ध्येयवेडा प्रणव!

0
305
  • शब्दांकन – नीला भोजराज

काही व्यक्तींमध्ये जन्मजातच एक चमक असते आणि त्याच्या जोडीला जर त्यांना पोषक आणि प्रेरणादायी बाळकडू त्यांच्या घरातल्या ज्येष्ठांकडूनच मिळाले तर विचारूच नका… आकाशाची उंची गाठायला त्यांना वेळ लागत नाही. गोव्याचा एक ध्येयवेडा तरुण प्रणव नेरूरकर याने गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी, त्यांना सहज मार्गदर्शन मिळावे यासाठी एक वेबसाइट www.upscfever.com तयार केली आहे. शिवाय भविष्यातही त्याला बरीच उत्तुंग भरारी घ्यायची आहे. जाणून घेऊया त्याच्याच शब्दात…

प्रश्‍न १ ः सर्वप्रथम तू मला हे सांग की तुझ्या मनात अशा प्रकारची वेबसाइट बनविण्याची आयडिया कशी आली? ती केव्हा आली व साकार केव्हा झाली?
– मी मुंबईतील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्‌युएशन पूर्ण केलंय (२०१२). जेव्हा मी थर्ड इयरमध्ये होतो तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात IAS अधिकारी बनायची इच्छा निर्माण झाली. पण माझ्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते. इंजिनिअरिंग संपल्यावर मी St फ्रान्सिस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून लागलो आणि तिथे शिकवताना मी इंटरनेटच्या उपयोगाने अभ्यास प्रारंभ केला. माझ्या नोकरीमुळे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या (२०१३-२०१५) आणि Ph.D (२०१६)च्या अभ्यासात गुंतल्यामुळे मी चार प्रयत्नानंतर ही यशस्वी होऊ शकलो नाही (२०१२, २०१३,२०१४, २०१५). पण या अनुभवाने मला जाणीव झाली की शासकीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना काय त्रास होतात. अभ्यासासाठी पुणे, दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांकडे जावे लागते आणि खासगी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्‌समध्ये शिकवावं लागतं. पण विद्यार्थ्यांचा वेळ जर अभ्यासाऐवजी दुसर्‍या शहरात स्थायिक होण्यात व्यर्थ जात असेल तर मग त्याचे खूप नुकसान होते आणि त्यांचा परिणाम काय होतो की ते हे सगळं करू शकत नाही. म्हणून मी विचार केला की अशी एक वेबसाइट तयार करावी जिथे सर्व शासकीय चाचणी परीक्षांसाठी मार्गदर्शन, अभ्यासयोजना, अभ्यासक्रम उपलब्ध होईल. अशी वेबसाइट सर्वांच्या उपयोगी येईल कारण अभ्यासासाठी लागणारी सर्व उपयुक्त सामग्री त्यांच्या मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवर उपलब्ध असेल आणि ते घरबसल्या अभ्यास करू शकतील. लोक अभ्यासाकरता जास्त वेळ देऊ शकतील आणि सर्व मोफत उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी पैसेपण मोजावे लागणार नाहीत. मी, माझे शिक्षक, विद्यार्थी आणि इंजिनिअरिंगचा माझा अनुभव एकत्र करून ही वेबसाइट बनवली आहे.
मी पोस्टग्रॅज्युएशनमध्ये असताना (जून२०१५) माझ्या दोन मित्रांच्या (माधव मुरकुटे आणि गोपाळ मुरकुटे) बरोबर ही वेबसाइट बनवली. त्यांनासुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनी पूर्ण सहयोग दिला. जुलै २०१५ पासून सप्टेंबर २०१६ पर्यंत आम्ही वेबसाईटचा कन्टेन्ट व वशीळसप तय्यार केला आणि ३ सप्टेंबर २०१६ पासून आम्ही ही वेबसाइट लॉंच केली. आज १७ चाचणी परीक्षांची पूर्ण माहिती तिच्यावर उपलब्ध आहे. आमच्या वेबसाईटचा ऍपसुद्धा मोफत डाउनलोड करून अँड्रॉइड फोनवर वापरू शकतो. वेबसाईटचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, इंग्रजी, सामान्यविज्ञान, संविधान आणि सामान्यज्ञानावर ३५० अध्याय लिहिले आहेत जे भारताच्या ८ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. इतक्या प्रमाणावर निःशुल्क माहिती कुठल्याही दुसर्‍या वेबसाइटवर आज उपलब्ध नाही.

प्रश्‍न २ ः तू गोव्याचा आहेस म्हटल्यावर आश्‍चर्य वाटले नाही. कारण गोव्याच्या मातीतच सर्व प्रकारचे टॅलेंट रुजलेले आहे. तरी तुझे आई-वडील काय करतात, ते जाणून घ्यायला आवडेल.
– गोव्यात तर टॅलेंट भरपूर आहे. गोंयकारांनी देशासाठी उत्कृष्ट काम करून आपले नाव गाजवले आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की या राज्यात माझं घर आहे. इथल्या लोकांनी मला घडवलं. मी मुंबईतल्या माझ्या मित्रांना सतत सांगतो की कोंकणी माणसांइतकी चांगली काळजी घेणारा कोणी नाही.
माझी आजी डेम्पे कॉलेजमध्ये लेक्चरर होती आणि आजोबा प्राचार्य- शांतादुर्गा उच्चमाध्यमिक शाळा, बिचोलीला होते. आईचे M.B.B.S. आणि M.D गोवा मेडिकल कॉलेजमधून झालेले आहे आणि वडलांचे एम्.बी.बी.एस्. आणि एम्.डी. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून झालं आहे.

प्रश्‍न ३ ः मला वाटलंच होतं की तुझे पालक नक्कीच उच्चविद्याविभूषित असतील! मला सांग, तू करिअरसाठी हीच लाइन कशी काय निवडलीस? आणि तू आज पीएचडी म्हणजे उच्चतम पदवी प्राप्त करणार आहेस, तर तू शिकण्याची प्रेरणा कोणाकडून घेतलीस? तुझे रोल मॉडेल कोण?
– लहानपणापासून नवीन गोष्टी बनवायची मला आवड होती आणि म्हणून मी इंजिनिअरिंग क्षेत्रात आलो. घरी आईबाबा डॉक्टर होते पण त्यांनी माझ्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. आमच्या घरी बरीच मंडळी शिक्षक असल्यामुळे मलापण त्या कामाची ओढ निर्माण झाली. माझ्या ‘आई’ला मी ‘रोल मॉडेल’ मानतो कारण S.S.C मध्ये तिला बिचोली तालुक्यात पहिला क्रमांक (मुलींमध्ये) मिळाला, १२ वी परीक्षेत गोवा राज्यात दुसरा क्रमांक आणि एम्.बी.बी.एस्.मध्ये प्रथम श्रेणी आणि मुंबई विद्यापीठात सर्वांत जास्त गुण (मुलींमध्ये) मिळवल्याबद्दल लेडी रेयचांदीचं पदक तिला मिळालं. तिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी आणि माझ्या भावाला अभ्यासात उत्कृष्ट व्हायचा प्रयत्न करण्याची खूप प्रेरणा मिळाली. वेबसाइट बनवण्यासाठी आणि Ph.D करण्यासाठी आईनीच मला प्रोत्साहन दिले!

प्रश्‍न ४ ः आपल्या पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण व्हावे असे तुला वाटते का? ते शक्य आहे का?
– डिजिटल इंडियामुळे आज तंत्रज्ञान वापरून अशी उपक्रम निर्मिती झाली आहे ज्यांचा काही वर्षांपूर्वी विचारसुद्धा करू शकत नव्हतो. पण ह्या शोधांचा सामान्य माणसाला लाभ होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. जर असे होत असेल तर डिजिटल दुफळी निर्माण होईल आणि वेळेसोबत ती वाढतच जाईल. म्हणून ह्याला थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे आणि लोकांचा त्यांना प्रतिसाद पण मिळतो आहे. तंत्रज्ञान वापरून परिवर्तन आणले जातेय. प्रशासन, शेतीच्या क्षेत्रांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणली जातेय आणि ह्याचा लाभ आपल्याला दिसणार आहे.

प्रश्‍न ५ ः आजची तुमची पिढी तसेच भावी पिढीसुद्धा खूप हुशार आहे, हे आम्हाला दिसतंच आहे. गोव्यातल्या भावी पिढीकरता तुला काय संदेश द्यावासा वाटतो? भविष्यातील गोवा कसा असेल, असं तुला वाटतं?
– आज गोव्यात अव्वल दर्जाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी संस्था आहेत आणि गोव्यात विद्यार्थ्यांना आज शिक्षणासाठी राज्य सोडण्याची आवश्यकता नाही. मेक-इन-इंडिया, स्टार्ट-अप-इंडिया या योजनांमुळे आपण आज नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि गोव्याला मुंबई, पुणे आणि बेंगळुरूसारख्या IT केंद्रांपासूनजवळ असण्याचा फायदा मिळेल. माझे स्वप्न आहे की अमेरिकेच्या ‘सिलिकॉन व्हॅली’सारखा प्रदेश गोव्यात असावा…
स्मार्ट सिटीसारखा. मला आपल्या गोव्याला एक स्मार्ट राज्य बघायचंय. पण हे शक्य करण्याची जबाबदारी तरुणांची आहे.

प्रश्‍न ६ ः गोव्यातील शिक्षण क्षेत्रात कोणकोणते बदल व्हावेत असं तुला वाटतं? कां?
– गोवा हा इतर राज्यांपेक्षा प्रगत आणि विकसित आहे. शाळांपासूनच विद्यार्थिनीमध्ये उद्योजकतेची इच्छा निर्माण करावी लागेल. ‘अटल इंनोव्हेशन मिशन’ ही एक चांगली योजना आहे ज्यामध्ये शाळांमध्ये प्रयोगशाळा बांधण्याचा समावेश आहे. कॉलेजेस आणि उद्योगांमध्ये टायअप करून तिथे incubation सेंटर स्थापन केले जाऊ शकते जे नवीन कल्पना आणि त्यातून नवीन उपक्रम निर्माण करण्यास प्रोत्साहन देईल. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या शाळांमध्ये इंनोव्हेशन स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात.

प्रश्‍न ७ ः पी.एच.डी. पूर्ण केल्यानंतर तुझा काय करण्याचा मानस आहे?
– माझी इच्छा आहे की तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करून असे उपक्रम निर्माण करू ज्यांच्या संशोधनाचा फायदा विकलांग व्यक्तीपर्यंत पोहचू शकेल.

प्रश्‍न ८ ः तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या वाटेवर तुला कोणकोणते पुरस्कार मिळाले? केव्हा मिळाले? त्याचे श्रेय तू कुणाकुणाला देऊ इच्छितोस?
– माझ्या वेबसाइटला V.J.T.I च्या उद्योजकता स्पर्धेत दुसरे स्थान मिळाले आणि ह्या स्पर्धेत देशातून कित्येक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मला ह्याचा अभिमान आहे आणि ह्याचे श्रेय मी माझ्या Ph.D पर्यवेक्षक डॉ. सुनील भिरूडशिरांना देईन.
पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये माझ्या शोधनिबंधाला ‘बेस्ट पेपर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’चा पुरस्कार एका संशोधन परिषदेत मिळाला आणि त्याचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईन.

प्रश्‍न ९ ः करिअरच्या क्षेत्रात आज सगळ्यात जास्त नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहे असं तुला वाटतं?
– IT मध्ये बिग डेटा, क्लाऊड कॉम्पुटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स ही नवीन क्षेत्रे स्थापित झाले आहेत आणि पुढचे दहा वर्ष तरी हे ह्या क्षेत्रात प्रबळ राहतील. ह्या सर्वांचा फायदा हा टेलिकॉम, कृषी, समुद्री वाहतुकीवर पडणार आहे आणि मला वाटतं ह्या सर्व क्षेत्रांत व्यवसायाच्या संधी असतील.
आपल्या देशात सर्वांत जास्त लोक कृषी आणि कापड ह्या व्यवसायात आहेत आणि सरकारसुद्धा नवीन योजना घोषित करत आहे. या क्षेत्रांसाठी, ह्या क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करणार्‍यांचा भरपूर लोकांना फायदा होईल.

प्रश्‍न १० ः तुझ्या स्वप्नातील गोवा कसा आहे? गोव्यातील लोकांसाठी भविष्यात आणखी काय करण्याचा तुझा मानस आहे?
– ज्या कुणालाही या शासकीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची इच्छा असेल त्यांनी काही अडल्यास माझ्याशी संपर्क करावा. माझ्याशी फोनवर (९६१९९९७७९७) किंवा ई-मेलवर ( pranav91@gmail.com) संपर्क करू शकता. मी मुंबईतील कॉलेजेस आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये ह्या परीक्ष्यांची माहिती देत असतो कारण मुंबईत आणि गोव्यात अशा परीक्ष्यांची जागरूकता कमीच आहे. मी आशा करतो की हा लेख वाचून गोव्यातील तरुणांना उद्योजकता किंवा IAS/IPS बनायचं प्रोत्साहन मिळेल.
स्टिव्ह जॉब्सचे अमूल्य शब्द विसरू नका- ‘स्टे हंगरी स्टे फुलीश!’