कुठ्ठाळी-चिखली रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध

0
104

कुठ्ठाळी ते चिखली पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ६०० झाडे तोडण्याचे काम सुरू असून ते त्वरित बंद करावे अशी मागणी करीत ‘सेव्ह ट्रीज चिपको’ आंदोलनाद्वारे काल पर्यावरण प्रेमींनी निषेध केला. कुठ्ठाळी जंक्शनवर जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी ‘फटयलेरे फटयले, गोंय सरकारान फटयले’, ‘दिवचे ना रे दिवचे ना, झाडा कापूक दिवचेना’ अशा घोषणा देत कुठ्ठाळी ते चिखली रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कापण्यास विरोध दर्शविला.
काल संध्याकाळी कुठ्ठाळी जंक्शनवर आंदोलकांनी हातात फलक घेऊन व घोषणा देत रस्ता रुंदीकरणासाठी झाडांच्या संहाराला विरोध दर्शविला. सुमारे ६०० झाडे कुठ्ठाळी ते चिखलीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे कापावी लागणार आहेत. आम्हांला विकास पाहिजे पण वन संपत्तीवर कुर्‍हाड चालवून नव्हे तर तिचे रक्षण करूनच विकास हवा अशी मागणी यावेळी आंदोलक करीत होते.
या आंदोलनात प्रजल साखरदांडे, कपिल कोरगांवकर, तेजस पंडित, दामोदर कवठणकर, कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, अल्का दामले, सूरज नाईक, सिरिल फर्नांडिस, चिराग त्रिपती, मनोज परम व इतर पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी कुडतरीचे आमदार बोलताना म्हणाले की, आपणाला इथे राजकारण करायचे नाही तर पर्यावरणावर होणारा आघात थांबायला पाहिजे. या रस्ता रुंदीकरणाचा फायदा लोकांसाठी नव्हे तर जिंदाल आणि अदानी या कंपन्यांना होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने या कंपन्यांच्या फायद्यासाठीच झाडांची कत्तल करून रस्ता रुंदीकरणाचे काम नेटाने सुरू केले आहे. याविषयी आपण पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून विरोध दर्शविणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी साखरदांडे यांनी जागतिक जैव विविधदिना दिवशी सुरू झालेले हे आंदोलन असेच चालू ठेवून सरकारला पर्यावरणाचा समतोल राखण्यास भाग पाडणार असल्याचे सांगितले.