उद्यापासून दोन महिने मासेमारी बंदी

0
91

उद्या १ जून ते ३१ जुलै असे एकूण दोन महिने मासेमारी बंदी निश्‍चित करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी उद्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार असल्याचे मच्छीमार खात्याची अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे मच्छिमारी व्यावसायिकांनी समुद्रातून आपले ट्रॉलर व मच्छिमारी साहित्य धक्क्यावर आणले आहे. खारीवाडा, वास्को येथेही मच्छिमारी व्यवसायिक मासेमारी बंदीचे पालन करणार आहेत.
ट्रॉलरद्वारे मासेमारी बंदीमुळे सात जेटींवरील सुमारे दीड हजार ट्रॉलर बंद राहतील. मात्र, यांत्रिक बोटींचा वापर न करता होडीद्वारे पारंपरिक मासेमारी सुरू राहणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. ट्रालरद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मच्छीमार खात्याने राज्यातील सर्व जेटींना टाळे ठोकले आहेत. प्रत्येक वर्षी मासळीचे उत्पादन वाढावे तसेच प्रजनन होऊन मोठ्या प्रमाणात वृध्दी व्हावी तसेच वादळी पावसाळ्यात खोल समुद्रात मच्छीमारीवर आपत्ती कोसळून नये या हेतूने ही बंदी घातली जाते.
या बंदीचा आदेश खात्याने जारी केल्याने मत्स्य खवयांची पंचाईत होणार असून त्यांना इतर राज्यांतून येणार्‍या मासळीवर किंवा मानशीच्या किंवा सुक्या मासळीवर समाधान मानावे लागणार आहे.दरम्यान, यांत्रिकी बोटी, ट्रॉलर्स व इतर मत्स्य उद्योगात मग्न असणारे ओरीसा, तामिळनाडू, कर्नाटक भागातील कामगार आपल्या गावी परतायला लागले आहेत. यापूर्वीच बोटी, ट्रॉलर्स नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.