अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना लाच घेताना पकडले

0
91

>> दीड लाखाच्या लाचेचा पहिला हप्ता घेताना पर्दाफाश

उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. साबाजी शेट्ये यांना पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना काल भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका तक्रारीच्या आधारे छापा टाकण्यात आला तेव्हा शेट्ये यांचे प्रताप उघडकीस आले. स्फोटकांचा साठा करण्याचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यासाठी शेट्ये यांनी एका व्यक्तीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जात असताना तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे भ्रष्टाचारविरोधी विभागाने हा छापा टाकून साबाजी शेट्ये यांना रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचारविरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी ही माहिती दिली. 

लाच घेताना पकडले गेल्यानंतर शेट्ये यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या आल्तिनो – पणजी येथील मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.
साबाजी शेट्ये यांच्या कार्यपद्धतीबाबत आजवर अनेक तक्रारी आल्या होत्या. मालमत्ताविषयक किंवा फेरसर्वेक्षणासाठीच्या फायलींवर ‘प्लीज स्पीक’ असा शेरा ते मारत असत. शेट्ये यांच्या पणजीतील कार्यालयावर छापा मारण्यात आला तेव्हा असे संदिग्ध शेरे असलेल्या अनेक फायली सापडल्या. विशेषतः विदेशस्थ गोमंतकीयांच्या मालमत्तांच्या फायलींसंदर्भात ‘विशेष आस्था’ दाखवली जात असे असे तपासात आढळून आले आहे.
महसूलमंत्री व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे आलेल्या काही तक्रारीतून शेट्ये यांचे बिंग फुटले. डिसोझा यांनी या सार्‍या तक्रारी मुख्य दक्षता अधिकारी व राज्याचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. दक्षता खात्याने त्यानंतर चौकशी सुरू केली होती. तक्रारींमध्ये सत्यांश आढळून आल्याने काल छापा मारण्यात आला आणि शेट्ये यांचे प्रताप चव्हाट्यावर आले. या कारवाईमुळे राज्य प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे.
अशा प्रकारच्या लाचखोर अधिकार्‍यांमुळे प्रशासनातील सर्व सरकारी कर्मचार्‍यांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे शेट्ये यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.