लढा कर्करोगाशी भूमिका कुटुंबियांची

0
124

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

या आजारामुळे आपली भावंडे, समवयस्क मित्रमंडळ यांच्यापासून आपण विभक्त होत आहोत अशा जाणिवेने त्या बालकात चिडचिडेपणा निर्माण होतो. यासाठी त्याचे शरीर साथ देत असेल तेव्हा त्याला मैदानावर खेळ पाहण्यास नेणे.

कर्करोगाच्या रुग्णाची मानसिकता ः
कर्करोगाचे निदान झाल्यावर सर्वप्रथम रुग्णाची व त्याचबरोबर आप्तेष्टांची किंवा कुटुंबियांची मानसिकता ढासळते. शारीरिक दुखणे बाजूलाच राहते. मन मात्र खिन्न होते. मनोबल, मनोधैर्य खचते. प्रत्येक रुग्णाच्या वयानुसार, मनोबलानुसार तसेच रुग्णाच्या व्याधीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार कर्करोगाच्या रुग्णाची मनःस्थिती बदलते.

कर्करोगाचे निदान झाल्यावर वयानुसार रुग्णाची मनःस्थिती ः
१) तरुणवयीन रुग्ण –
– भीती अधिक
– ऐन उमेदीच्या काळात रोग झाला म्हणून मनोबल खचते.
– इप्सित स्वप्ने साकार होणार नाहीत यामुळे नैराश्य येते.
– आई-वडील व इतर कुटुंबीय यांना बसलेल्या धक्क्याने अस्वस्थता येते.
२) मध्यवयीन रुग्ण –
– भीती अधिक
– आयुर्मर्यादा अनिश्‍चित म्हणून कुटुंबियांची चिंता.
– इप्सित स्वप्ने साकार होणार नाहीत या भावनेने चिडचिड.
३) वृद्धावस्थेतील रुग्ण –
– पराधीनत्व
– संभाव्य वेदना सहन करता येतील किंवा नाही याची चिंता.
– कुटुंबियांना करावी लागणारी सेवा या विचाराने अस्वस्थता.
– औषधोपचाराच्या खर्चाच्या आर्थिक तरतुदीविषयी चिंता.
कर्करोगाच्या व्याधीला लढा देणार्‍या रुग्णांचे, त्यांच्या मनोबलानुसार खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल…
१) उत्तम मनोबल ः
* आजाराशी लढा देण्याची उमेद
* आजारातून बाहेर पडून पूर्वीप्रमाणे दिनक्रम आचरण्याची तीव्र इच्छा.
* रोगाबाबत सर्वांगीण माहिती मिळवण्याकरता प्रयत्न – शास्त्रीय माहितीकरिता वाचन इ.
* समदुःखी रुग्णांशी संवाद साधण्याची इच्छा.
* रोगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन.
* कुटुंबियांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न.
* हसत-खेळत रोगाशी लढा देऊन जीवन आनंदी बनवण्याचा दृष्टीकोन असतो.
२) मध्यम मनोबल ः
* आजाराच्या भीती व चिंतेमुळे अस्वस्थता, झोप न लागणे इ. लक्षणे दिसतात.
* कुटुंबीय व मित्र परिवाराशी बोलून त्यांच्याकडून आधार मिळवण्याचा प्रयत्न.
* रोगासंबंधी नकारात्मक गोष्टी समोर आल्यास त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न.
* येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याबद्दल मनात साशंकता. त्यामुळे कुठलाही निर्णय ठामपणे घेत नाहीत.
* एकांतात अस्वस्थता.
३) हीन मनोबल –
* आता सगळे संपले… अशी भावना.
* सतत भीती व चिंतेमुळे अस्वस्थता, झोप उडणे, चिडचिड.
* कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करूनही रोगाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन.
* सतत आप्तेष्टांच्या सहवासाची उपेक्षा.
* एकांतात दुःखात गुरफटून घेणे, सतत रडणे इ.
जीवनविषयक दृष्टीकोनातून ३ प्रकारे वर्गीकरण ः
१) सकारात्मक दृष्टीकोन
* रोगातून बरे होऊ अशी भावना.
* आयुष्यातील नियोजित गोष्टी जलद कराव्या, अशी स्वतःकडून अपेक्षा.
* मनोबल खचलेल्या कुटुंबियांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न.
२) अयोग्य सकारात्मक दृष्टीकोन
* सद्य परिस्थिती नाकारणे.
* मला कर्करोग झालाच नाही, अशी मनाची धारणा करून औषधोपचार, पथ्यपालन नाकारणे.
* आप्तेष्टांचा सल्ला न मानणे, चारचौघात न मिसळणे.
३) नकारात्मक दृष्टीकोन
* आयुष्य संपते असे वाटणे, निष्क्रियता येणे
* संभाव्य परिणामांना घाबरून क्वचित आत्महत्येचे विचार मनात येणे
* औषधोपचार, पथ्यपालन इ. नाकारणे.
४) तटस्थ दृष्टिकोन
* मृत्यू अटळ आहे व त्यासाठी आपल्या बाबतीत हे कारण घडले आहे असे वाटणे.
* अध्यात्माचा आधार घेऊन जीवन-मृत्यूकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणे.
* कोणत्याही मनःस्थितीला अधिकाधिक शून्य मनःस्थितीने सामोरे जाणे.
कँसरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियांचे व मित्रपरिवाराचे कर्तव्य –
१. बाल रुग्ण ः
५ ते १२ वयोगटातील बालकास कँसर झाल्यास त्याच्या आईवडलांनी व कुटुंबीयांनी पुढील गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.
* बालकाला त्याच्या वयानुसार त्याला झालेल्या आजाराची इतपत कल्पना द्यावी की ज्यायोगे औषधोपचार व पथ्यपालन याबाबतचे गांभीर्य त्याच्या लक्षात येईल.
* आजारामुळे किंवा चिकित्सा चालू असताना निर्माण होणार्‍या लक्षणांमुळे बालक शारीरिक व मानसिकदृष्ट्या हळवे झालेले असते. त्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त वेळ पालकांनी त्याला द्यावा. मात्र असे करताना त्याला आपल्या शारीरिक दुर्बलतेची तीव्रतेने जाणीव होऊ नये म्हणून त्याच्या शारीरिक जपणुकीबरोबरच वाचन-अभ्यास-बैठे खेळ यात त्याचे मन गुंतवावे.
* या आजारामुळे आपली भावंडे, समवयस्क मित्रमंडळ यांच्यापासून आपण विभक्त होत आहोत अशा जाणिवेने त्या बालकात चिडचिडेपणा निर्माण होतो. यासाठी त्याचे शरीर साथ देत असेल तेव्हा त्याला मैदानावर खेळ पाहण्यास नेणे. मित्रमैत्रीणींना घरी बोलावून गप्पा मारण्यास उद्युक्त करणे व शक्य असेल तेव्हा शाळेत पाठवणे.
* आपल्या मुलाच्या आजाराने दुःखी असले तरी आईवडलांनी व इतर नातेवाईकांनी दुःखाचे, रागाचे भान बालकासमोर प्रदर्शित करणे टाळावे.
तरुणवयीन रुग्ण –
तरुण कँसरग्रस्त रुग्णांत नैराश्य व चिडचिडेपणा या भावना आधिक्याने आढळतात. अशा वेळी कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने त्यांना …
* शारीरिक स्थिती सुधारत असलेल्या समवयस्क कँसरग्रस्त रुग्णांशी त्यांची भेट घडवून आणावी व त्यांच्यासह या विषयावर चर्चा करण्यास सांगावे.
* आजाराची, त्याच्या चिकित्सेची, पथ्यपालनाची रुग्णाला परिपूर्ण कल्पना द्यावी. यांच्या पालनाने कँसर नियंत्रणात ठेवता येतो हे पटवून देऊन भावी जीवनातील नैराश्य दूर करावे.
मध्यमवयीन रुग्ण –
* पती/पत्नी – मुले व इतर कुटुंबीय यांच्या चिंतेमुळे या वयातील रुग्ण भीतीपेक्षा अधिक चिंताग्रस्त असतात. अशावेळी नातेवाईकांनी, विशेषतः सहचराने रुग्णास कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे आश्‍वासन देऊन चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा.
* व्याधी कोणत्या आवस्थेतील आहे याची पूर्ण कल्पना द्यावी.
वृद्धापकाळातील रुग्ण –
या वयातील रुग्ण आधीच मनाने दुर्बल असतात. त्यात कँसरसारख्या व्याधीचे नाव ऐकल्यावर अधिकच खचून जातात. अशावेळी…
* पुढच्या पिढीतील नातेवाईकांनी प्रेमाने व आपुलकीने वागून त्यांच्यातील पराधीनत्वाची भावना दूर करण्याचा प्रयत्न करावा.
* रुग्णाला झालेल्या कँसरच्या प्रकारची माहिती देऊन त्यामुळे निर्माण होऊ शकणार्‍या संभाव्य परिणामांविषयी व उपायांविषयी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करावी.
कँसरग्रस्त रुग्णांनी आपल्या डॉक्टरांशी आजाराबाबत चर्चा करून त्यांचे पूर्णतः मार्गदर्शन घ्यावे व त्यांच्याकडून आपल्या मनातील सर्व शंकांचे समाधान करून घ्यावे. यामुळे रुग्णाच्या मनावरील ताण, नैराश्य दूर होऊन सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो व आहे त्या परिस्थितीत औषधोपचार, आहार-विहारांच्या नियमांचे पालक यांच्या सहाय्याने जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो.
शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक स्वास्थ्य अत्यावश्यक असल्याने रुग्णाने यासह योगासने, प्राणायाम, संगीत किंवा आपल्या आवडीच्या विषयात मन गुंतवल्यास मनावरील ताण हलका होण्यास मदत होते.