मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

0
80

>> कॉंग्रेस गोवा प्रभारी अमित देशमुखांचा आरोप

गेल्या तीन वर्षांच्या काळात केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव व गोवा प्रभारी अमित देशमुख यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काही पक्षांनी लोकशाही पायदळी तुडवल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री व विद्यमान आमदार असलेल्या अमित देशमुख यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतरची त्यांची ही पहिलीच गोवा भेट होती. केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करताना देशमुख म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून मागच्या तीन वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा कधी नव्हे एवढी धोक्यात आली आहे. या तीन वर्षांच्या काळात देशाला आतंकवादाचा मोठा सामना करावा लागल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, गेल्या ३ वर्षांत भारतात १७२ आतंकवादी हल्ले झाले. गेल्या २१ महिन्यांत १२ मोठे हल्ले झाल्याचेही ते म्हणाले.
गेल्या ३ वर्षांतील हल्ल्यात ५७८ लष्करी जवान व ८७७ नागरिकांनाही प्राणाला मुकावे लागल्याचे त्यांनी नमूद केले. एका जम्मू आणि काश्मिरातच २०३ जवान शहीद झाले. सहा महिन्यांच्या काळात पाकिस्तानने तीन वेळा भारतीय जवानांचा शिरच्छेद केला तसेच १३४३ वेळा युद्धबंदीचा भंग केल्याचे देशमुख म्हणाले. देशात नक्षलवादी कारवायांतही वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांच्या काळात शेजारच्या राष्ट्रांबरोबरचे संबंध कधी नव्हे एवढे बिघडल्याचा आरोपही यावेळी देशमुख यांनी केला. भारताचा मित्र देश असलेल्या रशियाने पाकिस्तानशी हात मिळवणी केल्याचे सांगून पाकला युद्धासाठीची शस्त्रे तसेच हेलिकॉप्टर विकण्यासाठीचे करार केले असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या तीन वर्षांच्या काळातील केंद्रातल्या भाजप सरकारच्या अपयशाची माहिती देणारी पुस्तिका कॉंग्रेसने प्रकाशित केली असल्याचे सांगून त्याची प्रतही देशमुख यांनी यावेळी पत्रकारांना दिली. कृषी व अर्थव्यवस्था या दोन क्षेत्रात केंद्र सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोपही यावेळी देशमुख यांनी केला.