यंदा मान्सून लांबणीवर

0
81

>> पणजी वेधशाळेचा अंदाज

मान्सून यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता असून गोव्यात मान्सूनचे आगमन जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता पणजी वेधशाळेने काल व्यक्त केली आहे. दरम्यान, काल संध्याकाळी राजधानी पणजीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला.
वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू हे काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की यंदा राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. मात्र, मान्सूनचे तसे शंभर टक्के भाकीत करणे शक्य नसून दरदिवशी परिस्थितीत बदल होत असतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिल्यास राज्यात सहा जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे ते म्हणाले.
केरळमध्ये मान्सूनचे उद्या किंवा परवा आगमन होईल, अशी चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात अद्यापही मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले नसल्याचेही साहू यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यात पावसाच्या ज्या हलक्या सरी कोसळल्या आहेत तो पाऊस म्हणजे उन्हाळी पाऊस असल्याचे साहू म्हणाले. यंदा दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस कोसळू शकतो, असेही साहू यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वेधशाळेच्या डोपलर रडारचा शुभारंभ आठवडाभरात करण्यात येणार असल्याची माहितीही साहू यांनी यावेळी दिली.