भाग- १५ चला महाबळेश्वरला जाऊ…

0
155

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर

बालकवी त्यांच्या स्नेह्याकडे वाईला आले होते. ते पुढे फिरायला म्हणून पांचगणी- महाबळेश्वरला ऐन श्रावणात आले. गाडीतून जाताना खोर्‍यातली शेते बघून आणि सर्वत्र पसरलेल्या ओल्या हिरवाईला पाहून त्यांना ‘श्रावण मासी हर्ष मानशी, हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता सुचली असे सांगतात.

पांचगणी पाहून झाल्यानंतर आपसुकच आपली पावले वळतात ती महाबळेश्वरकडे, जे ‘हेवन ऑफ महाराष्ट्र’ म्हणून प्रसिद्ध आहे! पांचगणीपेक्षा अधिक उंचीवरचं हे ठिकाण. थंडीत कधीकधी पहाटे दंव थिजून त्याचे ‘हिम’ होते तेव्हा शून्याच्या आसपास तापमान असते. वेण्णा लेकच्या पाण्याचा पृष्ठभाग थिजतो. हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात बोचर्‍या वार्‍यामुळे जास्त थंडी असते. गारेगार हवा, बोचरे वारे आणि दाट धुक्याची पसरलेली साय असं याचं रुपडं दिसतं. तर कधी धुक्याच्या तलम ओढणीत लपलेल्या महाबळेश्वरचे दर्शन घेणे अवघड जाते. पण उन्हाळ्यात मात्र लख्ख उन्हात तळपून निघणारा परिसर मन मोहून टाकतो. हिरव्यागार हिरवाईत वसलेले हे गाव पांचगणीच्यापेक्षा जरा मोठे आहे. पावसाळ्यात ऋतू हिरवा इथे प्रत्यक्षात अवतरलेला असतो. पांचगणीहून जाताना पुन्हा वळणांची वाट सुरू होते, पण ती वर चढत नाही तर डोंगराच्या माथ्यावरूनच जाते. पांचगणीपासून सात किलोमीटर अंतरावर आधी भिलार लागते, नंतर पुढे आणखीन बारा कि.मी. गेल्यावर महाबळेश्वर आहे.
पावसाळ्यानंतर गेलं तर समोरच्या डोंगरावरून खळाळत येणारे छोटे-छोटे धबधबे वाटेत दिसतात. श्रावणात ऊन-पावसाचा लपंडाव पाहायला मिळतो आणि हवेतला गारवा अंगावर सरसरून काटा उभा करतो. उंच झाडांवरची पाने आपल्या पानांच्या जिभल्या बाहेर काढून पाऊस थेंबांना पिऊन घेताना दिसतात, तर दाट झाडीतून अंग चोरून हळूच आत शिरकाव करू पाहणारी सूर्यकिरणे नजरेस पडतात. पांचगणीहून महाबळेश्वरकडे जाणार्‍या रस्त्यावर- भिलारला- पुस्तकांचे गाव म्हणून जगभर प्रसिद्धी मिळाली आहे. बालकवी त्यांच्या स्नेह्याकडे वाईला आले होते. ते पुढे फिरायला म्हणून पांचगणी- महाबळेश्वरला ऐन श्रावणात आले. गाडीतून जाताना खोर्‍यातली शेते बघून आणि सर्वत्र पसरलेल्या ओल्या हिरवाईला पाहून त्यांना ‘श्रावण मासी हर्ष मानशी, हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता सुचली असे म्हणतात. याच रस्त्यावर पारशी पोइंट आहे. तिथे थोडे थांबून खाली दूरवरचे दिसणारे कृष्णा नदीचे खोरे न्याहाळता येते. जून ते ऑक्टोबर हा कालावधी इथे यायला चांगला आहे. उन्हाळ्यात हिरव्या हिरवाईची जादू कमी झालेली असते आणि हळद चढलेल्या नवरीसारखी वनराई पिवळसर होऊन जाते. इकडे सगळे डोंगर काळ्या कभिन्न कातळाचे आहेत, त्यांना चित्रविचित्र सुळक्यांची टोके आहेत. नैसर्गिक कडे-कपारी आणि बुरुज आहेत. सगळ्या परिसराला पाहून केशवसूतांनी ‘कडी कपारी दगडांच्या अन् खडकांच्या देशा…’ असे महाराष्ट्र गीत लिहिले त्याची प्रचीती येते.
महाबळेश्वरला आत जातानाच आधी टोल भरावा लागतो. इथे खूप टुरिस्ट येतात म्हणून इथल्या नगरपालिकांसाठी उत्पन्नाचे एक साधन म्हणून. टोलनाक्यानंतरचे पहिलेच ठिकाण म्हणजे इथला जलाशय ज्याचे नाव आहे ‘वेण्णा लेक.’ हा एक रमणीय टुरिस्ट स्पॉट आहे. तिथे तुम्ही नौकाविहार करू शकता. दोघांसाठी पायडल मारून चालवायची बोटही असते किंवा मोठी बोट घेऊन या सरोवराची सफर करू शकता. संध्याकाळी रंगीत कारंजी सोडून सुशोभित केले जाते. ज्यांचे काश्मीरच्या शिकार्‍यात बसून ‘दाल लेक’ची सफर करायचे स्वप्न राहून गेले असेल त्यांनी इथे तरी ती मजा अनुभवावी. चहूकडे गर्द हिरवी झाडी. गोव्याच्या माणसाला मायलेकची आठवण येईल तसाच माहोल इथे आहे. फरक इतकाच की हवा थंड आणि कोरडी. शिवाय रस्त्यावर खाणीचा आणि खाणीच्या धुळीचा फुफाटा नाही.
येथे येणार्‍या बर्‍याच पर्यटकांत बहुसंख्य नवीन लग्न झालेली जोडपी मधुचंद्राला आलेली असतात. त्यांना जोडीने नौकाविहारच करण्याचे आकर्षण वाटते. महाबळेश्वरमध्ये घोड्यावर बसून मारलेली रपेट हा एक वेगळाच आनंद देणारा इव्हेंट असतो. जागोजागी घोडेवाले उभे असतात. लग्नात किंवा लग्नानंतर घोड्यावर बसायची संधी न मिळालेले आपली हौस भागवून घेतात. छोटी मुले, बायका यांनाही हौसेने घोड्यावर बसता येते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दाट झाडींचं अधिराज्य असलेली वनश्री घोड्यावरून न्याहाळण्यात एक वेगळीच मजा असते. एकसारखी दाटीने वाढलेली जंगली झाडे नि लता-वेलींनी गुरफटलेल्या पायवाटा मधून मधून डोकावतात. पांचगणीतील सिल्व्हरओकची झाडे मात्र इथे दिसत नाहीत, ती फक्त पांचगणीची मक्तेदारी. मात्र जांभूळ, फणस, हिरडा, बेहडा, साग, कवठ अशा कितीतरी झाडांनी ही वने श्रीमंत केलेली आहेत. माकडांसाठी खाण्यासाठी भरपूर रानमेवा असल्याने माकडांची संख्या इथे खूप आहे आणि प्रत्येक पॉइंटवर ती तुम्हाला दिसतात. तसेच घोडेवाले आणि घोडे यांचाही नेहमी न दिसणारा वावर इथे जास्त प्रमाणात दिसतो. सिझनचे महिने त्यांचा उद्योगपाणी चालतो, एरव्ही पावसाळ्यात आराम असतो.
महाबळेश्वर म्हणजे निसर्गदेवतेला पडलेलं एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल. त्या निसर्गसौंदर्याची भुरळ इंडियात आलेल्या ब्रिटिशांना पडली. ते तळातल्या उष्ण हवेने कासावीस होत. मग उन्हाळ्यात सगळा लवाजमा घेऊन अशा हिलस्टेशनवर राहत. त्यांचे ऑफिस, बटलर, गडी इत्यादी सर्व काही महिन्यासाठी इथे शिफ्ट व्हायचे. त्यांच्यापाठोपाठ संस्थानिक आणि नवाब येत, आणि गडगंज पारशी व्यापारीसुद्धा! फक्त उन्हाळ्यात वापरले जाणारे कित्येक बंगले या गावाच्या आसमंतात आहेत. इतर दिवसांत फक्त माळ्याचे राज्य असते. यात अलीकडे फरक होऊ लागलाय. काही ब्रिटिश अधिकारी रपेट करून एखाद्या डोंगराच्या सुळक्यावर बसून निसर्ग पाहत. ती त्यांची निरीक्षणाची फेव्हरेट जागा ठरे. कालांतराने त्या जागेला त्या-त्या साहेबाचे नाव पडले. असे उंचावरचे पॉइंट्‌स तयार केले जिथून आजूबाजूचा निसर्ग पाहण्याचे सुख अनुभवता येईल या हेतूने त्यांनी त्या जागा डेव्हलप केल्या. तिथे सहजपणे जाता येईल असे चांगले रस्ते बनवले. एलफिस्टन पॉइंट, लोड्विक पॉइंट, विल्सन पॉइंट, ऑर्थरसिट पॉइंट, केट्स पॉइंट अशी ही नावे अजूनही वापरली जातात. (अजून मराठी अस्मितेचा वाघ तिथे पोहोचला नाही असे दिसते.)