दुर्घटनेचा धडा

0
107

कुडचडे पूल दुर्घटनेने राज्यातील पुलांच्या स्थितीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. गोव्याला अनेक नद्यांनी आरपार छेदले असल्याने पूल ही अपरिहार्यता बनलेली आहे. कित्येक पूल जुने आहेत. काही नव्याने बांधले गेले आहेत, परंतु या जुन्या – नव्या पुलांची क्षमता आणि त्यावरून जाणार्‍या वाहनांचा भार याचा ताळमेळ नसल्याने अनेक पूल धोकादायक बनलेले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेनंतर तरी सरकार जागेल आणि योग्य ती कार्यवाही करील अशी अपेक्षा आहे. वास्तविक, महाडच्या सावित्री नदीच्या पुलावर गेल्या पावसाळ्यात जेव्हा भीषण दुर्घटना घडली, तेव्हा गोव्यातील सर्व जुन्या पुलांचे ऑडिट करण्याची घोषणा मागील सरकारने केली होती. त्यासंदर्भात पुढे काय झाले कळायला मार्ग नाही, परंतु अनेक पोर्तुगीजकालीन पूल आजही गोव्यात वापरात आहेत आणि ते कमकुवत झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. कुडचड्याचा पूल हा केवळ पादचार्‍यांसाठी जरी बांधला गेला असला, तरी तो धोकादायक बनल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नजरेस आले होते. त्यामुळे तो दोन्ही बाजूंना अडथळे लावून बंदही करण्यात आला होता. परंतु जर हा पूल धोकादायक असल्याचे खात्याला ठाऊक होते, तर तो तशाच स्थितीत कोणाला दाखवायला ठेवला होता? यापूर्वी बोरीच्या जुन्या पुलासंदर्भात असाच प्रकार घडला होता. बोरीला नवा पूल बांधला गेल्यावर जुन्या पुलाचे अवशेष हटवून तो मार्ग बंद करणे आवश्यक होते, परंतु तो तशाच स्थितीत ठेवला गेला होता. परिणामी वाहनस्वार थेट त्या जुन्या पुलावरून जाऊन पाण्यात पडण्याची घटना घडली होती. अनेकांसाठी तर बोरी पूल हे आत्महत्या करण्यासाठी आदर्श ठिकाण बनलेले होते. केवळ बोरीच नव्हे, तर इतर अनेक पुलांवरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकार गोव्यात सातत्याने होत असतात. त्या पार्श्वभूमीवर सर्व पुलांच्या कठड्यांना प्रतिबंधक जाळ्या बसवण्याची मागणी माजी आमदार विष्णू वाघ यांनी केली होती. किमान प्रमुख पुलांवर व नव्याने बांधल्या जात असलेल्या पुलांवर तरी अशा प्रतिबंधक जाळ्या बसवायला हरकत नसावी. एखादी अकल्पित घटना घडल्यावर तेथे बघ्यांची गर्दी होणे हे मूलभूत मानवी जिज्ञासेला धरून आहे. त्यामुळे कुडचडे येथे पुलावरून उडी टाकून एकाने आत्महत्या केल्यावर सुरू असलेले मदतकार्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकानी तेथे गर्दी केली यात त्यांना दोष देणे योग्य नाही. परंतु आपण जेथे उभे आहोत, तो पदपूल धोकादायक आहे आणि एवढ्या गर्दीच्या भाराने तो कोसळू शकतो याचे भान एकानेही ठेवले नाही ही त्यांच्याकडून चूक झाली. त्या चुकीची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली. या आपत्तीच्या प्रसंगी ज्यांनी प्रसंगावधान राखले आणि इतरांचे जीव वाचवले ते तरूण प्रशंसेस पात्र आहेत. त्यांचा योग्य गौरव झाला पाहिजे. ते नसते तर मृतांची संख्या कितीतरी पटीने वाढली असती. वार्‍यावरच्या वावड्या ऐकून उगाच मृतांचे आकडे फुगवून सनसनाटी माजवण्याचा प्रकार नवप्रभेने केला नाही. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ वार्तांकनही अशा दुर्घटनेच्या प्रसंगी महत्त्वाचे असते. अशा प्रकारची दुर्घटना जेव्हा घडते तेव्हा अफवांचे पीक येते. परंतु ते टाळण्यासाठी जबाबदार अधिकार्‍यांनी अधिकृत माहिती देणे आवश्यक असते. यावेळी ते घडल्याचे दिसले नाही. यापुढे अशा प्रसंगी अधिकृत माहिती सरकारी यंत्रणांनी दिली पाहिजे. असे अनेक धडे कुडचड्याच्या या पूल दुर्घटनेने गोव्याला दिलेले आहेत. मांडवी पूल कोसळण्याचा कलंक गोव्याच्या भाळी एकदा लागलेलाच आहे. त्याची पुनरावृत्ती कोणत्याही पुलाच्या संदर्भात होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने अधिक सजगता बाळगणे आवश्यक आहे. पूल हा गोव्याच्या दळणवळणाचा प्राण आहे हे विसरून चालणार नाही.