॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ मनःशांतीसाठी फलश्रुती

0
1375

– प्रा. रमेश सप्रे

प्रत्यक्षात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे घडलं किंवा मिळालं किंवा तसा अनुभव आला ही झाली वाचनाची (ग्रंथपारायणाची) फलप्राप्ती. मनाला हवं तसं घडलं नाही तरी विचार करून आनंदात परिस्थितीचा स्विकार करून सदैव आनंदात राहणं ही झाली ‘फलश्रुती’. अशी फलश्रुती देते मनःशांती!

संत कुणाला म्हणावं? अनेक ठिकाणी अनेक व्याख्या किंवा वर्णनं आली आहेत. एक सर्वमान्य गोष्ट संतांबद्दल अशी आहे की ज्याच्या विचार-उच्चार-आचारात एकवाक्यता म्हणजे एकसूत्रता (कोऑर्डिनेशन इन् थॉट्‌स – वर्डस अँड ऍक्टस्) असते त्याला संत म्हणावे. म्हणजेच ज्याची विचारसरणी – वाणी (लेखणी) आणि जीवनसरणी (राहणी) ही समान सूत्रात बांधलेली असतात तो संत. याचा अर्थ विचार एका प्रकारचा – बोलणं दुसर्‍या प्रकारचं नि वागणं तिसर्‍याच प्रकारचं असं संतांचं नसतं.
म्हणून संतांच्या जीवनात घडलेले प्रसंग ही त्यांची सहजसुंदर लीला असते. त्यांची उत्स्फूर्त वाणी त्यांची विचारसरणी स्पष्ट करणारी असते. त्यांच्या जीवनातील साधेसुधे प्रसंग, त्यावेळी त्यांनी काढलेले सहजस्फूर्त उद्गार आपल्याला खूप बोध करत असतात. कृतीतून व्यक्त झाल्यामुळे हे विचार आपली कृती बदलायला मार्गदर्शक ठरतात.
मनःशांतीसाठी सर्वांत प्रभावी उपाय आध्यात्मिक उपासना, पारमार्थिक साधना हाच आहे. या उपासनेचे अनेक पैलू – अनेक मार्ग आहेत. कुणाला श्रवणातून, कुणाला नुसत्या दर्शनातून तर कुणाला स्पर्शनातून म्हणजे प्रत्यक्ष सेवेतून मनःशांतीची, समाधानाची, आनंदाची प्राप्ती होते. कुणाला वाचन-मनन-चिंतनातून तर कुणाला नाम-ध्यान-अनुसंधानातून शांतमनाची प्राप्ती होते. अशा अनेक रंगी, विविध साधनांमध्ये संतांच्या, सद्गुरुंच्या चरित्रग्रंथाचे (शक्यतो ओवीबद्ध) पारायण अधिक सोपं नि प्रभावी वाटतं.
पारायण म्हणजे ग्रंथाचं नुसतं वाचन नव्हे. भागवत ग्रंथाच्या दशम स्कंधाचं – पूर्णावतार कृष्णचरित्राचं – पारायण अनेक वेळा केलं जातं. पण त्यानंतर नारायण – परायण झालं तर त्या पारायणाला अर्थ. नाहीतर ते फक्त वाचन. भक्तिभावानं, अर्थ लक्षात घेऊन असं वाचन केलं तर असं परायण होणं अवघड नाही. कीर्तनकार बुवांच्या पुढे ‘ह.भ.प.’ लावताना हाच अर्थ अभिप्रेत (अपेक्षित) असतो. ‘हरि भक्ति परायण’. जिकडे जाऊ, जे करु, जे अनुभवू त्यात नारायणदर्शन ही अनुभूती संतजीवन चरित्र वाचण्यातून मिळाली पाहिजे.
‘गुरुचरित्रांच्या पारायणानंतर गुरुच्या चरित्राचा एक तरी पैलू आपल्या चरित्रात जीवनात उतरायला हवा. ‘चरितार्थ’ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. एक चरितार्थ म्हणजे आपला उदरनिर्वाह. जसं हा व्यवसाय हे आमच्या चरितार्थाचं साधन आहे. दुसरा अर्थ अधिक बोलका आहे. महान व्यक्तींच्या जीवनाचा संदेश आपल्या जीवनात चरितार्थ बनला पाहिजे. आपल्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. त्या संदेशाचा संस्कार मनावर घडून तसं वागण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. पण कितीजण प्रत्यक्षात असं करतात? पारायणामागून पारायणं करत जातात. ‘पारायण सम्राट’ बनतात. त्याचा एक नवा अहंकार निर्माण होतो कारण ‘इतकी पारायणं केली असा सर्वत्र उच्चार-प्रचार केला जातो. यामुळे उद्धार होण्याऐवजी अधःपात मात्र होतो. जीवनपरिवर्तन घडल्याशिवाय श्रवण, आधंअधूरं, अर्धवट आहे.
असं गंमतीनं म्हटलं जातं … ज्ञानदेवांच्या पसायदानाच्या शेवटी जे म्हटलंय- ‘आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये | दृष्टादृष्ट विजये होआवे जी|’ म्हणजे ज्ञानेश्‍वरीवर कीर्तन-प्रवचनं करून व्याख्यानं देऊन आपली उपजीविका (उदरनिर्वाह) चालवणं हा अर्थ ‘उपजीविये’ शब्दाचा आहे, असं अनेकांना वाटतं. खरं तर ‘दृष्टादृष्टविजये होआवे जी’ ही अपेक्षा ज्ञानोबा-माउलीची आहे. जे भोग भोगताना का भोगतोय हे कळतं हे ‘दृष्ट’ अन् आपल्याला हे का भोगावं लागतंय हे कळत नाही हे ‘अदृष्ट’ अशा सर्व प्रकारच्या ‘दृष्टअदृष्ट’ घटना-प्रसंगांवर, त्यांच्या परिणामांवर, त्यातून आपल्यासाठी निर्माण होणार्‍या भोगांवर विजय मिळवायला हवा. म्हणजे सारं हसत स्विकारायला हवं. ही पसायदानाची एक फलश्रुती आहे.
ग्रंथाचं पारायण हा अनेकांच्या उपासनेचा महत्त्वाचा भाग असतो. रोज एक अध्याय किंवा ग्रंथाचा विशिष्ट भाग वाचणं किंवा ग्रंथातच साप्ताहिक – मासिक पारायणाचा विधी सांगितलेला असतो. अनेक महाभाग एका दिवसात पारायण, त्यातही सप्ताह करणारे असतात. हे केवळ कामगार डोक्यावरच्या पाट्या जशा टाकतात, म्हणजे रिकाम्या करतात तसं वाचन असतं. ग्रंथ वाचून (एकदाचा) संपला की झालं. असं करण्यात आपण इतरांना नाही तर स्वतःला फसवत असतो. ती आपली आत्मवंचना असते. अशा व्यक्तीला कोण वाचवू शकेल?
आणखी एका गोष्टीचा विचार करायला हवा. अगदी छोट्या स्तोत्राचीसुद्धा शेवटी ‘फलश्रुती’ दिलेली असते. मराठीतलं ‘भीमरुपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र किंवा संस्कृतमधलं ‘प्रणम्य शिरसा देवं’ हे गणपती स्तोत्र अनेकांच्या नित्यपठणात असतं. या छोट्या स्तोत्रांनाही किती विस्तृत फलश्रुती दिलीय. ती मिळत मात्र कुणाला नाही. ‘भीमरुपी’ स्तोत्राची फलश्रुती पाहू या –
‘ धन-धान्य-पशुवृद्धी – पुत्र -पौत्र समग्रही |
पावती रूप – विद्यादि स्तोत्रपाठें करुनिया ॥
भूत प्रेत समंधादि रोगव्याधि समस्तही |
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥
या चार ओळीत काय सांगितलेलं नाहीय? विचार करून पाहू या.
अगदी लहानपणापासून वर्षानुवर्षं हे स्तोत्र म्हणणार्‍यांना या गोष्टी प्रत्यक्षात लाभल्या आहेत? मारुतीचं दर्शन शनिवारी – मंगळवारी – किंवा अगदी रोज नियमाने घेणार्‍यांना ‘नासती तूटती चिंता’ याचा अनुभव आलाय? नसेल तर का आला नाही याचा विचार नको का करायला? स्तोत्रकारांनी स्तोत्रातच ते कसं म्हणावं हेही किती वेळा व केव्हा म्हणावं हे सांगितलेलं असतं. नेमकं तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. हेच पहा ना-
सर्व चिंता दूर होतील – आनंदे भीमदर्शने! म्हणजे हनुमंताचं आनंदानं दर्शन घेतलं (घेत राहिलं) तर चिंतामुक्त होता येईल. यात आनंद आणि दर्शन हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. बर्‍याच वेळा दर्शनाला गेल्यावर ही मोठी रांग पाहून आपल्या ‘कपाळावर आठ्या उमटतात, आपली तिडिक उठते, खरं ना? नंतर नारळ, तेल, रुईच्या पानांची माळ घेताना तिथं चाललेल्या व्यापाराची (क्वचित गैरव्यवहाराची) आपल्याला चीड येते ना? प्रत्यक्ष रांगेत उभं राहिल्यावर मारुतीच्या शेपटीप्रमाणे ती न संपणारी रांग पाहून बरोबर असलेल्या व्यक्तीशी आपण बोलतो ती टीका – निंदा या स्वरुपाची चर्चा असते. एकटे असलो तरी मनात असे अस्वस्थ करणारे विचारच येतात. किती जणांच्या मनात नामस्मरण, ओठावर मारुतीचं नाम (स्तोत्र) असतं? हे जर ‘आनंदे भीमदर्शने’ नसतं तर सार्‍या चिंता मिटतील कशा? हे सहज समजण्यासारखं आहे.
सार्‍या स्तोत्रांच्या आवर्तनाची किंवा संतांच्या चरित्रग्रंथांच्या पारायणाची अशीच स्थिती आहे. अशा केवळ औपचारिक भक्तीतून अपेक्षित फलश्रुती कधीही लाभणार नाही.
आता मुख्य प्रश्‍न आहे – ‘फलश्रुती’ या शब्दाच्या अर्थाचा.
श्रुती म्हणजे ऐकणे – श्रवण करणे. स्तोत्र म्हटलं, फलश्रुती म्हटली व ऐकली. झालं काम?
संत हुशार असतात. ते ‘फलप्राप्ती’ असा शब्द वापरत नाहीत. आणखी एक असते – फलनिष्पत्ती. हिला शिक्षणशास्त्रात महत्त्वाचं स्थान असतं. तसं जीवनातही असतं.
‘निष्पत्ती’ म्हणजे एखाद्या कृतीतून जे आपोआप निर्माण होतं ते किंवा जे व्हायला हवं ते. शिक्षक प्रश्‍न विचारतो त्याची शैक्षणिक निष्पत्ती (एज्युकेशन आउटकम्) अपेक्षित असते. दुसर्‍या शब्दात शिक्षकाचा प्रश्‍न हे विद्यार्थ्यांसाठी ‘इनपुट’ असतं तर त्या प्रश्‍नाचं मिळालेलं उत्तर (किंवा न मिळालेलं उत्तर सुद्धा) हे शिक्षकासाठी ‘आउटपुट’ असतं.
स्तोत्र म्हणणं हे जर माझ्यात मीच केलेलं ‘इनपुट’ असेल तर स्तोत्रात दिलेली फलश्रुती ते आउटपुट किंवा आउटकम असलं पाहिजे. पण किती जणांना असा अनुभव येतो. समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध ग्रंथाच्या आरंभी प्रदीर्घ फलश्रुती दिलीय, पण त्याच्या आरंभी ते काय म्हणतात ते सर्वांत महत्त्वाचं आहे.
आता श्रवण केलियाचे फळ | क्रिया पालटे तत्काळ ॥
तुटे संशयाचे मूळ | येकसरां (म्हणजे एकदम) ॥
‘क्रिया पालटे तत्काळ’ नि ‘तुटे संशयाचे मूळ’ ही खरी फल‘श्रुती’.
अनेकांची तक्रार असते इतक्या वेळा स्तोत्र म्हणा, ग्रंथाचं पारायण करा असं सांगितल्याप्रमाणे करुनही त्यात सांगितलेली ‘फलश्रुती’ मिळत नाही. याला काय करायचं? उदा. नित्यपठणातलं गणपती स्तोत्र – ‘प्रणम्य शिरसा देवम्’ यात शेवटी म्हटलंय-
‘द्वाशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः|
नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्‌भिर्मासैं फलं लभेत |
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः॥
म्हणजे रोज तीन वेळा (त्रिसंध्यं – उदा. स.६, दु.१२, सा. ६ अशी त्रिवार संध्या), किंवा मोठ्या फलप्राप्तीसाठी षड्‌भिर्मासैः म्हणजे सहा महिने किंवा आणखी सिद्धी प्राप्त व्हाव्यात म्हणून वर्षभर (संवत्सरेणं) या स्तोत्राची उपासना केली पाहिजे.
इथंसुद्धा ‘फलश्रुती’ लाभत नाही हीच तक्रार आहे. पण फलश्रुती म्हणजे फलप्राप्ती नव्हे. श्रुती म्हणजे वेद, उपनिषदं यातील ज्ञान. म्हणजेच नुसतं कॅसेटसारखं पठण नाही. तर पठण – श्रवण – वाचन – मनन- चिंतन – ध्यान या सार्‍या गोष्टी केल्या तर फल‘श्रुती’चा अर्थ कळेल. निश्चित कळेल. उदा. मूल व्हावं म्हणून एखादं व्रत केलं; ग्रंथाची पारायणं केली; मंत्राचा जप केला पण तरीही मूल झालं नाही. यावरून काय समजायचं?
* आपल्या प्रारब्धातच मूल नाही. हे स्वतःला नीट समजून देणं महत्त्वाचं आहे.
* घरातल्या इतर सदस्यांची, घरातील मोलकरणीच्या किंवा बागेत-शेतात मोलमजूरी करणार्‍यांच्या एखाद्या कामगाराची मुलं आपली मानून त्यांची काळजी घ्यायला काय हरकत आहे? त्यांना आपली मुलं मानायला काय अडचण आहे?
* एखाद्या अर्भकालयाला, अनाथाश्रमाला आर्थिक साहाय्य करायला काय हरकत आहे? अशा वागण्यात व विचार करण्यात खरी स्तोत्राची वा पारायणाची फलश्रुती आहे.
थोडक्यात- * ग्रंथ वाचताना किंवा वाचून झाल्यावर मिळणारं समाधान, आनंद ही फलनिष्पत्ती आहे. * प्रत्यक्षात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे घडलं किंवा मिळालं किंवा तसा अनुभव आला ही झाली वाचनाची (ग्रंथपारायणाची) फलप्राप्ती.
* मनाला हवं तसं घडलं नाही तरी विचार करून आनंदात परिस्थितीचा स्विकार करून सदैव आनंदात राहणं ही झाली ‘फलश्रुती’. अशी फलश्रुती देते मनःशांती!