मुसळधार पावसाने गोव्याला झोडपल

0
136

 

>> रस्ते जलमय
>> झाडे कोसळली
>> जनजीवन विस्कळीत

राजधानी पणजीसह आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडला. रस्ते तर पाण्याखाली गेलेच, परंतु अनेक भागांत वादळी वार्‍यामुळे झाडे कोसळली आणि जनजीवन विस्कळीत झाले.दुपारी बाराच्या सुमारास पणजी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. संध्याकाळीही पुन्हा पावसाच्या जोरदार सरी आल्या. साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाणारी वाहने पादचार्‍यांची तारांबळ उडवीत होती. पुढील ४८ तास अशीच मुसळधार अतिवृष्टी होईल असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
राजधानी पणजीतही सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार पाऊस कोसळल्याने कदंब बसस्थानक परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचून राहिल्याने वाहनचालक व पादचार्‍यांचे हाल झाले. हॉटेल रेगोजवळील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकान मालकांची तारांबळ उडाली. पहिल्याच पावसात पणजीतील काही रस्ते पाण्याखाली गेल्याने पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना विचारले असता कुणालाही दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. आपण कुणालाही दोष देणार नसल्याचे ते म्हणाले. महापालिकेने गटारे साफ करण्याचे काम केले होते. जर कुणाला दोष द्यायचा असेल तर तो पावसाला द्यावा लागेल, असे फुर्तादो म्हणाले.
गेल्या २४ तासांमध्ये पणजीत अर्धा इंच पावसाची नोंद झाली. केप्यात सुमारे २ इंच, साखळीत दीड इंच, फोंड्यात १ इंच, म्हापशात दीड इंच, मडगावात अर्धा इंच, पेडण्यात पाव इंच, सांगेत अडीच इंच, वाळपईत दीड इंच, मुरगावात अर्धा इंच पाऊस कोसळल्याची माहिती साहू यांनी दिली. दरम्यान, पणजी शहरात येत्या २४ तासांत पावसाच्या काही हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून कमाल तापमान ३१ व किमान २४ डिग्री सेल्सियश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पेडणे बाजारपेठेत पाणी
पहिल्या पावसाने काल संपूर्ण पेडणे तालुक्याला झोडपून काढले. पेडणे बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. गटार व्यवस्था कोलमडल्याने मुख्य रस्त्यावर पाणी भरले. दैनंदिन बाजारावरही परिणाम झाला. पेडणे पालिकेच्या मासळी बाजाराची पहिल्याच पावसाने भंबेरी उडवली. गेल्या वर्षी मार्केटचे छप्पर कोसळले होते, त्याची दुरुस्ती झाली,पण व्यवस्थित निगा न राखली गेल्याने मासळी विक्रेत्यांवर जलाभिषेक झाला. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने नुकसान झाल्याचे मासे विक्रेती श्रीमती मोरजे हिने सांगितले. आपण गेली वीस वर्षे या मासळी बाजारात मासे विकते. त्यावरच आपले कुटुंब चालते असे तिने सांगितले. नुकसान झाल्याने आजचा सोपो कर द्यायलाही आपण नकार दिल्याचे तिने सांगितले.
मासळी मार्केटशेजारील दुकानांतही पाणी साचले. काही दुकानांतही पाणी शिरल्याने व्यापार्‍यांनी दुकाने उघडली नाहीत.
बाजारपेठेतील पालिकेच्या सोपो कराची दर अकरा महिन्यांनी पावणी होते. ती यंदा किशोर आरोसकर यांनी नऊ लाख आठ हजार रुपयांना घेतली आहे. मात्र, त्यांना दैनंदिन सोपो देण्यास व्यापार्‍यांनी नकार दिला. त्यांनी पेडण्याच्या मुख्याधिकारी गौतमी मेकर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली व पालिकेने सोपो कराची रक्कम कमी करावी असे निवेदन सादर केले. मुख्याधिकार्‍यांनी अधिकारी व नगरसेवकांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. मंत्र्यांची मंजुरी मिळाली तरच गटाराचे काम घेता येईल असे रस्ता विभागाच्या अभियंत्याने सांगितले. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना तसे विनंतीपत्र लिहिले आहे. यावेळी उपस्थित नगरसेवक उषा नागवेकर, श्रद्धा माशेलकर, सिद्धेश पेडणेकर, प्रशांत गडेकर, दीपक मांद्रेकर, सुविधा तेली, गजानन सावळ देसाई व स्वाती कांबळी आदींनी साचलेल्या पाण्यावर उपाययोजनेची मागणी केली.
पेडणे बसस्थानकासमोरही पाणीच पाणी झाल्याचे पाहावयाला मिळाले. दाभोलकर ते गावडेवाडा हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. मरडीवाडा, मोरजी रस्त्यावर पाणी आले होते. चोपडे सर्कल ते मधलावाडा प्राथमिक शाळेजवळ रस्ता सुशोभीकरणाचे काम सुरू असून नियोजनाअभावी तेथील रस्ता पाण्याखाली गेला होता. देऊळवाडा, उगवे येथे चंद्रकांत उगवेकर यांच्या घरावर झाड पडून पाच हजारांचे नुकसान झाले. तालुक्यातील जीव, टेलिफोनसेवा विस्कळीत झाल्याने लोकांची गैरसोय झाली.
तिसवाडीत रस्ते जलमय
आमच्या आगशी वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे तिसवाडी तालुक्यात रस्ते जलमय झाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी जनजीवन विस्कळीत झाले. संततधार पावसामुळे लोकांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळत होते. घरदुरुस्ती, घराचे बांधकाम हाती घेतलेल्यांचीही तारांबळ उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बांधकाम मजूर काम सोडून गेल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
सांतान येथील चर्चच्या रस्त्यावरील एक झाड उन्मळून पडल्याने वीज खांब कोसळला. त्यामुळे या भागात वीज खंडित झाली होती. मोसमी पाऊसपूर्व कामे वेळीच हाती न घेतली गेल्याने गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याची तक्रार नागरिक करीत होते.
फोंडा, धारबांदोड्यात पडझड
फोंेडा वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, काल दिवसभर फोंडा व धारबांदोडा तालुक्याला झोडपले. कुंडई येथे विजेच्या खांबावर झाड कोसळून ५० हजार रु. ५० हजारचे नुकसान झाले. प्रियोळ – म्हार्दोळ रस्त्यावर एका कारवर आंब्याचे झाड पडल्याने रु. १० हजारचे नुकसान झाले. बाणस्तारी येथे एका घरावर झाडाची फांदी तुटून पडल्याने घराची किरकोळ हानी झाली. वारखंडे येथे गटार तुंबल्याने एका दुकानात पाणी शिरले. शांतीनगर येथे मलनिस्सारण प्रकल्पासाठी काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर गॅसवाहू टेंपो रुतली. कुळे – खांडेपार रस्त्यावर झाडे कोसळल्याने काहीवेळ वाहतूक खोळंबली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेऊन झाले बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्याने दादा वैद्य चौकाजवळील वीज खात्याच्या कार्यालयात तक्रारी नोंदवण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
वास्कोत जनजीवन विस्कळीत
धुव्वादार पावसाने वास्कोतील जनजीवन काल विस्कळीत झाले. शहरातील गटारे तुडूंब भरल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांना दुपारी जेवणासाठी भिजत घर गाठावे लागले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरूच होता. वास्को शहर तसेच बायणा, नवेवाडे, रुमडवाडा, जेटी, मांगोरहील भागातील गटारे तुडूंब भरली होती. यामुळे वाहतूक खोळंबली होती. पालिका कर्मचार्‍यांना बोलावून गटारे साफ करण्यात आली.
डिचोलीत तीन लाखांचे नुकसान
आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या वृत्तानुसार, डिचोली तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने झोडपल्याने ठिकठिकाणी वृक्ष कोसळून तीन लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती डिचोली अग्निशामक दलाने दिली. पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले.
व्हाळशी – डिचोली येथील गोकुळदास फडते यांच्या घरावर वृक्ष कोसळल्याने दोन लाख रुपयांची हानी झाली. छप्पर पूर्ण निकामी झाले. देवगी – चोडण येथील चंद्रकांत किनळकर यांच्या घरावर झाड पडून हानी झाली. उमेश केरकर यांच्या घरावर झाड पडूनही नुकसान झाले. भामई – पाळीयेथील जयश्री नाईक यांच्या घरावर झाड पडून तीस हजारांचे नुकसान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याचे वृत्त आहे.
साखळीच्या नवीन बसस्थानकाचे काम सुरू असून तेथे संरक्षक भिंत व सामान पाण्याखाली गेल्याने नुकसान झाल्याचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी सांगितले. दरम्यान, परवा कुडणे येथे एका कारवर झाड पडल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. व्हाळशी येथे रघुनाथ गावस यांच्या घराच्या छपरावर झाड पडल्याने किरकोळ नुकसान झाले. सर्वण येथील गोविंद गुणाजी हायस्कूलच्या छपरावर झाड कोसळल्याने हानी झाली. कुडणे येथील संदेश च्यारी यांच्या गाडीची दोन लाखांची हानी झाली.
कुडचडे, सावर्डेत हानी
सावर्डे, कुडचडेला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. काकोडा पंचायत इमारतीवर झाड पडून हानी झाली. आमोणा, केपे येथे घरावर झाड पडल्याने छप्पराचे नुकसान झाले. गांधीनगर येथे सावर्डे-बेळगाव रस्त्यावर कणकीचे झाड पडल्याने सुमारे एक तास वाहतूक खोळंबली. कुडचडे अग्निशमन दलाने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. कुळे रेल्वे स्थानकाजवळही एक झाड पडले.
आमच्या म्हापसा प्रतिनिधीने दिलेल्या वृत्तानुसार, पहाटेपासून सततधार पडलेल्या पावसामुळे म्हापसा बाजारात गुडघाभर पाणी साचल्याने फूटपाथवरील व्यावसायिक व दुकानदारांची तारांबळ उडाली. काहींच्या दुकानांमध्ये पाणी शिरले तर पदपथावरील विक्रेत्यांचा माल पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी म्हापसा बाजारातील गटारांची साफसफाई करूनही दरवर्षीप्रमाणे पाणी भरत असल्याने म्हापसा व्यापारी संघटनेचे माजी खजिनदार तथा प्रसिद्ध व्यापारी रामा राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली. म्हापसा पालिकेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. काल सकाळपासून दुपारी तीनपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने सत्तरी तालुक्याला झोडपल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. मान्सूनपूर्व कामे न झाल्याने गटारे तुडूंब भरून प्रमुख रस्ते पाण्याखाली गेेले होते. त्यामुळे वाहने अडून पडली होती. वाळपई वनप्रशिक्षण केंद्रासमोर वाळपई – होंडा राज्य महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. वाळपई पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामे केलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे काही दुकानांमध्ये पाणी शिरले. होंडा – नवेदार येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना त्रास झाले.

समुद्रात कमी दाबाच्या
पट्‌ट्यामुळे पाऊस
दक्षिण महाराष्ट्रापासून गोव्यासह उत्तर केरळपर्यंतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेच मुसळधार पाऊस पडल्याचे पणजी वेधशाळेचे संचालक साहू यांनी काल सांगितले. हा मान्सूनपूर्व पाऊस असून कालप्रमाणेच आजही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आज ते जून ४ पर्यंत राज्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

येत्या ४८ तासांत समुद्रात
न उतरण्याचा ‘दृष्टी’चा इशारा
मान्सूनपूर्व पावसामुळे समुद्र खवळलेला असल्याने स्थानिक नागरिक, पर्यटक आदींनी समुद्रात उतरू नये असे आवाहन ‘दृष्टी’ ने केले आहे. समुद्रात बुडणार्‍यांना वाचवण्यासाठी ‘दृष्टी’चे सातशे जीवरक्षक गोव्याच्या किनारपट्टीवर तैनात आहेत. खवळलेल्या समुद्रात बुडणार्‍यांना वाचवणे जीवरक्षकांसाठी कठीण काम असते. त्यामुळे कुणीही समुद्रात जाण्याचा धोका पत्करू नये, असा इशारा ‘दृष्टी’ने दिला आहे. पुढील ४८ तासांत समुद्रात जाणे अत्यंत धोक्याचे आहे. सध्याच्या खराब हवामानामुळे किनार्‍यांवर लाल बावटे लावले गेले आहेत अशी माहिती दृष्टीचे सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी दिली.

आजपासून मासेमारी बंदी
दरवर्षीप्रमाणे आज एक जूनपासून ३१ जुलैपर्यंत तब्बल ६१ दिवस गोव्याच्या समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात आलेली असल्याने गोवेकरांना मासळीवाचून दिवस कंठावे लागणार आहेत. या बंदीच्या काळात गोव्याजवळच्या अरबी समुद्रात मच्छीमारी करणारे जवळजवळ दीड हजार ट्रॉलर बंद राहतील.

आपत्कालीन मदतीसाठी नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी सरकारने आपत्कालीन मदत कक्ष स्थापन केले असून सचिवालयात २४ तास चालणारा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचा संपर्क क्रमांक २४१९५५० व २४१५५८३ असा आहे. फॅक्स क्रमांक २४१९७६७ असा आहे.
उत्तर गोवा जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचा क्रमांक २२२५३८३, २२२५०८३ व फॅक्स क्रमांक २४२२०५९ असा आहे. त्याखेरीज १०७७ हा निःशुल्क क्रमांकही उपलब्ध करण्यात आला आहे.
इतर तालुकानिहाय मदत कक्षांचे संपर्क क्रमांक असे आहेत –
बार्देश – २२६२२१०
पेडणे – २२०१२२३
डिचोली – २३६२२३७
सत्तरी – २३७४०९०
दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी मडगावच्या माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक २७९४१०० व फॅक्स क्रमांक २७९४४०२ असा आहे.
इतर तालुकानिहाय मदत कक्ष असे आहेत –
सालसेत – २७९४१००
मुरगाव – २५१३०१४
सांगे – २६०४२३२
केपे – २६६२२२८
धारबांदोडा – २६१४१११
काणकोण – २६४३३२९
फोंडा – २३१२१२१
हे सर्व नियंत्रण कक्ष सुटीचे दिवस तसेच शनिवार, रविवारीही सुरू राहतील.