गोमेकॉवर उपचार

0
132

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या गचाळ कारभारात शिस्त आणण्यासाठी उचललेली पावले प्रशंसनीय आहेत. राज्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांचा आधार असलेले हे इस्पितळ, परंतु ओपीडीपासून कॅज्युअल्टीपर्यंत सर्वत्र भोंगळ कारभारच पाहायला मिळतो. ‘वशिला किंवा ओळख असेल तरच गोमेकॉत जावे’ अशी त्यामुळे सर्वसामान्यांची धारणा बनली आहे आणि ती बर्‍याच अंशी खरी आहे. हे चित्र बदलण्याचे आणि हे इस्पितळ जनसामान्यांभिमुख करण्याचे आव्हान विश्वजित यांच्यासमोर आहे. आपल्या मागील आरोग्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी गोमेकॉमध्ये ज्या सुपरस्पेशालिटी सुरू केल्या, त्यासंदर्भात तत्कालीन विरोधकांनी भ्रष्टाचाराचे जरी आरोप केले, तरी सर्वसामान्यांसाठी मात्र हे नवे विभाग दिलासा देणारे ठरले. त्यातून बडी बडी खासगी इस्पितळे बंद व्हायची पाळी आली. शेवटी सरकारच्याच आरोग्यविमा योजनेत स्वतःचा समावेश करून घेऊन त्यांनी आपला जीव वाचवला! आता ज्यांनी विश्वजित यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्याच सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे आपल्या आक्रमक कार्यपद्धतीनुसार विश्वजित पुन्हा एकदा गोमेकॉचे चित्र पालटण्यासाठी पुढे सरसावलेले दिसतात. गोमेकॉमध्ये विविध वैद्यकीय शाखांवर उपचार उपलब्ध असले आणि तज्ज्ञ डॉक्टर असले, तरी या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागांपासूनच भोंगळ कारभाराला सुरूवात होते. रुग्णांना केसपेपर बनवण्यासाठी तर दिव्य करावे लागतेच, शिवाय पुन्हा ज्या विभागाच्या ओपीडीत जायचे असेल तेथे पुन्हा टोकन मिळवण्यासाठी आणखी एक दिव्य करावे लागते. रुग्णांच्या नोंदणीची एवढी गावठी पद्धत ज्याने निर्माण केली असेल तो धन्यच म्हणायला हवा. ज्या काळात संगणक नव्हते, तेव्हा ते एक ठीक होते, परंतु आज सरकार ‘डिजिटल इंडिया’ची भाषा करीत असताना आणि एक आयआयटी पदवीधारक मुख्यमंत्रिपदावर असताना, गोमेकॉची साधी रुग्णनोंदणीही संगणकीकृत होऊ शकत नाही हे आश्चर्यकारक आहे. गोमेकॉसंदर्भात पहिली गोष्ट आरोग्यमंत्र्यांनी करावी ती म्हणजे येथील बाह्य रुग्ण विभागांतील नोंदणी संगणकीकृत व ऑनलाइन करावी. तेथे चौदा वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि टोकन नंबरसाठी लाच घेणार्‍या कारकुनांना त्यांनी हटवले, परंतु ढवळ्या गेला आणि पवळ्या आला असे तेथे होता कामा नये. गोमेकॉच्या कर्मचार्‍यांना केसपेपर बनवण्यासाठी तेथे वेगळा काऊंटर का? त्यापेक्षा रुग्णनोंदणीसाठी विमानतळावर असतात तसे अनेक संगणकीकृत काऊंटर सुरू केले गेले तर केसपेपरसाठी रांगा लावण्याची पाळी रुग्णांवर येणार नाही. रुग्णनोंदणी संगणकीकृत झाली तर केसपेपर बनवण्याच्या एकाच टप्प्यात रुग्णांना त्यांना हव्या त्या विभागाची क्रमशः टोकन मिळू शकतील. टोकनवर डॉक्टरांना भेटण्याची निश्‍चित वेळही नमूद करता येऊ शकते. त्यासाठी तासन्‌तास प्रतीक्षा करणे टळेल. जे खासगी इस्पितळांमध्ये होऊ शकते ते गोमेकॉत का होऊ शकत नाही? कॅज्युअल्टी विभागासंदर्भातही गंभीर तक्रारी आहेत. तेथे ओळखपाळख नसलेल्या रुग्णांची हेळसांड होते असा अनुभव आहे. तेथे येणार्‍या रुग्णांवर केव्हा कोणते उपचार केले गेले, त्याचा कालबद्ध तपशील नोंदवण्याची सक्ती तेथील कर्मचार्‍यांवर झाली तर ही बेपर्वाई थांबू शकते. रक्त तपासणीसारखी मूलभूत सोय गोमेकॉत आजवर का नाही हेही एक कोडेच आहे. खासगी पॅथोलॅबच्या दलालांनी गोमेकॉला वेढले आहे हेच त्याचे खरे कारण आहे. त्यावर बडगा उगारून विश्वजित यांनी एक सत्कार्य केले आहे. रक्ततपासणीची सोय तेथल्या तेथे उपलब्ध झाली तर रुग्णांचे हाल टळतील. गोमेकॉला अशा प्रथमोपचारांची नितांत आवश्यकता आहे.