गिरी हमरस्त्यालगतचे माड कापण्याविरोधात निदर्शने

0
218

म्हापसा-पणजी हमरस्त्याच्या रुंदीकरणासाठी गिरी क्रॉस ते पर्वरी जुना बाजारापर्यंतच्या परिसरातील नारळाची झाडे कापण्यास तीव्र विरोध करीत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काल निदर्शने केली. यावेळी स्थानिकांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला.
गोंय, गोंयकारपणाचा नारा देत सत्तेत आलेल्या सरकारला यावेळी नारळाची झाडे वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. नारळाच्या झाडाला राज्याचे झाड म्हणून मान्यता देण्याचे आश्‍वासन गोवा ङ्गॉरवर्डचे सर्वेसर्वा तसेच सध्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रचार काळात दिले होते. त्या गोष्टीची जाणीव ठेवून आता हमरस्त्याच्या बाजूची, कित्येक वर्षांपासून डोलणारी गिरी-म्हापसा ते पर्वरी पर्यंतची माडाची झाडे कापण्यापासून वाचविण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
हमरस्ता वाढवायचाच असेल तर सध्याची नारळाची झाडे मधोमध एका रांगेत ठेवून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या डाव्या अथवा उजव्या बाजूने नवीन रस्ता तयार करण्यावर विचार व्हावा, यावर सर्वांचेच एकमत झाले. तसे निवेदन लवकरच सरकारला सादर केले जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
यावेळी हातात ङ्गलक घेऊन केलेल्या निदर्शनात प्रजल साखरदांडे, प्रसाद पानकर, श्रद्धा खलप, मनोज परब, मायकल डिसोझा, स्वप्नेश शिर्लीकर, साईश घाटवळ आणि एडविन पिंटो या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या निदर्शनास स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्याचे कपिल कोरगावकर यांनी सांगितले.