गोव्यातील राज्यसभा निवडणूक संगनमतानेच लांबणीवर : कॉंग्रेस

0
95

नियोजन आयोग, निवडणूक आयोग, सीबीआय या स्वतंत्र संस्था भाजपने नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र रचले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जारी केलेली अधिसूचना मागे घेण्यामागचे प्रयोजन काय आहे, असा प्रश्‍न अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सरकारशी संगनमतानेच निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात होणार असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका व राज्यसभेच्या एका जागेसाठीची निवडणूक या विषयावर प्रदेश भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळेच निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असावा, असा संशय घेण्यास वाव आहे. असे ते म्हणाले.

देशाच्या सुरक्षेपेक्षा
मुख्यमंत्रीपद श्रेष्ठ?
भाजपने नेहमीच राष्ट्राला प्राधान्य दिले. राष्ट्राची सुरक्षितता महत्वाची मानली. अशावेळी मनोहर पर्रीकर यांना संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात कसे आणले? राष्ट्राच्या सुरक्षेपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्रीपद श्रेष्ठ होते का, असा प्रश्‍न चोडणकर यांनी केला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तथा भाजपचे गोवा प्रभारी नितीन गडकरी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हट्टामुळेच जनादेश नसतानाही गोव्यात भाजपने आघाडी सरकार स्थापन केले असे विधान केले आहे. परंतु शहा यांचा हट्ट त्यांनी कोणत्या निकषावर पूर्ण केला याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे त्याचा त्यांनी गोमंतकीय जनतेसमोर खुलासा करावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.