योगसाधना – ३०९ योगमार्ग – राजयोग ईश्‍वरप्रणिधान – ४८

0
258

– डॉ. सीताकांत घाणेकर

आमचा रक्ताचा संबंध नसेल पण रक्त बनवणार्‍याचा संबंध नक्कीच आहे. ती शक्ती एक आहे. म्हणून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, स्पृश्य-अस्पृश्य… असा कुठलाही भाव मनातच नव्हे तर हृदयात ठेवू नये.

भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आत्मा हा परमात्म्याचाच भाग आहे. हा आत्मा चौर्‍यांशी लक्ष योनींतून जन्म घेतो- कृमी, कीटक, पशु-पक्षी, जलचर… व तद्नंतर अत्यंत उत्कृष्ट अशा मानव योनींत जन्माला येतो. या योनींनंतरच त्याने निसर्गनियमांप्रमाणे आचरण केले तर तो आत्मा पुन्हा एकदा परमात्म्यात विलीन होतो. तसेच सर्वांनी सगळीकडे सत्कर्म केले तर सर्वांना इहलोकांतच सुख-शांती-आरोग्य प्राप्त होईल. पण तसे काही घडत नाही.
मनुष्ययोनीत जन्म घेतानाच मानव षड्‌रिपु – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार यांना सोबत घेऊनच येतो. त्यामुळे सर्वजण सज्जनच असतील, सत्कर्मच करतील याची थोडीसुद्धा खात्री नसते. एवढेच नव्हे तर याची साधी अपेक्षा ठेवणेसुद्धा मूर्खपणाचे ठरेल आणि ही गोष्ट कलियुगातचघढेल असे नाही तर प्रत्येक युगात थोडे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतीलच. स्वार्थी असणारच. इतरांचा दुःस्वास व नाश करतीलच. पण झाले काय की हल्ली विज्ञानाच्या प्रगतीमुळे जग लहान झाले आहे. कोणत्याही भूभागावरची बातमी अगदी इत्थंभूतपणे फोटो व व्हिडिओसहित सर्वत्र एका क्षणात पसरते. परिणाम- ज्यांना ही बातमी कळते त्यांना चिंता होते. त्यांचा ताण-तणाव वाढतो. अशा वेळी त्याला कुणीतरी आश्‍वासक व्यक्ती पाहिजे जी त्याला धीर देईल. जसे आपल्या कुटुंबात मुलांना परीक्षेत गुण कमी पडलेत, तर पालकांनी व शिक्षकांनी म्हणजे धुरीणांनी त्याला समजून घेऊन नंतर त्याला समजवायला हवे, की ते त्याला यथार्थ मार्गदर्शन करतील म्हणजे पुढच्या परिक्षेत त्याला चांगले गुण मिळतील. दुर्भाग्याने असे प्रत्येक बाबतीत होतेच असे नाही. उलट हेच तथाकथित धुरीण त्याला रागावतात. कधी कधी मारतातही. त्यामुळे अशी मुले मग आणखी निराश व दुःखी होतात. आत्महत्यासुद्धा करतात.
त्याचप्रमाणे विश्‍वांत जेव्हा सर्व तर्‍हेची संकटे येतात- मानवनिर्मित किंवा नैसर्गिक – त्यावेळी समाजातील तथाकथित धुरीण म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील नेते मंडळी – यांनी सामान्य मानवाला धीर देणे अत्यावश्यक असते. पण तेव्हासुद्धा अंधारच दिसतो. अशावेळी जर कुणी दैवी शक्तीनेच स्वतः मार्गदर्शन केले तर किती चांगले होईल! अगदी हीच गोष्ट श्रीकृष्ण भगवंताच्या पवित्र मुखारविंदातून निघालेली श्रीमद्भगवत्‌गीता करते. तीही कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनासारख्या शूर क्षत्रियाला सांगितलेली- सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी – त्याला तसेच आम्हालासुद्धा!
गीतेतील प्रत्येक श्‍लोक धीर देणारा आहे. आश्‍वासक आहे. नवव्या अध्यायात तिसाव्या श्‍लोकांत आपण दुराचार्‍याला भगवंतानी दिलेले आश्‍वासन बघितले. आता पुढे…
* क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति|
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति॥
– तो (ईश्‍वरभजन करणारा दुर्वर्तनी) तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणारी शांती त्याला प्राप्त होते. हे अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही.
कळत-नकळत अनेक व्यक्ती संगतीमुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे दुराचारी बनतात. पण त्यांनादेखील इथे आश्‍वासन आहे की त्यांनी प्रेमपूर्वक व श्रद्धापूर्वक ईश्‍वरभक्ती केली तर अशा भक्तांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः भगवंतच स्विकारतात. त्यामुळे त्याचा नाश होत नाही. एवढेच नव्हे तर त्याला नेहमी टिकणार्‍या म्हणजे चिरशांतीचा लाभ होतो.
शेवटी प्रत्येक मानवाला हीच अपेक्षा असते की त्याला अखंड शांती मिळावी, त्यासाठीच तर त्याची धडपड चालू असते.
इथे मुख्य गोष्ट समजायला हवी की शेवटी भक्त म्हणजे कोण आणि भक्ती म्हणजे काय?
भक्ती म्हणजे आपण नेहमी करतो ते फक्त कर्मकांडं नव्हे. ते आवश्यक आहेच. पण हे कर्मकांडं भगवंतापासून विभक्त न होता करायला हवे. हा विषय समजणे व समजावणे कठीण आहे. पण अगदी सोप्या रीतीने समजण्यासाठी विश्‍वातील सर्व भक्तांची उदाहरणे जाणून घ्यावी व त्यांचा अभ्यास करावा – प्रत्येक राष्ट्रात, धर्मांत, वर्णांत असे कितीतरी भक्त पूर्वी होऊन गेलेत व आजही आहेत.
* भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास, मीराबाई, राधा… येशु ख्रिस्त, पैगंबर, शंकराचार्य, वल्लभाचार्य, संत कबीर… हे सर्व भक्त भगवंताचे लाडके होतेच पण त्याशिवाय ज्यांनी ईश्‍वरी संस्कृती टिकावी म्हणून कर्मयोगी बनून सत्कर्म केले अशीदेखील अनेक चरित्रे डोळ्यासमोर येतात – सुदामा अर्जुन (दोघे श्रीकृष्णाचे सखे – पहिला ब्राह्मण व दुसरा क्षत्रिय), अभिमन्यू (तरुणपणातच संस्कृतीसाठी जीवनदान देणारा), झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप. अशा उज्ज्वल, दैवी चरित्रांना तोड नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे या गोष्टी पूर्वी अगदी बालपणात सांगितल्या जात होत्या त्या तेवढ्या प्रकर्षाने आज प्रचलित नाहीत. याचाच अर्थ संस्कार नाहीत. मग सज्जन, सुसंस्कारी प्रजा कशी तयार होणार?…
‘गीता’ हा ग्रंथ इतका आश्‍वासक असूनही आपल्यापैकी कितीजण गीता वाचतात? अभ्यास करतात? अगदी नगण्य!
केव्हा केव्हा प्रश्‍न मनात येतो – हा भगवंत आहे तरी कुठे? बहुत करून सर्वजण आकाशाकडे पाहतात. त्याला म्हणतातही ‘उपरवाला’! कारण आमचा तसा समज असतो की भगवंत वर स्वर्गात आहे. पण गीतेमध्ये स्वतः भगवंत आपला पत्ता देतात- ‘उपरवाला’ नाही तर ‘अंदरवाला’…
* सर्वस्व चाहं हृदि सन्नि विष्टो|
मत्तः स्मृतिर्ज्ञानम्‌पोहनं च॥ (गीता १५.१५)
– मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात, अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. (विचारांनी बुद्धीत असणारे संशय – विपर्यय इ. दोष घालविणे म्हणजे अपोहन).
सामान्य, थकलेल्या व्यक्तीला आणखी दुसरे आश्‍वासन काय हवे? पण ही गोष्ट समजणे तेवढे सोपे नाही. म्हणूनच शास्त्रकारांनी मारुतीची गोष्ट सांगितली व भगवान राम व माता सीता त्याच्या हृदयातच दाखवली. आमच्यासारख्या अल्पबुद्धी मानवाना समजण्यासाठी ही प्रतीके आहेत.
या सर्वांवर त्यांच्या आयुष्यात अनेक भयानक संकटे आलीत पण त्यांनी भगवंताचे नाम सोडले नाही. हनुमंताने तर वेळोवेळी ‘श्रीराम’ या नामानेच प्रत्येक प्रसंगी विजय मिळवला.
इथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे…
* भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे. सर्वच त्याचे अंश आहेत. सर्वच त्याचे पुत्र आहेत. याचाच अभिप्रेत अर्थ म्हणजे कुणीही कसलाही भेदभाव करु नये- राष्ट्र, लिंग, वर्ण, शिक्षण, सत्ता….
पू. पांडुरंगशास्त्री हा मुद्दा अगदी सोपेपणे समजावतात – फक्त दोन शब्दांत – * दैवी भ्रातृ भाव.
– आमचा रक्ताचा संबंध नसेल पण रक्त बनवणार्‍याचा संबंध नक्कीच आहे. ती शक्ती एक आहे. म्हणून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, स्पृश्य-अस्पृश्य… असा कुठलाही भाव मनातच नव्हे तर हृदयात ठेवू नये.
हे सर्व सिद्धांत ऐकायला, वाचायला छान वाटतात पण आचरणात येण्यासाठी जरुरी म्हणजे शास्त्रशुद्ध योगसाधना.