लढा कर्करोगाशी!

0
156
  • डॉ. मनाली महेश पवार (गणेशपुरी म्हापसा- गोवा)

सध्याच्या धावपळीच्या युगात मनःस्वास्थ्य राखणे हे कठीण पण अत्यंत आवश्यक आहे. मानसिक ताण-तणावांचा शरीरावर विशेषतः भूकेवर, पचनावर व झोपेवर विकृत परिणाम दिसून येतो. प्राणायाम, ध्यान-धारणा यांच्या अभ्यासाने मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात स्वस्थ व्यक्तिने निरोगी राहण्यासाठी आर्युवेदाची कास धरली पाहिजे.

कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाय :
कॅन्सर रोगाचा वाढता प्रसार पाहता कॅन्सर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केलेला बरा. बहुधा कॅन्सरचे निदान हे शेवटच्या टप्प्यावरच होते. तोपर्यंत ह्या व्याधीची मुळे पूर्ण शरीरभर विळखा घालून पसरत जातात. अशा अवस्थेत चिकित्सा ही असाध्य होते व रुग्णाला प्राणाला मुकावे लागते. अशावेळी आता बदललेल्या जीवनशैलीचा विचार करता जरा मागे जाऊन आयुर्वेदीय आहार विहाराचा स्वीकार करुन अशा व्याधींवर मात करणेच बरे.
आयुर्वेदाच्या प्रयोजनानुसार
‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण आतुरस्य विकारपरिमोक्ष:|’ म्हणजे स्वस्थ्य व्यक्तीचे स्वास्थ्यरक्षण करणे व रोग उत्पन्न झाल्यास रोगी मनुष्याचा रोगनाश करणे. त्यातही स्वास्थ्यरक्षणास आयुर्वेदाने अधिक महत्त्व दिले आहे. त्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. दिवस व रात्रीच्या विशिष्ट काळात वातावरणात होणारे बदल, तसेच ऋतुनुसार हवामानात होणारे बदल यांचा वात- पित्त- कफ या शरीरधारण पोषण करणार्‍या त्रिदोषांवर परिणाम होऊन त्यांच्यात वैषम्य निर्माण होते आणि विकृत लक्षणे दिसू लागतात.
यापासून प्रतिबंध करण्यासाठी…
१. दिवसाच्या विशिष्ट काळात त्या काळातील वाढलेल्या दोषाचे शमन करणारे विशिष्ट उपक्रम आचरण्यास सांगितले आहेत, यांना दिनचर्या म्हणतात.
२. विशिष्ट ऋतूत त्या ऋतूत वाढलेल्या दोषाचे शमन करण्यासाठी निश्‍चित आहार- विहार व शोधन चिकित्सा सांगितली आहे, याला ऋतूचर्या म्हणतात.
३. शरीराचे स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी आहार, विहार, निद्रा इत्यादी बाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

१. दिनचर्या
प्रत्येक दिवशी करायचे आचरण, अवलंबायचे उपक्रम म्हणजे दिनचर्या होय. सकाळी किती वाजता उठावे यापासून रात्री झोेपण्याबाबत पाळायचे नियम या सगळ्यांचा दिनचर्येत समावेश होतो.
– प्रात:काली ४ – ४.३० ची वेळ म्हणजे ब्राह्ममुहुर्त होय. यावेळी उठून मल-मूत्राचे विर्सजन केल्यास गुदस्थानातील अपान वायू प्राकृत राहतो व विशेषतः गुद- पक्वाशय या अवयवांचे स्वास्थ्य रक्षण होते.
– त्यानंतर कडुनिंब, खदिर यासारख्या कडू, तिखट व तुरट चवीच्या औषधी चूर्णांनी दात घातल्यास तोंडातील वाढलेल्या चिकट कफाचे शमन होते. यानंतर किंचित उष्ण पाणी, तिळतेल यांनी गुळण्या केल्यास तोंडातील चिकटा नाहीसा होतो. हिरड्या बळकट होतात. आवाज उत्तम होतो. या उपक्रमांनी मुखातील जीभ-ओठ-हिरड्या-गल-पडजीभ-घसा-स्वरयंत्र हे अवयव बळकट होतात.
– एरंडेल तेल किंवा गाईच्या तुपाच्या वातीवर केलेले काजळ नेहमी डोळ्यात घातल्यास डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
– नियमाने नाकात अणुतेलाचे किंवा गाईच्या तुपाचे २-२ थेंब घातल्यास नाक, घसा व मेंदूचे (मस्तिष्काचे) स्वास्थ्य राखले जाते.
– संपूर्ण अंगास व विशेषतः डोके, कान व तळपाय येथे तेलाने किंवा तुपाने अभ्यंग केल्यास त्वचा निरोगी राहते. संपूर्ण शरीरात वाताचे शमन होऊन रस-रक्त संवाहन सुधारते.
– स्नेहाने शरीर स्निग्ध केल्यावर त्रिफला, निम्ब यासारख्या रुक्ष द्रव्यांची चूर्णे अंगास चोळून गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील जास्त प्रमाणात वाढलेल्या मांस व मेद धातूचा नाश होतो.
– योग्य मात्रेत, योग्य ऋतूत व्यायाम केल्यासही वाढलेल्या मांसमेदाचा क्षय होतो. भूक वाढते, पचन सुधारते, व संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य सुधारते.
– योग, प्राणायाम, ध्यान, धारणा यांचे अगदी लहान वयापासूनच आचरण करावे. या उपक्रमाने मनोबल, मनोर्धेय वाढण्यासाठी मदत होते. मनःशांती असली की कुठलाच शारीरिक किंवा मानसिक व्याधी मनुष्याला जडू शकत नाही.
वरील सर्व उपक्रम विशिष्ट शरीर अवयवांस व संपूर्ण शरीरास बल देणारे असल्याने त्यांचे नित्यनेमाने पालन केल्यास कॅन्सरला प्रतिबंध घालण्यास निश्‍चितच लाभदायक ठरतात.

२. ऋतुचर्या ः
ऋतुनुसार हवामानात होणार्‍या बदलांमुळे शरीरातील दोष – धातु – मल विकृत होतात. विशिष्ट आहार-विहार व शोधन उपक्रमांच्या सहाय्याने त्यांना साम्यावस्थेत आणले नाही तर ते व्याधी निर्माण करतात.
* वसंत ऋतू
हवेतील उष्ण गुणामुळे कफदोषाचे विलयन होऊन कफप्रकोपामुळे सर्दी, खोकला, दमा, त्वचाविकार असे विकार बळावतात. त्या ऋतूत वाढलेल्या कफदोषाची चिकित्सा केली नाही तर कफदोष बळावून मांस मेदाची दुष्टी करुन तद्जन्य गंभीर विकार निर्माण करतात. तसेच या ऋतूत कडू, तिखट, तुरट चवीचे, उष्ण पदार्थ सेवन करावे. पचण्यास हलका आहार घ्यावा. कफाचे निर्हरण करण्यासाठी वमन व नस्य हे शोधन उपक्रम करावे.
* ग्रीष्म ऋतू
वातावरणात उष्णता व रुक्षता वाढलेली असते. अशावेळी शीत वीर्याचे, गोड चवीचे पदार्थ आहारात अधिक असावे. दाहाचे शमन करण्यासाठी चंदन-वाळा यांसारख्या द्रव्यांनी, गुलाबाच्या पाकळ्यांनी शीत केलेले पाणी अधिक प्रमाणात घ्यावे.
* वर्षा ऋतू
पर्जन्यवृष्टीमुळे शीत झालेल्या वातावरणामुळे वातदोषाचा प्रकोप होतो. यासाठी गोड, आंबट, खारट चवीचे, उष्ण पदार्थ आहारात अधिक ठेवावे. उबदार घरात रहावे. वातदोषाचे शोधन करण्यासाठी बस्ति उपक्रम तसेच स्नेहन (सर्वांगास अभ्यंग) व स्वेदन करावे.
* शरद ऋतू
सूर्यकिरण अतिशय उष्ण व तीक्ष्ण असल्याने शरीरात पित्ताचा प्रकोप होतो. म्हणून आहारत पित्ताचे शमन करणारे गोड, कडू व तुरट रसाचे शीत पदार्थ अधिक सेवन करावे. खेळती हवा असलेल्या घरात रहावे. पित्तदोषांचे शोधन करण्यासाठी विरेचन व रक्तमोक्षण हे उपक्रम आचरावेत.
* हेमंत व शिशिर ऋतू
या दोन्ही ऋतूत हवेत अतिशय शैत्य असते. जाठराग्निही प्रदीप्त झालेला असल्याने भूक उत्तम लागते. म्हणूनच गोव चवीचे, पचण्यास जड परंतु उष्ण पदार्थ आहारात अधिक प्रमाणात ठेवावेत. शैत्यापासून प्रतिबंध करण्यासाठी लोकरीचे कपडे परिधान करावेत.
अशाप्रकारे ऋतुचर्येचे पालन केले तर त्या त्या ऋतूत वाढण्यार्‍या दोषांचे वेळीच शमन व शोधन केले जाते की जेणेकरुन पुढे दीर्घकाळ शरीरात दोष संचित होऊन निर्माण होणारे कॅन्सरसारखे व्याधी टाळता येतात. ऋतूचर्येत सांगितलेले शोधन उपक्रम मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखालीच करावे.

३. आहार-विहार-निद्रा-मानसिक स्वास्थ्य ः
नियमानुसार सेवन केलेल्या उत्तम आहाराने शरीरधांतूचे पोषण करुन बल, ओज, शुक्र व आयुष्याची वृद्धी करतो. याउलट विकृत आहार अनेक विकारांचे कारण ठरतो.
– रसांचा विचार केला तर आहार ‘षड्‌रसं मधुरप्रायम्’ म्हणजे सहाही रसांच्या द्रव्यांनी युक्त परंतु त्यातही गोड रसाचे आधिक्य असलेला असावा.
– प्रत्येक व्यक्तीच्या जाठराग्निचा व ऋतूचा विचार करुन आहार सेवन करावा.
– शुद्ध ढेकर येणेे, मूत्र – मल वेगांचे उत्सर्जन योग्य प्रकारे होणे, उत्साह, शरीराला हलकेपणा वाटणे, भूक व तहानेची संवेदना ही पूर्वीचा आहार पूर्णपणे पचण्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसल्यावरच पुढील आहार सेवन करावा. साधारणपणे आधीचा आहार सेवन केल्यावर ३ तासांपर्यंत पुन्हा अन्न सेवन करु नये व ६ तासांपेक्षा अधिक काळ उपाशी राहू नये.
– आहार सेवन करताना आमाशयाचे ३ भाग कल्पून १ भाग घन, आहार, १ भाग द्रव आहार सेवन करावा व १ भाग दोषांच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा.
– प्रसन्न चित्ताने, आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असताना अतिशय भरभरही नाही व अतिशय सावकाशही नाही अशा वेगाने आहार घ्यावा.
– अन्नपदार्थ नेहमी ताजे व गरम असावे
अशा प्रकारचे अन्नसेवनाचे जे नियम सांगितले आहेत, त्यानुसार सेवन केलेला आहारच शरीरस्वाथ्य राखतो. अन्यथा विविध रोगांना आमंत्रण देतो.

विहार ः
– मल-मूत्रादि वेगांचे धारण न करणे/ उदीरण न करणे
– रोज व्यायाम करणे
– रात्री जागरण न करणे, दिवसा न झोपणे
– दिनचर्येचे व ऋतुचर्येचे पालन करणे

निद्रा ः
झोप ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शारीरिक व मानसिक कष्टांनी मन कलान्त झाल्यावर ते विषयांपासून निवृत्त होते व झोप येते. रात्री १० ते ४ हा निद्रेसाठी योग्य काळ आहे. दुपारी झोपणे किंवा रात्री जागरण करणे यामुळे दोषांचा प्रकोप होऊन व्याधी निर्माण होतात. आजकाल विशेषतः झोपेच्या अनियमित व विरुद्ध सवयी बहुतांशी सर्व व्यक्तीत आढळतात. यामुळे जाठराग्नि विकृत होतो. अन्नपचन बिघडते व त्यामुळे धातूंचे पोषण होत नाही. आजकाल झपाट्याने वाढत असलेल्या कॅन्सरसारख्या व्याधींचे हेही एक महत्वाचे कारण आहे.

मानसिक स्वास्थ्य ः
सध्याच्या धावपळीच्या युगात मनःस्वास्थ्य राखणे हे कठीण पण अत्यंत आवश्यक आहे. मानसिक ताण-तणावांचा शरीरावर विशेषतः भूकेवर, पचनावर व झोपेवर विकृत परिणाम दिसून येतो. प्राणायाम, ध्यान-धारणा यांच्या अभ्यासाने मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
थोडक्यात स्वस्थ व्यक्तिने निरोगी राहण्यासाठी आर्युवेदाची कास धरली पाहिजे. आयुर्वेदातील नियमांचे पालन केले तर कॅन्सरसारखा असाध्य व्याधी होण्याची शक्यता कमी होते.