पंचायत निवडणूक : ५२८८ उमेदवार रिंगणात

0
96

>> ५५ उमेदवारांची बिनविरोध निवड
>> १०४५ उमेदवारांची माघार
>> १८६ पंचायतींच्या निवडणुका

येत्या ११ जून रोजी राज्यात होऊ घातलेल्या १८६ पंचायतींच्या निवडणुकांसाठी १४६६ प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत. ५५ उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली असून १४६६ प्रभागांसाठी एकूण ५२८८ उमेदवार रिंगणात आहेत. काल १०४५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अनुसूचित जमातींसाठी १६४ प्रभाग राखीव आहेत. तर अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्रभागांची संख्या ४९० एवढी आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील नोडल अधिकारी दुर्गाप्रसाद यांनी दिली.
मोर्ले-सत्तरी येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज भरलेला नाही. तेथील प्रभाग इतर मागास वर्गियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, त्या प्रभागात एकही मतदार इतर मागास जमातीचा नसल्याने एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. तर संजना संतोष च्यारी यांची धर्मापूर शिर्ली पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ व ४ मधून बिनविरोध निवड झाली आहे.
एकूण मतदारांची संख्या
एकूण मतदारांची संख्या ५८६१६४ इतकी आहे. त्यांपैकी ३८६३१० पुरुष व ३९९८५४ महिला मतदार आहेत. उत्तर गोव्यातील महिला मतदारांची संख्या ३८१७८१ एवढी तर दक्षिण गोव्यातील मतदारांची संख्या ४४३०८३ इतकी आहे.
उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील पंचायतींतून १०५९ उमेदवार, डिचोली तालुक्यातील पंचायतींतून ४६४, पेडण्यातील ४७१, तिसवाडीतील ५४८ व सत्तरीतील पंचायतींतून २८७ उमेदवार मिळून एकूण २८२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तर दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पंचायतींतून १७६, धारबांदोडा १५६, मुरगांव २११, फोंडा ६७८, केपें २५०, सांगें १६९ व सासष्टी ८२२ उमेदवार मिळून एकूण २४५९ एवढे उमेदवार रिंगणात आहेत.
टपाली मतदानासाठी व्यवस्था
टपाली मतदानासाठीच्या मतपत्रिका ७ जूनपर्यंत मिळतील. त्याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. मतपत्रिकांची छपाई करण्याच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून गुरुदास देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कर्मचार्‍यांना यापूर्वीच देण्यात आलेले आहे. दुसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण ५ जून रोजी देण्यात येणार असल्याचे दुर्गाप्रसाद यांनी सांगितले. सर्व निवडणूक केंद्रांवर कर्मचार्‍यांसाठी पाणी, जेवण व अन्य सोयसुविधा पुरवण्याच्या तसेच तेथे अग्निशामक दलातील जवान व वैद्यकीय पथकांची सोय करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.