माजी मंत्री दिलीप परुळेकरांविरुद्ध खटला चालविण्याचा कोर्टाचा आदेश

0
56

>> सेरुला कोमुनिदाद घोटाळा

सेरुला कोमुनिदादीची जमीन बळकावल्याप्रकरणी तसेच ङ्गसवणूक केल्याप्रकरणी उत्तर गोव्याचे विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी काल माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालू करण्याचा आदेश दिला. त्यांच्यासह अन्य दोघा आरोपींना येत्या १७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
काल झालेल्या सुनावणीवेळी
कोमुनिदादीचे तत्कालीन ऍर्टनी पीटर
मार्टिन्स तसेच प्रशासक आयरीन सिक्वेरा यांच्याविरुद्धही खटला चालू करण्याचा आदेश न्यायाधीष आगा यांनी दिला. संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११९, १२०, ४२० व १२० (ब) खाली तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (क) व (ड) खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिलीप परुळेकर यांच्या विरुद्धचा सदर खटला बंद करण्यात यावा अशी याचना गेल्या डिसेंबर महिन्यात गुन्हा अन्वेषण पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.
याप्रकरणी ऍड. आयरीश रॉड्रीग्ज यांनी दिलेल्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच सदर प्रकरणी चौकशी करण्याचा न्यायालयाला आदेश दिला होता. सदर खटला बंद करण्यास ऍड. रॉड्रिग्ज यांनी न्यायालयात जोरदार हरकत घेतली होती. मंत्री असलेल्या दिलीप परुळेकर यांना वाचवण्यासाठी पोलीस खटला बंद करण्याची सूचना करीत असल्याचे ऍड. रॉड्रिग्ज यांनी म्हटले होते.