शेतकरी आंदोलनातील गोळीबारात ५ ठार

0
92

>> मध्य प्रदेशात हिंसक निदर्शने

महाराष्ट्राबरोबरच आता मध्य प्रदेशमध्येही शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले असून काल तेथील आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ शेतकरी मरण पावल्याचे वृत्त आहे. चौघेजण जखमी झाले आहेत. मात्र पोलिसांनी गोळीबाराचे वृत्त फेटाळले आहे. राज्य प्रशासनाने हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर रतलाम, मंदसौर व उज्जैन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. शेत मालाला हमी भाव देण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. मंदसौर जिल्ह्यात शेतकर्‍यांनी १० ट्रक, पोलिसांची गाडी व काही मोटरसायकलींना आग लावल्याचे सांगण्यात आले.
सुवासारा भागात आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. दालोडा भागात आंदोलकांनी रेल्वे रूळांचे नुकसान केले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पोलिसांच्या कथित गोळीबाराच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेऊन घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला. तसेच राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी स्थानिक पोलीस किंवा सीआरपीएफ यांच्यापैकी कोणीही आंदोलकांवर गोळीबार केला नाही असे सांगितले. पोलिसांनी बाळगलेल्या संयमाची त्यांनी प्रशंसा केली.

महाराष्ट्रात संप सुरूच
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी शेतकरी संप सुरूच आहे. राज्यात भाजीपाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. काल मुंबईत अन्य ठिकाणाहून २७ दुधाचे टँकर झेड सुरक्षेत आणण्यात आले.