भारतीय लष्कराने घडवली पाकला अद्दल

0
84

>> दहशतवाद्यांना मदत करणार्‍या पाकच्या चौक्या तोफांच्या वर्षावाने केल्या उद्ध्वस्त

गेल्या सप्टेंबरमधील पाकविरोधात सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने चालू महिन्यातच एका मोठ्या कारवाईद्वारे भारतात दहशतवाद्यांना घुसण्यास मदत करण्याच्या कृतीचा तसेच अलीकडेच भारतीय सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना करण्याच्या कृतीचा बदला घेत पाकिस्तानला मोठा हादरा दिला. भारतीय लष्कराच्या या पराक्रमाची झलक दाखवणार्‍या कारवाईचा व्हिडिओही भारतीय लष्कराने एका पत्रकार परिषदेत सादर केला. या कारवाईसाठी भारतीय लष्कराने अत्यंत अद्ययावत व शत्रूची मोठी नुकसानी करणार्‍या शस्त्रास्त्रांचा वापर केला. मेजर जनरल अशोक नरुला यांनी ही माहिती दिली.

भारतीय सैनिकांना गोळीबारात गुंतवून ठेवत दुसरीकडून भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून न घेता अशा प्रकारे उत्तर दिले जाईल. हा संदेश या कारवाईतून पाकला दिला आहे, असे नरुला यांनी स्पष्ट केले. भारतीय लष्कराने या कारवाईवेळी शत्रूंचे खंदक (बंकर्स) उध्वस्त करणार्‍या बंदुका, रॉकेट लॉंचर्स, रणगाड्यांवरील क्षेपणास्त्रे, स्वयंचलीत ग्रेनेड लॉंचर्स व अन्य अद्ययावत शस्त्रास्त्रांचा वापर करून पाकच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या. यावेळी दाट धुराचे लोळ तसेच स्फोटांच्या प्रचंड आवाजाने सदर प्रदेश हादरून गेला. पाक चौवक्यांना लक्ष्य करण्याबरोबरच भारतात घुसखोरी करण्याची ठिकाणेही नष्ट करण्यात आल्याचे नरुला यांनी सांगितले. या कारवाईवेळी १०-१५ पाक सैनिक ठार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
अलीकडेच पाक सैनिकांनी एका भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. तसेच त्याआधी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बेसावध भारतीय लष्करी छावण्यांवर हल्ले केले होते. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. असे नरुला यांनी सांगितले.
हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळण्याच्या कालावधीत पाकमधून घुसखोरीचे प्रमाण वाढत असते. आता बर्फ वितळण्याची क्रिया सुरू होऊ लागल्याने लवकरच पुन्हा घुसखोरी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
प्रथम कारवाई ९ मे रोजी
भारताने पाकविरुध्दच्या या कारवाईची जाहीर वाच्यता काल केली असली तरी प्रत्यक्षात ही कारवाई ९ मे रोजी नौशेरा भागात प्रथम करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर २०-२१ मे रोजी नौगाम भागात पुन्हा अशीच कारवाई करताना चार दहशतवाद्यांनाही ठार केले.
जनरल विक्रम सिंग
यांच्याकडून अभिनंदन
दरम्यान, जनरल विक्रम सिंग यांनी लष्कराच्या या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पाकच्या कारवायांना अशा प्रकारे प्रत्युत्तर दिल्याबद्दल आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरी युवक चुकीच्या
वाटेने जाणार नाहीत
ही कारवाई म्हणजे भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी डावपेचांचा एक भाग होता. ज्यामुळे अनेक दहशतवादी आमच्या जाळ्यात सापडतील. तसेच काश्मीरमधील युवकही चुकीच्या वाटेने जाण्यापासून परावृत्त होतील असे नरुला यांनी सांगितले.
भारताची प्रशंसनीय
रणनीती : कर्नल थापर
कर्नल व्ही. एन. थापर यांनी भारतीय लष्कराच्या या आक्रमक रणनीतीची प्रशंसा केली आहे. अशी कारवाई याआधीही व्हायला हवी होती असे ते म्हणाले. पाकच्या कुरापतींना हाणून पाडण्यास भारत सज्ज असल्याचा हा संदेश आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कॉंग्रेसकडून लष्कराची प्रशंसा
भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईची कॉंग्रेस पक्षाने प्रशंसा केली आहे. त्याचवेळी केंद्रातील भाजप सरकारकडून भारतीय लष्कराला योग्य प्रमाणात पाठबळ दिले जात नसल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव आणण्यात केंद्र सरकार कमी पडत असल्याचा दावा त्यांनी केला.

भारतीय लष्कराचा दावा पाकिस्तानने फेटाळला
पाकिस्तानच्या अनेक लष्करी छावण्या भारतीय लष्कराने उध्वस्त केल्याचा दावा भारताने केला असला तरी पाकिस्तानने असे काही घडल्याचा इन्कार केला आहे.
भारतीय लष्कराचा वरील दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण पाक लष्कराने केले आहे. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी तशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाक सैनिकांकडून नागरिकांवर गोळीबार केला जात असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.
दरम्यान, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना प्रसारमाध्यमांनी याविषयी छेडले असता आपल्याला पाकिस्तानमधून या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवलेले पाकिस्तानला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.