तृप्तीचा ढेकर

0
343

– सौ. पौर्णिमा केरकर

चोर्ल्याला असलेले उज्ज्वलाचे लग्न असेच एका शेणाने सारवलेल्या मातीच्या अंगणात झाले. वराच्या घरीच पत्रावळीवर पंगत बसवली. वाढणारे समूहाचे तरुण हात प्रेमाने कार्यरत होते. जेवतानाचा तृप्तीचा ढेकर जुन्या आठवणींसकट मोठा आनंद देऊन गेला.

बर्‍याच वर्षांनी खूप सुंदर, साध्या, निसर्गरम्य परिसराला साक्षी ठेवून संपन्न झालेल्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहता आले. त्यामुळे आजच्या विवाहसोहळ्यांच्या गर्दीत अशा जरा हटके झालेल्या या विवाहाने माझ्या पूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आई-बापाविना पोरकी, अनाथ पोरगी उज्ज्वला. सुरेशच्या म्हणजे आबाच्या घरी ती लहानाची मोठी झाली. त्या कुटुंबाचाच घटक बनून राहिली. तिने शालीआईची देखभाल मनापासून केली. ती गेल्यानंतर तर तिचं पोरकेपण अधिक विस्तारलं. पदरी शिक्षण कमी, त्यामुळे एखाद्या आस्थापनात नोकरी करून उदरनिर्वाह करायचा हा विचार करणेसुद्धा शक्य नव्हते. म्हणून ‘तिचे दोनाचे चार हात करणे’, ‘तिला उजवून टाकणे’, ‘गळ्यात लायसन अडकविणे’ हे कर्तव्यभावनेने करावेच लागले. त्यासाठी निवड झाली ती कर्नाटकातील ‘चोर्ला’ गावाची.
सह्याद्रीच्या पर्वतरागांत विसावलेला हा निसर्गसंपन्न गाव. कर्नाटक राज्यात जरी हा गाव येत असला तरी त्याचे भावनिक, सांस्कृतिक, नैसर्गिक अनुबंध सत्तरीतील केरी गावाशी खूप घनिष्ट. मातीची छोटी टुमदार घरे, गावठी कौलांची छप्परे, एकमेकांना खेटून असलेल्या घरांसमोर तेवढ्याच नेटक्या नितळतेने शेणाने सारवलेली अंगणे, मातीची छोटेखानी तुळस… घनदाट जंगल, तरीही पाण्याची वानवा असलेल्या या गावातील अंगणाच्या कडेकुशीला लावलेली फुलझाडे, तुळशीची रोपे सदाप्रसन्न, टवटवीतच होती. याला कारण म्हणजे भर उन्हाळ्यात तेथील हवेत असलेला गारवा. गोव्याचे माथेरान म्हणावे असा सत्तरीतील सुर्ल गाव आणि त्यालाच जोडून असलेले कर्नाटकातील चोर्ला, मान, हुळंद हे गाव. या गावांत वैशाख वणव्यातही फेरफटका मारला तरी हवेतील गारवा आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न करून टाकतो. या गावांतील बरेचसे लोक गोव्यात कामाधंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत. इथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर त्यांचे अधूनमधून सणासुदीला जेव्हा गावी जाणे होते, तेव्हा येथील राहणीमानाचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला असतो. आपली घरे सिमेंट-कॉंक्रीटची व्हावीत, टाईल्सचा सुळसुळीतपणा जमिनीवर यायला हवा असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे थोडी पुंजी जमा झाली की मातीच्या भिंती पाडून चिरेबंदी भिंती उभ्या करणे, जमीन उखडून त्यावर टाईल्स घालणे असा आधुनिक बाह्य बदल हे गाव आता हळूहळू घडवून आणत आहेत. काही काही घरे तर अशीच उदासवाणी, एकाकीपणाची वेदना उरी झेलत, मुसळधार पाऊस-वारा सहन करीत गेल्या काही वर्षांपासून उभी आहेत.
उपजीविकेची, विस्तारलेल्या शिक्षण प्रवाहाची साधने उपलब्ध नसल्याने मुलाबाळांच्या भवितव्याच्या भीतीने कुटुंबांचे स्थलांतर गोवा, बेळगाव, मुंबईसारख्या ठिकाणी झाल्याने हा गावही आपल्या गावपणाच्या खुणा हळूहळू मिटवून टाकणार आहे, असेच चित्र होऊ घातलेले असताना उज्ज्वलाच्या लग्नाच्या निमित्ताने पूर्वी माझ्या बालपणी काही प्रमाणात चालू असलेले पाच-पाच दिवसांचे लग्नसोहळे आठवले.
गावात एखाद्या वाड्यावर लग्न असले की ते लग्न त्या संपूर्ण वाड्याचेच असायचे. सगळी कामे सगळ्यांचीच असायची. वाड्यावरील एखाद्या मानकर्‍याचे घर अथवा ज्या घराचे अंगण मोठे लांबलचक असायचे, त्या घराच्या अंगणात लग्न ठरविले जायचे. नवर्‍याच्या लग्नात तर वधू अगोदरच येऊन त्या घरात थांबायची. नवरामुलगा वरातीबरोबर येताना जानोशासाठी म्हणून एका घरात बसायचा. आमच्या वाड्यावर जेवढी म्हणून नवर्‍यामुलांची लग्ने व्हायची त्यांतील बर्‍याचशा वरांचा जानोशा विधी आमच्या घरातच पार पाडला जायचा. याला कारण म्हणजे, आमच्या घराच्या शेजारचे आबाचे घर खूप मोठे होते. अंगणही लांबलचक. दरवर्षी दिवाळी सुट्टीत सामूहिकरीत्या श्रमदान करून मातीचे ‘खळे’ केले जायचे. आबा तर दिवसाला तीन-तीन वेळा पंधरा दिवसपर्यंत तरी हाती ‘पेटणे’ घेऊन थापटून थापटून ते खळे सुळसुळीत करायचा. पुढे मग मांडव घातला जायचा. त्याच्या मेडी कशा रोवल्या जाणार याची खूणसुद्धा तो त्याचवेळी करून ठेवायचा. एखादा दगड, नारळाची ‘सोडणं’ घालून त्या जागा तशाच सोडल्या जायच्या. त्या खळ्यात मग चुडतांची मल्ल विणून, शाकारणी करून मोठा मांडव- माटव- घातला जायचा. या मांडवात लग्न होवोत अथवा न होवोत, हा मांडव म्हणजे त्या घराची ती परंपराच होती. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसा-रात्री झोपण्यासाठी आणि खांब्यानी खेळण्यासाठी त्याचा भरपूर वापर मी आणि माझ्या सवंगड्यांनी केला. अशा या मांडवात वर्षाकाठी आठ-दहा तरी लग्ने व्हायची. जानोशाला नवरा आमच्या घरी असायचा. नवर्‍याबरोबर लग्नमंडपात जाण्याची संधी त्यानिमित्ताने मिळायची. आम्ही नवर्‍याकडची माणसे म्हणून सूक्ष्मसा अभिमान त्या नकळत्या वयात मिरवायला मिळाला होता. रंगीबेरंगी फोलीत गुंडाळलेले बुंदीचे खडखडीत लाडू, नाजूक तारीत गुंफून तयार केलेली रंगीत ‘क्रेप’, फोलींची फुले मिळविण्यासाठी मोठी धडपड सुरू असायची.
आमच्या वाड्यावरील बर्‍याचशा लग्नांत मलाच आमच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करावे लागायचे. दादा आहेरासाठी कधी पाच, तर खूप वेळा दहा, वीस रुपये आणि अगदीच कोणी जवळचे असतील तर पन्नास रुपयांची नोट घालून त्याला व्यवस्थित गोंद लावून चिकटवायचा. अहेराचे पाकीट फाडत असताना आतील नोट फाडली जाणार नाही याची ते पाकीट आडवं-तिडवं करून उजेडाला धरून परत परत खात्री करून घ्यायचा व पाकिटावर ‘नांदा सौख्य भरे’ असे नेटक्या, ठळक पण सुंदर अक्षरात लिहून ते माझ्याकडे द्यायचा.
दादाची ही सवय मलाही जडली. आजही पाकिटातून आहेर देताना पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. मुलीपेक्षा मुलाचे लग्न असले तर थाट मोठाच असे. मांडव घालण्यापासून तो जेवण रांधून वाढेपर्यंतची सर्व कामे, त्याशिवाय लग्नाच्या दिवसातील प्रत्येक विधी, त्यातील गमती-जमती, हास्यविनोद, नवरा-नवरीचे पारंपरिक खेळ, जेवण वाढणे, बाशिंग सोडणे, काकणे सोडणे, सांस्कृतिक, सांकेतिक संदर्भ, समूहाचा सहभाग, यातून निर्माण झालेल्या उत्स्फूर्त उत्साहात सारे पार पडत असे. लग्नघरात जेवण रांधताना पुुरुषांचा व बायकांचा सहभाग, तर मांडव रचण्यात पुुरुष व मुले यांची लगबग मोठी होती. स्वयंपाक करताना- फक्त फणसाची भाजी करताना- सर्वांनाच मुलांची आठवण यायची. कारण फणस खूप असायचे. ते कापून, त्याची बारीक-मोठी ‘शेडा’ करून, त्याची पात काढून टाकून, आतील आठल्या बाजूला करून ते भाजीसाठी तयार करायला खूप हातांची गरज भासायची. एरव्ही आम्ही मुलं उगाच इकडे-तिकडे बागडत उनाडक्याच करत असू. मोठी माणसे गरे सोलत असताना हळूच एखादा गरा तोंडात टाकला तर एक धपाटाही मिळायचा. त्यापेक्षा गरे सोलता सोलता सगळ्यांसमक्षच चार गरे सोलून टोपलीत टाकले तर दोन तोंडात टाकता येणार होते. म्हणून आम्ही गरे सोलण्याचा पर्याय निवडायचो. त्याला आणखीही काही कारणे होती. गर्‍यांचा राहिलेला चारकुटा बाहेरच्या काटेरी आवरणासकट काम करणार्‍या महिलांच्या पदराला, कासोट्याला, कधी केसांना बांधायचो व साळसूदपणे पळ काढायचो. छोटी मुलं झोपलेली असली तर त्यांना दाढी-मिश्या काढल्या जायच्या. या सगळ्या उत्साहात रात्र सरून जायची.
पत्रावळी फावल्या वेळात घरातच करून ठेवलेल्या असायच्या. त्यावर गरमागरम वाफाळलेला उकडा भात, वरण, सामारे, ताज्या कैर्‍यांचे लोणचे, सोजी आणि फणसाची भाजी… मायेने वाढणारे समूहाचे हात आग्रहाने खाऊ घालायचे. पत्रावळी चाटून-पुसून स्वच्छ केल्या जायच्या. पंगतीवर पंगती झडायच्या. कोणी वाढायचे, कोणी उष्टे काढायचे, कोणी भांडी घासायचे. मी हे केलं, मी भांडी घासणार नाही, मला वाढायचा कंटाळा येतो अशी वाक्ये त्या वयात कधी ऐकूच आली नाहीत. उलट सगळेच कसे शिस्तबद्ध आणि आत्मीयतेने केले जायचे. वाड्यावरील कोणाच्याही घरात लग्न असेल तर ते आमचेच घरचे कार्य आहे ही भावना होती. कोठेही झगमगाट, चकचकाट, प्रतिष्ठेचा देखावा, दागिन्यांचे प्रदर्शन, देण्याघेण्याचा मोठेपणा, हॉलची क्रेझ नव्हती. लाकडी बाकडा, त्यामागे एक चादररूपी पडदा, दोन्ही बाजूना दोन मुळापासून उपटून काढलेली घडासकट असलेली केळीची झाडे, त्याचेच मखर, तेच तोरण. बाकडा म्हणजेच सिंहासन. मध्येच एखादी कच्च्या कैर्‍यांनी लगडलेली डहाळी तोरणासारखी वापरलेली. अवतीभोवतीच्या निसर्गातील वस्तूंचा कल्पकतेने केलेला वापर. सगळीजणं समरसून सहभागी व्हायची. चोर्ल्याला असलेले उज्ज्वलाचे लग्न असेच एका शेणाने सारवलेल्या मातीच्या अंगणात झाले. वराच्या घरीच पत्रावळीवर पंगत बसवली. वाढणारे समूहाचे तरुण हात प्रेमाने कार्यरत होते. भरपूर जेवावेसे वाटले. आधुनिकतेच्या प्रवाहातील बदल त्यात होतेच, तरीसुद्धा खूप वर्षांनी जमिनीवर बसून, उजवा पाय छातीपर्यंत दुमडून, डावा हात जमिनीला टेकवून आणि उजव्या हाताने उजव्या पायाला वळसा घालून जेवतानाचा तृप्तीचा ढेकर जुन्या आठवणीसकट मोठा आनंद देऊन गेला.