पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज भाग – १

0
138

– डॉ. स्वाती अणवेकर

फॉलिक्यूलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार होत नाही. आणि म्हणूनच अशा स्त्रियांमध्ये डींबाणू पक्व होऊन त्यापासून पक्व स्त्रीबीज हे ओव्ह्युलेशन मार्फत तयार होऊ शकत नाही. आणि जरी अशा स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर आणि नियमित येत असली तरी गर्भधारणा मात्र होत नाही.

संध्याचे लग्न होऊन जवळ जवळ दोन वर्षे झाली होती, तरी देखील तिला गर्भधारणा होत नव्हती. तिची मासिक पाळीसुद्धा नियमित होती, मात्र हल्ली संध्याचे वजन थोडे वाढले होते. तसेच मासिक पाळीच्या वेळी स्रावसुद्धा कमी होत होता. असे काही महिने प्रयत्न करुनही यश येत नसल्याने त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाला दाखवले. डॉक्टरांनी दोघांच्याही सर्व तपासण्या केल्या व संध्याची सोनोग्राफीदेखील केली. त्यात संध्याला पीसीओडी असल्याचे निदान केले. मग संध्याचे ऍलोपॅथीच्या औषधांसोबतच आयुर्वेदिक औषधे घेण्यास सुरुवात केली आणि काही महिन्यातच संध्याला गोड बातमीची चाहूल लागली.

पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज (पीसीओडी) म्हणजे नेमके काय?…
– या अवस्थेत स्त्रीच्या शरीरामधील हॉर्मोन्समध्ये वैषम्य निर्माण होते. अर्थात त्यांचे कार्य शरीरात योग्य रीत्या होऊ शकत नाही. कारण हे हॉर्मोन्स निर्माण करणार्‍या ग्रंथींचे कार्यदेखील बिघडलेले असते. त्यामुळे होते असे की स्त्रीच्या गर्भाशयाशी संलग्न असणार्‍या डींब ग्रंथी अर्थात ओव्हरीजमध्ये असणार्‍या डींेबाणु अर्थात फॉलिकल्सभोवती पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे बारीक बुडबुडे निर्माण होतात.
या अवस्थेत प्रामुख्याने मेंदूमधील हायपोथॅलॅमस व पिट्युटरी ग्रंथी तसेच ओव्हरी यामधल्या ऍक्सीसमध्ये बिघाड झाल्याने पीसीओडी होतो. आपल्या भारतामध्ये दहापैकी एक स्त्री ही पीसीओडी ग्रस्त असते आणि त्याचाच परिणाम म्हणून बर्‍याच बायकांना गर्भधारणा होतच नाही अथवा योग्य वयात होत नाही.
१) ‘हॉर्मोनल इम्बॅलन्स’ म्हणजे काय? ः
– स्त्रीच्या शरीरातील डींब ग्रंथी या अल्प प्रमाणात ऍड्रोजन हा हॉर्मोनसुद्धा निर्माण करत असतात पण पीसीओडीमध्ये मात्र ऍड्रोजनची निर्मीती ही गरजेपेक्षा जास्त केली जाते व त्यामुळेच ओव्ह्युलेशन होत नाही आणि परिणामी चेहर्‍यावर मुरूम येणे, चेहरा-छाती अशा भागांवर पुरुषांप्रमाणे केस उत्पन्न होतात.
२) इन्स्युलीन रेझिस्टन्स ः
– या परिस्थितीमध्ये शरीर हे अगन्याशय अर्थात पॅन्क्रियाजमधून तयार होत असलेले इन्स्युलीन योग्य प्रकारे वापरायला असमर्थ ठरते. परिणामी अशा स्त्रियांमध्ये रक्तगट शर्करा वाढलेली आढळते ज्यामुळे त्यांना पुढे प्रमेह होण्याचा धोका असतो.
पीसीओडी ही अवस्था अनुवंशिकसुद्धा असलेली आढळते. कारण ही पालकांकडून मुलींमध्ये येऊ शकते. आता प्रश्‍न असा उद्भवतो की प्राकृत मासिक पाळी आणि पीसीओडी झालेल्या स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये कोणता फरक आढळतो. चला तर आपण आधी प्राकृत मासिक पाळीमधील घडामोडी पाहू यात-
– यामध्ये पहिली फेज ही फॉलिक्यूलर फेज असते ज्यात मेंदूमधील हायपोथॅलॅमस ही ग्रंथी पिट्युटरी ग्रंथीला हुकूम फरमावते की तू फॉलिक्यूलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफ्‌एस्‌एच्) तयार कर. बिच्चारी पीयुष ग्रंथी हा आदेश मानते व ते हॉर्मोन तयार करते. या एफ्‌एस्‌एच्‌मुळे डींब ग्रंथीमधील पाच-वीस डींबाणू पक्व होतात. आता यातील फक्त एकच डींबाणू पूर्ण पक्व होऊन त्यातून पक्व अंडे बाहेर येणार असते. हा सर्व प्रकार साधारणपणे पाळीच्या नऊ किंवा दहाव्या दिवशी घडतो. जेव्हा हा डिंबाणू पक्व होतो त्यासोबतच गर्भाशयाची अंतःस्त्वचा देखील फुलते व जाड होते कारण गर्भाशयदेखील आता नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत असते ना, या अवस्थेत स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन हॉर्मोन वाढलेला असतो.
आता पुढची पायरी असते ओव्ह्युलेशनची! यात हे पक्व स्त्रीबीज हे डींब ग्रंथीमधून गर्भाशय नलिकेमध्ये येते जिथे ते शुक्राणूद्वारा फलीत झाल्यास पुढे गर्भाशयात विराजमान होते हे साधारणपणे मासिक पाळीच्या पंधराव्या ते सोळाव्या दिवशी घडते. यात कसे होते पहा… जेव्हा हायपोथॅलॅमस या ग्रंथीला शरीरात इस्ट्रोजन वाढले आहे हे समजते तेव्हा ती ‘गोनाडोट्रॉफिन रिलिझिंग हॉर्मोन’ तयार करते. या हॉर्मोनमुळेच पीयुष ग्रंथी ल्युटीनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिक्यूलर स्टिम्युलेटिंग हॉ. अधिक प्रमाणात तयार करते आणि पुढील दोन दिवसात ओव्ह्युलेशन घडते. ओव्ह्युलेशन हे ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या वाढीमुळे होते. हे पक्व स्त्रीबीज गर्भाशय नलिकेत फक्त चोवीस तास जिवंत राहते. जर या काळात ते शुक्राणूने फलीत झाले नाही तर मात्र ते मृत होते.
शेवटची फेज असते ल्युटीयल फेज. यामध्ये जेव्हा हे पक्व स्त्रीबीज डींबाणू फोडून बाहेर येते तेव्हा डींब ग्रंथीच्या पृष्ठ भागावर जी जखम अथवा व्रण होतो त्याचे रुपांतर पुढील दोन आठवड्यांकरीता कॉर्पस ल्युटीयममध्ये होते. कारण यातून अल्प प्रमाणात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोॅनचा स्त्राव होत राहतो… जेणेकरून गर्भाशयाच्या अंतःस्त्वचेची जाडी राखून ठेवली जाते. कारण फलीत स्त्रीबीजाचे रोपण तेथे होणार असते.
जर गर्भधारणा झालीच नाही तर मात्र हे कॉर्पस ल्युटीअम मलूल होऊन मृत होते व वाढलेल्या प्रोजेस्टरोनची पातळी कमी होऊन काही दिवसातच गर्भाशयाची अंतःस्त्वचा सुटू लागते व मासिक पाळीच्या स्वरूपात गर्भाशयामधून बाहेर फेकली जाते.

पीसीओडी असणार्‍या स्त्रीमध्ये मासिक पाळीमध्ये कोणते बदल घडतात?
– अशा स्त्रियांमध्ये डींब ग्रंथी या वाढलेल्या ऍड्रोजन हॉर्मोनमुळे आधीच मोठ्या झालेल्या असतात. तसेच हायपोथॅलॅमस ही ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे गोनाडोट्रॉफीन रिलिझिंग हॉर्मोनचा स्त्राव पुष्कळ वाढतो. यामुळेच ल्युटिनायझिंग हॉर्मोनचा स्त्रावदेखील भरपूर वाढतो, पण तेवढ्या प्रमाणात मात्र फॉलिक्यूलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार होत नाही. आणि म्हणूनच अशा स्त्रियांमध्ये डींबाणू पक्व होऊन त्यापासून पक्व स्त्रीबीज हे ओव्ह्युलेशन मार्फत तयार होऊ शकत नाही. आणि जरी अशा स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर आणि नियमित येत असली तरी गर्भधारणा मात्र होत नाही.
क्रमशः