पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

0
103

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून काल भीमबेर व बट्टल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा हल्ला परतवून लावताना भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकचे ५ सैनिक ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.
तत्पूर्वी, काल सकाळी राजौरी व पूंछ जिल्ह्यातील सीमारेषेवर मोठा शस्त्रसाठा आढळला होता. याआधी बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत एका घरात लपून बसलेल्या २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दरम्यान, भारताच्या सडेतोड कारवाईनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त जे. पी. सिंह यांना तडकाफडकी बोलावून घेतले आहे.
काल पाकिस्तानच्या सैन्याने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य करीत जोरदार हल्ला चढवला. भारतीय चौक्यांवर मोर्टारच्या मदतीने तोफगोळ्यांचा वर्षावर करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला. पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात जनरल इंजिनिअरिंग रिझर्व्हमध्ये काम करणारा एक कामगार मृत्युमुखी पडला तर दोघे जखमी झाले. जखमींमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. पाकच्या या कुरापतीनंतर भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले. हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की त्यात पाकचे ५ सैनिक मारले गेले. याशिवाय आणखी ७ सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी पाकिस्तानच्या घुसखोरीविषयी सविस्तर माहिती देताना सकाळी साडेसात वाजता पाकिस्तानने गोळीबार केल्याचे सांगितले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. तर ७ वाजून ४० मिनिटांनी पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्येही गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितले. नियंत्रण रेषेजवळच्या बालनोई व मानकोट सेक्टरमध्येही गोळीबार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवरील तणाव कमालीचा वाढला आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार अहमद याचा चकमकीवेळी खात्मा केला होता.