काही पोलीस अधिकार्‍यांचे ड्रग्स माफियांशी साटेलोटे

0
70

>> पर्यटन मंत्र्यांचा गंभीर आरोप

काही पोलीस अधिकार्‍यांचे ड्रग्ज माफियांशी साटेलोटे असून युवा पिढीचे आयुष्य बरबाद करणार्‍या अमली पदार्थांना थारा दिला जाऊ नये यासाठी चाळीसही आमदार एकमताने पुढे येतील असे सांगून गोव्यातील समुद्र किनार्‍यांवर अमली पदार्थांचे व्यवहार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी काल दिला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील इशारा दिला.
काही पोलीस अधिकारी अमली पदार्थांच्या व्यवहारांना थारा देत असल्याचा संशय पर्यटनमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘‘काही पोलीस अधिकार्‍यांचे ड्रग्ज माफियांशी साटेलोटे असल्याचा दाट संशय आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय अमली पदार्थांची विक्री शक्य नाही’’ पर्यटनमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमली पदार्थांचा विषय गंभीरतेने घेतला आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाचे प्रमुख पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी ड्रग्ज माफियांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे, असे पर्यटनमंत्री म्हणाले.
कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थांची विक्री खपवून घेतली जाणार नसल्याचे मंत्री आजगावकर यांनी सांगितले. सरकारने अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी धाडसत्र सुरू केले आहे. तरुणांचे आयुष्य बरबाद होण्यास सरकार देणार नसल्याचे ते म्हणाले. समुद्र किनार्‍यांवर कामावर असलेल्या पर्यटन खात्याच्या कर्मचार्‍यांना अमली पदार्थांच्या विक्रीविषयी संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना माहिती देऊनही ते कारवाई करीत नसल्यास थेट आपल्याकडे तक्रार करण्याचे निर्देश पर्यटन खात्याच्या कर्मचार्‍यांना देण्यात आले असल्याचे बाबू आजगावकर यांनी सांगितले.