तंत्रशिक्षण आणि विद्यार्थी

0
296

– अनिल स. राजे (पर्वरी)

अनुभवी शिक्षक आणि निरनिराळ्या क्षेत्रातील इंजिनिअर्स यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केले तर ते सर्वांना फलदायी ठरू शकेल.

गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील विविध बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही औत्सुक्य आहे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचे. विविध महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था म्हणजे वैद्यकीय, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतनाच्या दारात आता विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडणार आहे. दहावीत उत्तम गुण घेणारे हुशार विद्यार्थी आता अकरावीत प्रवेश घेतील आणि आवडीच्या क्षेत्रात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून नंतर वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमांकडे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतील.
हे झाले हुशार विद्यार्थ्यांचे. पण सर्वसामान्य बुद्धीच्या मुलांचे काय? त्यांना गुणांची टक्केवारी कमी असल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नाही. अशा वेळी त्या मुलांचे पालक त्या मुलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडतात. मुलांच्या आवडी-निवडीचा कोणताही विचार केला जात नाही. पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी १२ वी उत्तीर्णाप्रमाणेच १० वी उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळतो. खूपशा पालकांना वाटते की १२ वी करून मध्ये प्रवेश मिळविण्यापेक्षा १० वी नंतर प्रवेश मिळविला तर मुलाची २ वर्षे वाचतील. आणि मग हे पालक आपल्या मुलांना १२ वी पर्यंत शिकण्याची संधी न देता १० वीनंतरच पॉलिटेक्निकमध्ये दाखल करतात.
पण मला वाटते की पालकांनी केलेला हा विचार अनेकदा नव्हे बहुधा समस्या निर्माण करतो. मी जर येथे मुलीच्या लग्नसमस्येची या समस्येची तुलना केली तर ते अयोग्य होणार नाही, असे मला वाटते. आपल्या भारतात मुलीच्या लग्नासाठी १८ वर्षांची अट आहे. मुलगी या वयात येईपर्यंत तिच्या शरीराची वाढ होऊन ती माता बनण्यास योग्य होते. त्याचप्रमाणे १२ वी उत्तीर्ण होईपर्यंत मुलांची आकलनशक्ती किंवा बौद्धिक क्षमता उत्तम तयार होते. १० वी उत्तीर्णांची ही आकलनशक्ती त्या मानाने फारच खालच्या पातळीची असते. त्यामुळे पॉलिटेक्निकच्या एकाच वर्गात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला एखाद्या विषयाचे जेवढे सहज आकलन होईल तेवढे १० वी उत्तीर्णाला होणे फार कठीण. त्यामुळे १० वी उत्तीर्णांना विषय समजण्यास अडचणी येतात. अनेकदा हे शिक्षण त्यांच्या डोक्याला अतिशय ताण देणारे ठरते आणि परिणामी पहिल्या, दुसर्‍या सेमिस्टरमध्येच त्याचा फटका त्यांना बसतो. अशी मुले एक, दोन विषयात नापास होतात. असे होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. शक्यतो १२ वी उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश घेणे उत्तम! पण जर १० वी नंतर प्रवेश घेतलाच तर अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी अधिक कष्ट घेण्याची तयारी करायला हवी.
अभ्यासक्रमास प्रारंभ झाल्यापासून केवळ २० आठवड्यात सेमिस्टरची मुख्य परीक्षा असते. तत्पूर्वी प्रत्येक ४ आठवड्यांनी पर्सनल असेसमेंट टेस्ट किंवा चाचणी परीक्षा असते. अशा दोनच परीक्षा असतात. त्या त्या विषयाचे प्राध्यापक चाचणी परीक्षेचे पेपर्स तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटी दाखवून सतर्क करण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालकही त्याकडे दुर्लक्षच करतात. कित्येक पालकांना अशा परीक्षा असतात, याची माहितीही नसते आणि बरेच विद्यार्थी आपण नापास झाल्याची माहिती पालकांना देत नाहीत.
प्रत्येक प्राध्यापकाला प्रत्येक विषय शिकवण्यासाठी ४० ते ५० तास मिळतात. या ठरावीक तासांत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. पण तेवढे तास पुरत नाहीत. त्यामुळे परीक्षांच्या निकालावर त्याचा परिणाम होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही मुले शिकण्यासाठी नव्हे तर केवळ मजा मारण्यासाठी वर्गात येत असतात. ते शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष तर देत नाहीतच पण शिक्षकांना व्यत्यय आणून दुसर्‍या चांगल्या विद्यार्थ्यांनाही नीट शिकू देत नाहीत. कृपया, पालकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि आपला मुलगा किंवा मुलगी पॉलिटेक्निकमध्ये काय करतो/करते याची पाहणी करावी व वेळीच योग्य तो उपाय योजावा.
या सार्‍या समस्या आणि अडचणी येथे समजावून सांगण्यामागे विद्यार्थी व पालकांमध्ये पॉलिटेक्निक शिक्षणाबद्दल भीती निर्माण करण्याचा माझा हेतू नसून मुलांना हे शिक्षण सोपे होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचाच हेतू आहे. मी स्वतः प्रथम श्रेणीचा मरीन इंजिनिअर असून मी जवळजवळ २८ वर्षे शिपबिल्डिंगचा व्यवसाय केला. इन्स्टिट्यूट ऑफ शिप बिल्डिंगचा मी फाउंडर मेंबर आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये १० वर्षे तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मरीन स्टडीजमध्ये दोन-तीन वर्षे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी काम केले. अनेक विषय मुलांना शिकवायला मिळाले. त्यांच्याशी हितगुज करावयास मिळाले. नापास झालेल्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडवता आला. गोवा बोर्डाचा पेपर सेंटर आणि पेपर करेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या एवढ्या अनुभवातून माझ्या लक्षात आले की १२ वी उत्तीर्णांच्या १० वी उत्तीर्णांचे मॅथेमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री यांचे ज्ञान कच्चे असते. त्यामुळे हे विषय समजून घेणे आणि त्या परीक्षांत पास होणे १० वी उत्तीर्णाला अवघड ठरते. विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला त्या विषयाचा कंटाळा येऊ लागतो. अशा वेळी मार्गदर्शन नसल्याने त्या विषयांत आपण कधीच उत्तीर्ण होणार नाही अशी भावना त्याच्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे तो परत परत त्या विषयात नापास होऊन त्याला एक प्रकारची उदासीनता येऊ शकते. इतर विषयातही नापास झाल्यास त्याचा बॅक लॉग वाढू लागतो. पुढे त्याला ब्लॉक देणे पॉलिटेक्निकला भाग पडते. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला पुढच्या सेमिस्टरला हजर राहता येत नाही.
या गोष्टीला पर्याय काय?
१) १२ वी विथ मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री-शिवाय प्रवेश देऊ नये.
२) १० वी उत्तीर्णांना बोर्डाचेच स्पेशल ट्यूशन्स देऊन शिकवावे.
३) किंवा स्पेशल क्लासेसमध्ये जाऊन ट्यूशन्स देणे.
शाळेतील ८ वी, ९ वी, १० वीचे विद्यार्थी तसेच ११ वी आणि १२ वी चे विद्यार्थी प्रायव्हेट ट्यूशन क्लासेसना जातात पण पॉलिटेक्निकच्या विषयांसाठी विशेष क्लासेस दिसत नाहीत. चांगल्या शिक्षकांकडे शिकून बर्‍याच विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या परीक्षेत फार उत्तम गुण मिळवले आहेत. मग या पॉलिटेक्निक्सच्या विषयांसाठी काही चांगल्या शिक्षकांनी असे क्लासेस कां काढू नयेत?
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दहावी परीक्षेत किमान ५०% गुण मिळवावे लागतात. अनुसूचित जातीजमातीसाठी हे प्रमाण ४०% एवढे असू शकते. एवढे गुण दहावीच्या परीक्षेत मिळविणे हे साधारण बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना सहज शक्य असते. मात्र अशा विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पॉलिटेक्निकचे विषय समजून घेण्यात तोकडी पडते. त्यामुळे अशा मुलांपैकी बरेच जण पहिल्या सेमिस्टरच्या अंतिम परीक्षेतच गटांगळ्या खातात. अशा विद्यार्थ्यांना दुसर्‍या सेमिस्टरला जाऊ दिले जाते (ए.टी.के.टी.) दुसर्‍या सेमिस्टरमध्ये आणखी काही विषयांत अपयश येते. त्यामुळे त्यांचा बॅकलॉग वाढत जातो. तद्नंतर बॅकलॉग फार वाढला तर पॉलिटेक्निक अशा विद्यार्थ्याला ब्लॉक देते. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला पुढच्या सेमिस्टरला हजेरी लावता येत नाही. काही विद्यार्थ्यांना हे शिक्षण पूर्ण करावयास ५-६ वर्षांहून अधिक अवधी लागतो. या अपयशाने अनेकजण खचतात. आमच्या नशिबाने गोव्यात किंवा इतर भागात अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या केल्याचे आढळून येत नाही. हे सारे टाळण्यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी, पॉलिटेक्निक्स, टेक्निकल बोर्ड यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
यशस्वी, कामसू आणि हुशार अभियंते निर्माण करण्याचे काम विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणसंस्था आणि टेक्निकल बोर्ड यांच्या संयुक्त कामगिरीनेच होऊ शकते. ‘ते कसे करावे’ हे करण्याच्या काही सूचना मी येथे देत आहे. त्याचा विचार व्हावा.
१) पालक काय करू शकतील?
१. तांत्रिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या बौद्धिक पातळीपेक्षा अनेक मुलांची पातळी असमाधानकारक असते. अशा प्रकारच्या मुलांना त्यांच्या पालकांनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश देण्याचा अट्टाहास करू नये.
२. हे केवळ डिप्लोमा शिक्षण आहे आणि त्यामुळे तो यशस्वीरीत्या पूर्ण करणे अवघड नाही असा भ्रम पालकांनी करून घेऊ नये.
३. पालकांनी आपल्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आपल्या मुलांवर लादू नयेत.
४. वर्गातील अभ्यासामध्ये मुलांनी केलेल्या प्रगतीचा मागोवा पालकांनी स्वतःहून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक चार आठवड्यांच्या कालावधीनंतर घेतलेल्या वैयक्तिक चाचणी परीक्षेत केलेल्या मुलांच्या कामगिरीवर पालकांचे दुर्लक्ष होता कामा नये. अशा प्रकारच्या चाचणी परीक्षा घेतल्या जातात याची जाणीवही अनेक पालकांना नसते आणि तशी जाणीव झाल्यावर कोणते पाऊल उचलावे हे त्यांना समजत नाही. याकरता पालकांनी प्राध्यापकांना नियमितपणे भेटून उपाय शोधून काढावा.
५. एकदा का पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळाला की तीन वर्षांच्या अखेरीस मुलाला निश्‍चितपणे मा सर्टिफिकेट मिळेल अशी बहुतांशी पालकांची दृढ समजूत असते. अर्थातच अशी समजूत करून घेणे चुकीचे ठरू शकते.

२) मुलांनी काय करावे?
१. मुलांनी आपापल्या वर्गात नियमितपणे उपस्थित असणे आवश्यक असतेच. तसेच वर्गातील अभ्यासाकडे त्यांनी एकाग्रचित्ताने लक्ष देऊन शिक्षण घेणे हे ही तेवढेच गरजेचे आहे.
२. शिक्षकांच्या संपर्कात राहून अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्याशी वैचारिक देवाण-घेवाण करणे ही गोष्ट अंतिमतः विद्यार्थ्यांच्याच हिताची असते. शिक्षकांना न घाबरता त्या त्या विषयाबद्दल प्रश्‍न विचारले तर ते शिक्षकांनाही आवडते हे विसरू नये.
३. अभ्यासाच्या बाबतीत वर्गातील प्रगतीची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना द्यावी. तसेच अधूनमधून घेण्यात येणार्‍या चाचणी परीक्षांचा निकाल पालकांना जरूर कळवावा. नापास झाल्यास त्याचा वाईट परिणाम अंतिम परीक्षेवर पडतो. तसेच या परीक्षांतले गुण शेवटच्या निकालामध्ये वाढवले जातात याची जाणीव ठेवावी.
४. टर्म मंजूर होण्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५% असणे गरजेचे असते. एखाद्या क्लासला हजेरी लावता आली नाही तर लगेच इतर विद्यार्थ्याकडून त्या क्लासच्या नोट्‌स घ्याव्यात आणि त्याचा अभ्यास करावा. उरलेली २५% उपस्थिती बहुतांश मुले ऑफिस किंवा कारखान्यात घेतल्या जाणार्‍या कॅज्युअल लिव्हप्रमाणे वापरतात. उपस्थितीचे प्रमाण कमी पडल्यास मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टरकडून घेतात व ती प्राध्यापकांना देतात. विद्यार्थी खरोखरच आजारी असेल तर असे सर्टिफिकेट डॉक्टरांनी जरूर द्यावे. परंतु अयोग्य ठिकाणी असे सर्टिफिकेट दिले तर ते विद्यार्थ्यांच्या खोटेपणाला उत्तेजनदायक होईल ही गोष्ट डॉक्टर मंडळींनी कृपया ध्यानांत ठेवावी.
५. शालेय जीवनात प्रत्येक विषयाला स्वतंत्र नोटबुक असते. तशीच स्वतंत्र नोटबुक्स प्रत्येक विषयाला वापरावीत. जवळ जवळ पॉलिटे.मधले ९०% विद्यार्थी एकाच विषयात सर्व विषयांच्या नोट्‌स वेगवेगळ्या करण्यातच बराच वेळ निघून जातो.
६. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी. तसेच परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे स्वरूप समजण्यासाठी गेल्या किमान तीन वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका सोडविल्यास त्या विषयांत पास होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
७. मुलांनी ग्रंथालयात ठेवलेल्या पुस्तकांचा आधार घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा. पॉलिटेक्निकमध्ये स्वतःहूनच बरेच विषय शिकायचे असतात. या बाबतीत गुगल, यु-ट्यूब वगैरेंचा भरपूर उपयोग होऊ शकतो हे ध्यानात ठेवावे.
८. टेक्निकल भाषेचा सराव करण्यासाठी टेक्स्टबुकमधला एक परिच्छेद दररोज लिहिणे उत्तम.

शिक्षकांना काय करता येईल?
गॉड क्रिएटेड मदर्स अँड व्हेन मदर्स वेअर आऊटनंबर्ड गॉड क्रिएटेड टीचर्स.
ईश्‍वराने माता निर्माण केल्या आणि जेव्हा मातांची संख्या कमी झाली तेव्हा त्याने शिक्षक निर्माण केले. वरील विधानामधून मोठा बोध शिक्षकांना मिळू शकतो.
मातेसारखा शिक्षक नाही. सर्व शिक्षकांनी जर मातेचं अनुकरण केलं तर ते जगातले सर्वोत्कृष्ट शिक्षक बनतील.
१. शिक्षकांनी विद्यार्थी वर्गाची बौद्धिक पातळी ओळखून त्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
२. मुलांना प्रत्येक विषयाची मुलभूत तत्त्वे समजावून सांगणे आवश्यक.
३. चाचणी परीक्षेत झालेल्या चुका मुलांना समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेअभावी सामूहिकपणे सांगितले तरी चालेल.
४. शिक्षकाने आपला विषय समर्पित भावनेने शिकवावा.
५. मुलांच्या मनात संबंधित विषयाबद्दल जिज्ञासा निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. अशी जिज्ञासा निर्माण झाली तर विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात.
६. साचेबद्ध अध्ययनपद्धतीमध्ये बदल घडवायचा असल्यास त्याबद्दल विद्यार्थ्यांबरोबर संवाद करूनच करावयास हवा.

४) टेक्निकल बोर्ड आणि पॉलिटेक्निक्सना काय करता येईल?
१. बोर्डानी अभ्यासक्रमाची उजळणी अशाप्रकारे करावी जेणेकरून अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना (१० वी पास विद्यार्थ्यांसहित) सहज उमगू शकेल. किंवा जमल्यास १० वी पास विद्यार्थ्यांसाठी आणखी दोन सेमिस्टर वाढवावे.
२. प्रवेश देण्यापूर्वी सर्व मुलांची प्रवेश परीक्षा घ्यावी.
३. बोर्डाने सर्व शिक्षकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून शिक्षक व्हिडिओ रेकॉर्डेड प्रॅक्टिकल्स, ऍनिमेशन, मॉडेल्स इ.चा वापर करून ते विषय विद्यार्थ्यांना आवडतील असे बनवतील.
४. चाचणी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना स्पेशल ट्यूशन्स देऊन ते विषय सोपे करून द्यावे.
५. पालकांना चाचणी परिक्षांचा निकाल लेखी आणि फोनवर कळवावा.
६. विद्यार्थी वर्गात गैरहजर राहात असेल तर लगेच पालकांना फोनवर व पत्राने कळवावे. तसेच विद्यार्थी गैरवर्तणूक करत असेल तर पालकांना ताबडतोब कळवावे.
७. गैरहजेरींच्या बाबतीत कठोर राहणे अत्यंत निकडीचे आहे.
८. वर्गात विद्यार्थ्यांना मोबाइलचा वापर करू देऊ नये.
९. जर्नल्सना पर्याय शोधून काढावा. निदर्शनाला आलेली एक महत्त्वाची गोष्ट- अगदी थोडेच विद्यार्थी स्वतःहून जर्नल्स पूर्ण करतात. बाकी विद्यार्थी त्यांची कॉपी मारतात. विद्यार्थी जर्नल्सचे काम सेमिस्टरच्या शेवटी करतात. त्यामुळे शिक्षकांना विषयांची उजळणी करण्यास वेळ मिळत नाही.
आता डिप्लोमा अभियंत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो-
… भारतात यांना आम्ही डिग्री इंजिनिअर्सना अधिक मान देतो. यामागचे कारण बहुधा डिग्री कोर्सचा अभ्यासक्रम तुलनेने अधिक कठीण असतो. डिग्री कोर्सला असलेला तपशीलवार अभ्यासक्रम १२ वी परीक्षेत अतिउत्तम गुण घेऊन पास होणारे विद्यार्थीच करू शकतात.
भारतात डिप्लोमा इंजिनिअर्सना दुय्यम दर्जा दिला जातो. एखाद्या कंपनीत मालक डिग्रीवाल्यांनाच पसंत करतात. डिप्लोमावाल्यांना त्यांच्यापेक्षा अधिक प्रात्यक्षिके करावी लागतात. या महत्त्वाच्या गोष्टीकडे मालक वर्गाचे दुर्लक्ष होते.
डिप्लोमा इंजिनिअर्सकडे किती कनिष्ठ पातळीवरून पाहिले जाते ते लक्षात घ्यावे.
दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे माध्यमाची. विद्यार्थी वर्ग तांत्रिकदृष्ट्या शुद्ध भाषेचा वापर करत नाही.
विविध पॉलिटेक्निक्समध्ये मिळणार्‍या कोर्सेसची आणि ते पूर्ण केल्यावर मिळणार्‍या नोकर्‍यांची किंवा चालू करू शकणार्‍या उद्योगधंद्यांची माहिती बोर्डांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ९वी, १०वीत असताना सविस्तरपणे देणे गरजेचे आहे. वास्को या शहरामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी नावाची संस्था गेली ३० वर्षे विद्यार्थ्यांना जहाज बांधणी आणि जहाजं दुरुस्त करण्याचे तंत्रज्ञान देत आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मरीन स्टडीज ही संस्था डिग्री व डिप्लोमा इंजिनिअर्सना जहाजे चालवण्याचे तांत्रिक प्रशिक्षण वास्कोमध्ये गेली १० वर्षे देत आहे. या संस्था स्थापन होऊन येवढा काळ जाऊनही गोव्यात आणि गोव्याच्या आसपासच्या मंडळींना या संस्थांची माहिती नाही.
अनुभवी शिक्षक आणि निरनिराळ्या क्षेत्रातील इंजिनिअर्स यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केले तर ते सर्वांना फलदायी ठरू शकेल.
चला आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून याच पॉलिटेक्निकमधून कार्यदक्ष आणि हुशार इंजिनिअर्स तयार करुया आणि देशाच्या भरभराटीला हातभार लावू या.