची निवास, भोजन, नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल.
या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या संमेलनात प्रत्येक पालखीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेले असून साकुरी येथील सिद्ध संकल्प मॅरेज हॉल येथे १४ जून रोजी सकाळी १० वाजता हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आय.ए.एस. अकादमी
साईधाम ट्रस्ट विरारचे काशिनाथ पाटील यांनी शिर्डी नजीक असलेल्या साईपालखी निवारा येथील दोन कोटी रुपये किमतीच्या दोन इमारती संस्थानाला दान दिल्या आहेत. या देणगीत मिळालेल्या जागांवर आय.ए.एस.च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी उभारण्यात येणार आहे. एका बॅचमध्ये शंभर जणांना प्रवेश देण्यात येणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. देशभरातून नामांकित प्रशिक्षक येथे येऊन, या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच या ठिकाणी प्रशिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणार्थींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना शिक्षण, निवास, भोजन आदी सुविधा निःशुल्क मिळणार आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर यास पात्र असून यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह श्रीसाईबाबा संस्थानाशी संपर्क साधावा. या अकादमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित मागासवर्गीय तसेच आदिवासी, वंचित, खेडोपाडी राहणारा शेतकरी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे अशा शेतकर्‍यांच्या मुलांना लाभ होईल. या अकादमीच्या गव्हर्नर कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
श्रीसाईबाबा पादुका दर्शन सोहळा
श्री साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रासह देश-विदेशात उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच बाबांची महती सातासमुद्रापार पोचविण्यासाठी साईबाबांच्या पादुका जगभरातील २५ देशांमध्ये साईभक्तांच्या दर्शनाकरिता नेण्यात येणार आहेत. तसेच विशेष साईरथाची निर्मिती करण्यात येणार असून, श्री साईबाबांच्या पादुका महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये साईरथाच्या माध्यमातून पादुका दर्शन सोहळ्याकरिता नेण्यात येणार आहेत.
साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव २०१८चा प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून शिर्डी येथे १५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय साई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये फुल मॅरेथॉन स्पर्धा ही ४२ किमी अंतराची तर हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही २१ किमी अंतराची असेल. तसेच ३ किमी अंतराची साई फेरी असणार आहे. या स्पर्धेत सुमारे ५० हजार स्पर्धक सहभागी होऊन ही स्पर्धा जागतिक विक्रम प्रस्थापित करेल.
साई सृष्टी प्रकल्प
हा प्रकल्प मौजे निमगांव-कोर्‍हाळे येथील २१ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. यामध्ये मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या आकारातील श्रीसाईबाबांची मूर्ती बसविण्यात येईल. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने श्री साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग ऑडिओ, व्हिडिओ, विद्युत रोशणाई ध्वनी आणि विशेष प्रभावांसह मूर्तिमंत स्वरूपात करण्यात येणार असून खालीलप्रमाणे प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे.
* साई तारांगण (साई प्लॅनेटोरीयम) – साई तारांगणची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तारे पाहण्याची सोय असेल. आणि विविध सामग्रीच्या बहुस्तरीय ३-डी प्रोजेक्शनमध्ये प्रदर्शनासाठी एक उच्च तंत्रमय तारांगण तयार करण्यात येईल. हे तारांगण साईभक्तांसाठी आकर्षण ठरेल.
* वॅक्स म्युझियम – या वॅक्स म्युझियममध्ये १०० मेणातील पुतळ्यांची उभारणी करण्यात येणार असून त्यात ५० राष्ट्रीय थोर पुरुषांचे व ५० राष्ट्रीय संतांचे पुतळे असतील. या प्रत्येक पुतळ्याजवळ आयपॅड, हेडफोन असेल. यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती ऐकता व पाहता येईल.
* स्टार गेझिंग गॅलर – यामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे २५ टेलिस्कोप असतील. यामुळे आकाशातील ग्रहतार्‍यांचे प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना करता येईल व अभ्यासता येईल.
* सायन्स पार्क – सायन्स पार्कमध्ये सायन्सचे विविध प्रकल्प, प्रोजेक्ट व मॉडेलचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
साई व्हर्च्युअल रिऍलिटी शो
या शोमध्ये हॉलिग्राफिक या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्री साईबाबांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभूती देणारा व श्रीसाईसत्‌चरित्रातील काही प्रसंगांचा सजीव अनुभव देणारा असा २५ मिनिटांचा शो दाखविण्यात येणार आहे.
देणगीदार साईभक्तांसाठी (चांदीच्या पादुका)
भेट योजना
श्री साईबाबा संस्थानाला रुपये २५ हजार व त्यापेक्षा अधिक देणगी देणार्‍या देणगीदार साईभक्तांना दि. ९ जुलै २०१७ पासून क्षीगुरुपौर्णिमा उत्सवाच्या औचित्यावर संस्थानच्या वतीने श्रींच्या समाधी मंदिरात पूजन केलेल्या २० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका भेट म्हणून दिल्या जाणार आहेत.
साई कॅन्सर हॉस्पिटल
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे निदान व्हावे यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने व साई संस्थान यांच्या वतीने १०० खाटांचे साईबाबा कॅन्सर रुग्णालय उभारणार असून हा प्रकल्प साधारणपणे १२५ कोटी रुपये खर्चाहून एक वर्षांत उभा राहणार आहे.
कलादालन व ग्रंथालय
शिर्डी बसस्थानकाची उभारणी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून झाली असून त्या इमारतीमध्ये पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर श्री साईबाबांच्या कलाकृतींचे भव्य कलादालन, वाचनालय, पेंटिंग, डॉक्युमेंटेशन उभारण्यात येणार आहे. याठिकाणी इंटरनेटची सुविधा असणार आहे. तसेच या कलादालनातील वाचनालयात विविध ग्रंथांचा समावेश असणार असून अनेक कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन उभारण्यात येणार आहे.
शिर्डी शहरात मोफत वाय-फाय सेवा
शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता विदेशासह देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येत असतात. शिर्डीत येणार्‍या भाविकांना ऑनलाइन सुविधांचा तसेच श्री साईबाबांची व शिर्डी शहराची माहिती तात्काळ मिळावी या उद्देशाने संस्थानच्या वतीने शिर्डी शहरामध्ये १ ऑगस्ट २०१७ पासून मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार आहे.
एक लाख झाडांचे रोपण
महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या वन महोत्सवाच्या निमित्ताने १ जुलै ते ७ जुलै या काळात ग्रीन व क्लीन शिर्डी या ध्येयपूर्तीसाठी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा (वृक्षारोपणाचा) कार्यक्रम श्री साईबाबा संस्थान हाती घेणार असून, शिर्डी-नाशिक व नगर-मनमाड रोडच्या दुतर्फा छायादार वृक्ष लावण्यात येतील. तसेच शिर्डी शहरातील प्रत्येक रस्त्याच्या दुभाजकामध्ये व प्रत्येक चौकाच्या ठिकाणी सुशोभित फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून याकरिता शिर्डी नगरपंचायतीचे सहकार्य घेण्यात आलेले आहे. यासाठी मनुष्यबळ, आधुनिक यंत्रसामग्रीचा उपयोग केला जाणार आहे.
घनकचरा प्रकल्प
शिर्डीत दररोज सुमारे २० टन कचर्‍याची निर्मिती होत असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २० टन क्षमता असलेला घनकचरा प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कचर्‍याची विल्हेवाट लावून त्यातून निर्माण होणारा गॅस व विजेचा उपयोग मंदिराकरिता करण्यात येईल.
साई रोझ अगरबत्ती
शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने साईभक्त येतात. त्यांच्या साईबाबांप्रति असणार्‍या श्रद्धेमुळे ते बाबांना मोठ्या प्रमाणात गुलाबपुष्प व हार अर्पण करतात. साई मंदिरात सुमारे एक टन गुलाब पुष्प व हार जमा होतात. या जमा झालेल्या गुलाब पुष्प व हारांचा उपयोग सत्कारासाठी करण्यात येतो. राहिलेल्या गुलाब पुष्प व हारांपासून साई रोझ अगरबत्ती तयार करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. हे काम स्थानिक महिला व बचत गटांना दिल्यामुळे त्यातून महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून केली जाईल.
फुट एनर्जी
श्रींच्या दर्शनासाठी दररोज ५० हजाराहून अधिक साईभक्त शिर्डीला येतात. या येणार्‍या साईभक्तांच्या दर्शनरांगेतून चालण्याच्या प्रक्रियेतून ऊर्जा निर्माण करण्याचा अत्याधुनिक अद्वितीय असा प्रकल्प लवकरच साकारण्यात येईल. या प्रकल्पातून तयार होणार्‍या ऊर्जेच्या माध्यमातून दर्शन रांगेतील दिवे व पंखे चालतील. हा फूट एनर्जी प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असेल.
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील
महिला व विद्यार्थ्यांना मदत
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील महिलांना व विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील महिलांना रोजगाराची साधने देऊन पुनर्वसन करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना मदत देण्यात येईल. हा उपक्रम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविला जाईल. शिक्षणासाठीही मदत केली जाईल.
शताब्दी वर्षातील कार्यक्रम
श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त वर्षभरात दर महिन्याला जागतिक विक्रमांचा समावेश असलेले कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या सामाजिक सेवेचे हे सर्व कार्यक्रम शिर्डीत राबविले जातील. या व प्रबोधनाच्या कार्यक्रमांचा समावेश असेल. देशाच्या अनेक भागातून साई रथाच्या माध्यमातून साईभक्तीचा जागर केला जाईल.
तिरुपतीत केशदान तर
शिर्डीत रक्तदान
शिर्डीमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रक्तपेढीद्वारे साई मंदिर परिसरात दररोज रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अनेक रक्तपेढ्यांना रक्त पुरवण्याचा उपक्रम या प्रकल्पातून केला जाईल.
चित्ररुपी शिर्डी
श्री साईबाबा महासमाधी शताब्दीच्या कालावधीत शिर्डी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, महत्त्वाच्या ठिकाणाच्या कंपाउंडच्या दर्शनी भिंती व शिर्डी शहरातील सर्व घरांच्या भिंती आदी ठिकाणी श्रीसाईबाबांचे तैलचित्र/पेंटिंग्ज लावण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याकरिता वेगवेगळ्या कलाकारांना, विद्यार्थ्यांना व चित्रकारांना वाव दिला जाणार आहे. तसेच या कामी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.