राज्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा

0
109

 

>> साखळी व काणकोण येथे कारगाड्यांवर वृक्ष कोसळले
>> लाखोंची हानी
>> वास्कोत कोळशाच्या भुकटीचे लोळ

राज्याला मान्सूनचे वेध लागले असून काल वादळी पावसाने झोडपल्याने अनेक भागात वृक्ष कोसळून लाखोंचे नुकसान झाले. पाळोळे (काणकोण) व कुडणे (डिचोली) येथे कारगाड्यांवर झाडे पडून दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. मुरगाव बंदरातील कोळशाची भुकटी वास्को शहरभर विखुरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. काणकोण, डिचोली, फोंडा व तिसवाडी तालुक्याला वादळी पावसाचा मोठा फटका बसला.

दरम्यान, मान्सूनने केरळात धडक दिली असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे गोव्यात आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डिचोली तालुक्याला वादळी वार्‍यासह पावसाने झोडपल्याने विविध ठिकाणी वृक्ष कोसळून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. कुडणे येथे संदेश च्यारी यांच्या आर्टिगा कारवर झाड पडून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. व्हाळशी येथे रघुनाथ गावस यांच्या घराच्या छप्परावर झाड पडून किरकोळ हानी झाली. सर्वण येथील गोविंद गुणाजी हायस्कूलच्या छप्परावर झाड कोसळल्याने हानी झाली.
विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अग्निशमन दलाचे जवान कामात व्यस्त होते. सुमारे दोन तास वीज गायब झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी कर्मचारी पंचायत निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष वेधून यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी होत आहे.
वास्कोत कोळशाच्या भुकटीचे लोळ
काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान वादळी वार्‍यामुळे मुरगाव बंदरातील कोळशाची भुकटी वास्को शहरभर पसरल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सोसावे लागले. खारीवाडा, नॉनमून, मुंडवेल येथील घरांमध्ये तसेच शहरातील अनेक आस्थांपनांमध्ये कोळशाची भुकटी पसरल्याने सगळे काळेठिक्कर पडले होते. वादळी वार्‍यानंतर काही वेळाने जोरदार पाऊस पडला. त्यामुळे लोकांना कोळशाच्या भुकटीपासून थोडी उसंत मिळाली.
फोंड्यातील रस्ते पाण्याखाली
फोंडा तालुक्यातील तळसाय, धारबांदोडा येथे काल दुपारी आंब्याच्या झाडाची फांदी गीतेश भोला यांच्या घरावर पडल्याने सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. फोंडा अग्निशमन दलाचे मुकुंद गवंडी, नवनाथ झोरे, बशीर मुजावर, प्रेमानंद गावडे व गोरक्ष नाईक यांनी घरावर कोसळलेले झाल बाजूला केले. फोंडा शहरात जोरदार पाऊस पडल्याने कुर्टी येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. कुर्टी मशिदीजवळ रस्त्याचे चौपदरीकरण सुरू असून पावसामुळे रस्ता चिखलमय झाला होता. नागझर जंक्शनवर रस्त्याच्या मधोमध पाणी साठून राहिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
काणकोणात कारवर झाड पडले
काल संध्याकाळी वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या पावसामुळे पाळोळे समुद्रकिनार्‍यावर पार्किंग केलेल्या कारवर माडाचे झाड पडून गाडीचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. पाळोळे किनार्‍यावर लागून असलेल्या पार्किंग जागेत सदर कार पार्क करून ठेवण्यात आली होती. कारवर पडलेला माड अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून दूर केला. पाटणे किनार्‍यावरही एक झाड उन्मळून पडले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी ते हटवल्याची माहिती दलाचे प्रमुख महादेव लोलयेकर यांनी दिली. सासष्टी तालुक्यातही काल संध्याकाळी जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. पेडणे, सत्तरी, बार्देश तालुक्यातही काल पाऊस अधूनमधून पडत होता.
दोडामार्गालाही तडाखा
काल दुपारी सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपले. वादळी वार्‍यामुळे सासोली मंदार हॉलजवळ मोठे वृक्ष कोसळून बांदा – दोडामार्गकडे जाणारी वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली. सरकारी यंत्रणा दाखल न झाल्याने शेवटी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरची झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. साटेली, भेडशी, मणेरी, कुडासा, सासोली, पणतुर्ली, कळणे, झरेबांबर आदी परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला.