कुडचडे दुर्घटनेतील मृतांची संख्या ३ वर

0
105

>> शोधकार्यात एनडीआरएफ आणि नौदलाचाही सहभाग

कुडचडे – सावर्डे दरम्यानचा पूल कोसळून गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर सापडलेल्या मृतदेहांची संख्या दोनवर पोहोचली आहे. अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत असली, तरी त्यासंदर्भात कोणी बेपत्ता असल्याची तक्रार आली नसल्याने काल संध्याकाळी शोधकार्य तूर्त थांबवण्यात आले. आज ते पुन्हा सुरू केले जाईल अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. काल अजित प्रकाश (३१) याचा मृतदेह सापडला. गुरुवारी रात्री बसवराज मलकनवार (३६) याचा मृतदेह आढळला होता. दोघेही परप्रांतीय आहेत. केपेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी माहिती देताना सांगितले की, काल शुक्रवारी सकाळी ७ वा. शोधकार्य संध्याकाळी ६ वा. थांबवण्यात आले. गरज भासली तरच उद्या शुक्रवारी पन्हा पुढे मोहीम सुरू करण्यात येईल. एनडीअरएसची तुकडी गोव्यात राहणार असल्याचे ते म्हणाले. कोणत्याच पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची काल संध्याकाळपर्यंत तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचेही उपजिल्हाधिकार्‍यांनी पुढे सांगितले. काल सकाळी शोधकार्यास पुन्हा सुरूवात झाल्यानंतर घटनास्थळी धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, केप्याचे उपजिल्हाधिकारी शिरोडकर, सांगेचे मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस, कुडचडे पोलीस निरीक्षक प्रशांत देसाई, सावर्डेचे माजी पंच संजय नाईक सांगेचे गटविकास अधिकारी राजेश साखळकर आदी उपस्थित होते.

पूल दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधकार्यात ‘दृष्टी’चे जीवरक्षक, नौदल, तटरक्षक दल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) च्या पथकाने भाग घेतला.
पूल कोसळल्यानंतर त्याच्या खाली काही मृतदेह दबले असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मदत पथकांनी आधी तुटलेला पुलाचा लोखंडी भाग गॅस कटरच्या साह्याने कापून क्रेनच्या सहाय्याने वेगळा केला. त्यानंतर दुसरा मृतदेह तेथेच सापडला.
दुर्घटनेनंतर रात्री नऊच्या सुमारास दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर तेथे पोहोचले व त्यांनी शोधकार्यास मदत केली. साबांखामंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दीपक पाऊसकर यांनीही घटनास्थळी येऊन रात्री मदतकार्यावर देखरेख ठेवली.
काल शुक्रवारी सकाळी सात वाजता पुन्हा शोधकार्यास प्रारंभ करण्यात आला. सकाळी नौदलाचे हेलिकॉप्टरही आणले गेले. पाण्यात दूरवर मृतदेह तरंगत आहे का याचा त्याद्वारे शोध घेतला गेला. त्यानंतर नौदल तसेच तटरक्षक दलाच्या जवानांनी जुवारी नदीचा कोपरान् कोपरा शोधला. त्यासाठी मोटारबोटी, कॅमेरे, पाणबुडे यांचा वापर करण्यात आला, मात्र दुपारपर्यंत त्यांच्या हाती काही लागले नाही.
दुर्घटना घडली तेव्हा पुलावर नक्की किती माणसे होती याचा नेमका अंदाज कोणीही व्यक्त करू शकले नाही. त्यामुळे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. गुरुवारी रात्री एक व शुक्रवारी सकाळी एक मृतदेह सापडला तरी आणखी किती बेपत्ता असतील वा पाण्यात बुडाले असतील याची कल्पना कोणीही करू शकत नाही.
पूल हटवला असता तर…
जुवारी नदीवरील हा पूल तो चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, पण तो कमजोर झाल्याने दहा वर्षांपूर्वी बंद केला गेला होता. सदर पूल कमजोर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याला माहीत होते, त्यामुळे त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजू बंद केल्या होत्या. मात्र, तो पूर्णतः हटवला गेला असता तर ही दुर्घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करीत आहेत. मात्र, पूल बंद असताना लोकांनी तेथे जायलाच नको होते, असे साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांचे म्हणणे आहे. बंद केलेल्या पुलावर गर्दी करून लोकांनी जोखीम पत्करायला नको होती. त्यांच्या वजनानेच तो कोसळला असे ढवळीकर यांनी सांगितले.
आत्महत्येचा व मृत्यूचाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
गुरुवारी संध्याकाळी जेव्हा संतोष वंडाळ याने पुलावरून पाण्यात आत्महत्येसाठी उडी मारली त्यावेळी त्याला प्रज्योत पार्सेकर या आनंदवाडी येथील युवकाने पाहिले. प्रज्योत हा त्यावेळी बाजारात जात होता. त्याने प्रत्यक्ष संतोष याला पुलावरून उडी मारताना पाहिले. त्याने त्वरित १०० क्रमांकावरून पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्य सुरू केले. हे शोधकार्य बघण्यासाठी त्यावेळी प्रज्योत हा पुलावर उभा राहिला होता. त्याच्यापाठोपाठ अनेकजण पुलावर उभे राहिले. पुलावर बरीच गर्दी जमली आणि पुलाचा कट कट असा आवाज झाला आणि पूल कोसळला आणि पुलावर उभे असलेले लोकही कोसळले. त्यात आपणही होतो असे प्रज्योत याने सांगितले. आपल्याला प्रथम काहीच कळेना मात्र कसेबसे पोहत आपण पाण्याबाहेर आल्याचे शेवटी प्रज्योत याने सांगितले.

आईसोबत जातानाच टाकली उडी
ज्याची आत्महत्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरली तो बसय्या ऊर्फ संतोष सिद्धराम वंडाळ (२६) याचा मृतदेह दुर्घटनास्थळापासून तीनशे मीटरवर सापडला होता. तो आक्शीमड्डी – काकोडा येथे आपली आई व लहान भावासोबत राहात होता.
बसय्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मधल्या भावाच्या अपघाती निधनानंतर त्याला जबर धक्का बसला होता. तो मानसिकदृष्ट्या कमकुवत बनला होता. त्यामुळे अधूनमधून घरातून पळून जात असे. गुरुवारीही तो असाच घरातून पळून गेला होता व त्याला कुडचडे पोलिसांनी शोधून आणले होते. मात्र, आपल्या आईसोबत घरी जात असताना मध्येच त्याने या पुलावरून खाली नदीत उडी घेतली होती. आपल्या दोन मुलांना गमावल्याचे दुःख तिला असह्य झाले आहे.

पन्नास बुडाल्याची अफवाच?
या पूल दुर्घटनेत पन्नास बुडाल्याची अफवा पसरवली गेली असली, तरी प्रत्यक्षात खरोखरच एवढ्या मोठ्या संख्येने लोक बुडाले का याबाबत साशंकता आहे. पोलीस स्थानकात कोणीही बेपत्ता असल्याची तक्रार अद्याप तरी नोंद झालेली नाही. त्यामुळे दुर्घटनेला ४८ तास उलटून गेल्याने काल संध्याकाळी शोधकार्य थांबवण्यात आले. काल सापडलेला दुसरा मृतदेह हा मीराबाग नदीच्या पात्रात सापडला. मात्र, त्याचे डोळे फोडलेल्या स्थितीत तो आढळल्याने त्या नदीत मगरींचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शोधकार्यात या मगरींच्या अडथळ्याचाही सामना मदत पथकाला करावा लागला.

नौदल, एनडीआरएफचेही शोधकार्य
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) चे एक पथक केंद्रीय गृह मंत्रालयाने काल पुण्याहून कुडचड्याला शोधकार्यात भाग घेण्यासाठी रवाना केले. शुक्रवारी दुपारी ते सुसज्ज पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याजवळ खास पाण्यात वापरायचे कॅमेरे, पाणबुडे वगैरे असल्याने दुपारी साडेतीनपासून त्यांनी जोरदार शोधमोहीम हाती घेतली, मात्र, मृतदेह सापडू शकला नाही. शुक्रवारी सकाळी नौदलाच्या ‘चेतक’ हेलिकॉप्टरनेही दुर्घटनास्थळावर भरार्‍या मारून मृतदेहांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. किनारी पोलीस दलाच्या बोटीही तैनात करण्यात आल्या होत्या. अग्निशामक दलाने शोधकार्यात मोठी भूमिका बजावली असून त्यांनी पंचवीस जणांना या दुर्घटनेतून बाहेर काढले.