कुजिरातील शाळांच्या वेळांत किंचित बदल

0
77

>> वाहतूक कोंडीवर उपाय योजना

कुजिरा शिक्षण प्रकल्पात शाळा सुरू होण्याच्या व शाळा सुटण्याच्यावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काल शिक्षण संचालक, वाहतूक पोलीस उपअधिक्षक धर्मेश आंगले व वरील प्रकल्पातील विद्यालयांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत तेथील शाळा सुरू करण्याचे व सोडण्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासूनच वेळेतील बदल लागू होणार असून येत्या सोमवारपासून प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून आत जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करण्यास बंदी असेल.
हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांच्याशी संपर्क केला असता हेडगेवार विद्यालय सकाळी ७.४० वाजता सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. धेंपे उच्च माध्यमिक ७.४५ वा. तर मुष्टीफंड ७.५० वा. तर रोझरी सकाळी ८ वा. सुरू होईल. दहा मिनिटांचा फरक ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळा सुटण्याच्या वेळेतही दहा मिनिटांचा फरक करण्यात आला असून त्यानुसार हेडगेवार दुपारी १.२५ वाजता, धेंपे १.३५ वाजता तसेच मुष्टीफंड व रोझरी दहा मिनिटांच्या फरकानी सुटेल. पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण अधिकारी, पोलीस व शाळा प्रमुखांनी केले आहे. या बदलामुळे वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकेल, असा विश्‍वास शाळा प्रमुखांनी व्यक्त केला आहे.