मनोरोगाचा भस्मासुर

0
194

– नीला भोजराज

स्वतः आनंदी राहणे व इतरांनाही आनंद देणे, परमेश्‍वरी शक्तीवर विश्‍वास ठेवणे, थोडी उपासना व होईल तितके नाम घेणे आणि शेवटी सर्व मानवजात ही एकच जात अस्तित्वात असून मानवा मानवामध्ये भेद न करता गुण्यागोविंदाने राहणे… या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण अमलात आणणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं मानसिक आजारांच्या संकटाचं हे सावट, त्याचा परिणाम आपल्याला याचि देही याचि डोळा बघावे लागेल. शेवटी पराधीन आहे जगती… पुत्र मानवाचा..!!

‘सन २०२० पर्यंत मानसिक आजार झालेल्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली असेल’, असे भाकित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशिवाय इतर अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेले आहे. वरवर पाहता आपल्याला याची कारणे गतिमान जीवनशैली, समाजात असलेली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंब पद्धती, बेरोजगारी, भ्रष्टाचार, तरुण पिढीकडून होणारा तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर, कुटुंबात आणि बाहेरच्या जगात एकमेकांशी तुटलेला संवाद, मानसिक उपचारांबद्दल असलेले गैरसमज आणि अशी कितीतरी सांगता येतील. पण हे युग गतिमान असल्यामुळेच जेथे समस्या निर्माण होतात तेथे लगेच त्यावर उपायही शोधले जातात व त्यांचे निराकरण करण्याकरता अनेक मार्गही समाजापुढे आणून ते हाताळले जातात, हेही तितकेच खरे आहे. आता हेच पहा ना… जसे शालेय विद्यार्थ्यांमधील समस्या वाढायला लागल्या तसे समुपदेशकांची नियुक्ती प्रत्येक शाळेमध्ये केली गेली किंवा करिअर करणार्‍यांमध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती मानसोपचार, बालकांचे मानसशास्त्र किंवा समुपदेशन या विषयांकडे मोठ्या संख्येने आज वळताना दिसून येत आहे. मला वाटतं, पूर्वीच्या काळी या समस्या नव्हत्याच की त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या?
आताचं युग हे जसं विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं युग आहे तसंच ते संशोधनाचंही युग आहे. प्रत्येक क्षेत्रात आज जगभरात अनेक संशोधनं चालू असतात. वाढत्या माध्यमांमुळे लगेच ते प्रकाशातही येत असतात. त्यामुळे तज्ज्ञ मंडळी भविष्यात उभे ठाकणार्‍या संकटांची आपल्याला आगाऊ कल्पना देत असतात आणि हे फार चांगले आहे.
पूर्वीचा काळ पाहता त्यावेळी सर्वप्रथम कौटुंबिक स्थितीचा आढावा घेणे योग्य ठरेल. त्या वेळी कुटुंबात कमीत कमी १२ ते १५ माणसं आणि जास्तीत जास्त ३०-३५ पर्यंत अशी माणसं असायची. एक तर कुटुंबनियोजनाचा प्रचार-प्रसार जास्त प्रमाणात न झाल्यामुळे प्रत्येकाला होणार्‍या अपत्यांची संख्याच त्यावेळी जास्त असायची. शिवाय आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, लग्न न झालेली किंवा विधवा आत्या वगैरे असे मिळून संख्या वाढतीच असायची. शिवाय त्यावेळी शिक्षणाच्या सोयी मर्यादित शहरांमध्येच असल्यामुळे नातलगांची मुले शहरातल्या नातेवाईकाकडे शिकायला असायची. याशिवाय कुणाचं घर सरकारी दवाखान्याच्या जवळ असेल तर रुग्णाचे नातेवाईकही त्यात तात्पुरते रहायला येऊन सदस्यांची संख्या वाढवायला कारणीभूत ठरायचे. आता ही सर्व मंडळी एकोप्याने रहायची असे जरी मानले तरी त्या काळीही समस्या काही कमी नव्हत्या. एक तर बाल विवाह व्हायचे. त्यामुळे एवढ्या लहान वयातल्या सुनेवर संस्कार करण्याची जबाबदारी घरातील ज्येष्ठ मंडळींवर असायचीच. सुनेचं वय न समजणारं असल्यामुळे तिने चार लोकांत काय बोलायचं – बोलायचं नाही, कसं उठायचं, कसं बसायचं, घरातील कोणती कामं करायची, अभ्यास कधी करायचा वगैरे वगैरे. अशातच काही ठिकाणी लहान वयातच मुलींना वैधव्य येऊन त्यांचे तारुण्य संकटात यायचे. त्या तरुण विधवा स्त्रिया म्हणजे जणू जळता निखाराच! त्या निखार्‍यातली आग पूर्णपणे विझुही द्यायची नाही आणि भडकूही द्यायची नाही यासाठी घरच्या ज्येष्ठ मंडळींना जी तारेवरची कसरत करावी लागायची त्याबद्दल न बोललेलंच बरं. स्त्रीने जास्त शिकायचे नाही, घराच्या बाहेर पडायचे नाही इत्यादी नियम होतेच. बहुधा त्या काळी कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त व कमावणारे पुरुष एकटे-दुकटेच. त्यामुळे त्यांच्याही डोक्यावर कर्जाचा बोजा असायचा. म्हणजे त्या काळी समस्या नव्हत्या असे नव्हते. पण आजच्या इतकी माध्यमे त्या काळी नव्हती व स्त्रियांना बदनामीची भीति वाटून त्या स्वतःच्या समस्या मोकळेपणाने कुणाजवळ बोलून दाखवत नव्हत्या म्हणून वरवर पाहता आपल्याला आजच्या समस्या खूप मोठ्या वाटतात. पण त्या काळी विधवा स्त्रीला घरातील ज्येष्ठ स्त्रियांकडून मिळणारी वागणूक आठवली तरी अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही. तसेच त्या काळी मुलांना तरी त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य कुठे होते? समजा एखाद्याला बाहेरगावी व्यावसायिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली असली तरी-
घरी.. ‘हं, आपल्याला कुठे परवडणार आहे त्याला बाहेरगावी पाठवणं..!, पैसा नको का जवळ त्याला शिकवायला..!’ किंवा मग ‘त्याला इतकं शिकवून काय करायचं..? घरचा वडलोपार्जित व्यवसाय आहे ना… तोच सांभाळावा त्याने. वेगळं शिकून काय दिवे लावणार आहे? मग हा व्यवसाय कोण सांभाळेल?’ वगैरे वगैरे मुक्ताफळं त्याला ऐकवली जायची. मग बिचारा आपले मन मारून जे आणि जेवढं शिक्षण त्याच्या गावात असेल तेवढे शिकून निमूटपणे बापाच्या धंद्यात काम करायला लागायचा. हे झालं मुलांचं. आता समजा घरातली सून, तिच्या माहेरच्या आधुनिक वातावरणामुळे थोडी जास्त किंवा वेगळं काहीतरी शिकलेली असेल तर साहजिकच तिला वाटायचं.. आपणही नोकरी करावी किंवा स्वतःचा काहीतरी छोटासा व्यवसाय सुरु करावा..! पण… पुन्हा हा पण त्यात आडवा येत होताच. कारण घरातील बाकीच्या स्त्रिया तिच्या शिक्षणाच्या तुलनेत फारच कमी शिकलेल्या असायच्या. त्यामुळे त्यांच्याजवळ घरातली कामे करण्यापलीकडे काहीही पर्याय नसायचा. त्या अगदी आनंदाने आणि निमूटपणे घरातली कामे करायच्या. पण या शिकलेल्या सुनेला मात्र सतत आपले मन मारावे लागायचे.
आता या वर उल्लेखिलेल्या समस्या ज्या त्या काळी होत्या त्या आपल्या मनाच्या आरोग्याशीच संबंधित होत्या की नाही? मग निश्‍चितच त्यामुळे मानसिक समस्या जशा आज दिसतात – नैराश्य, चिंता, वेडेपणा… या त्या काळीही उद्भवत असतीलच की? हं, आता वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यावेळी अशा रुग्णांची संख्या थोडी कमी असेल… पण मानसिक आजार आजच जास्त प्रमाणात दिसताहेत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे नसले तरी पूर्णपणे बरोबर आहे असेही नाही. फक्त त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञ बोटांवर मोजण्याइतकेच. त्या रोगांवर आज जितकी चांगली औषधे निघालेली आहेत, तितकी त्या काळी नव्हती. त्यामुळे त्या रुग्णांचे डोके शांत रहावे म्हणून जास्तीत जास्त वेळ त्यांना झोपवून ठेवायचे… म्हणजे झोपेच्या गोळ्याच जास्त प्रमाणात दिल्या जायच्या. म्हणून लोकांमध्ये गैरसमज असाच झाला की मानसिक आजारांवर औषध म्हणजे फक्त झोपेच्या गोळ्याच! त्यामुळे बरेच लोकं डॉक्टरांकडे जातही नसत. शिवाय नातेवाईक व समाजामध्ये लोकांना कळू नये म्हणून कुणाच्या मुलाला किंवा मुलीला मानसिक रोग झालाच तर ते इतके लपून-छपून डॉक्टरांकडे जायचे, कुणाकडे मंगलकार्याला जायचे नाहीत, जेणे करून त्याची जास्त चर्चा होऊ नये! त्यामुळे या कानाचा त्या कानाला पत्ताच लागत नसे की अमक्या अमक्याच्या मुलाला/सुनेला/मुलीला मानसिक आजार जडला आहे म्हणून!
पण आज सुदैवाने सगळीच परिस्थिती बदलली आहे. शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ आणि जागरूक शिक्षक आज शालेय विद्यार्थ्यांमधील समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी इतके कष्ट घेताहेत की त्यामुळे आज अशी समस्याग्रस्त मुले कमीच असतील ज्यांना त्यावर उपाय सापडला नाही. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे व विभक्त कुटुंबांत राहण्यामुळे मुलांमध्ये ज्या काही समस्या – मग त्या वागणुकीच्या, मानसिक, शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव किंवा स्मरणशक्ती किंवा न्यूनगंड इत्यादी असतील, त्यांच्यावर आज भरपूर प्रमाणात पुस्तकं लिहिली जात आहेत, चर्चासत्रं आयोजित केली जात आहेत, भाषणांमधून, प्रवचनांतून, कीर्तनातून जागृती केली जात आहे. शिक्षण क्षेत्रात त्या दृष्टीने वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. गल्लोगल्ली चांगले समुपदेशक तयार होत आहेत. शिक्षक, डॉक्टर्स, समुपदेशक शाळा-शाळांमध्ये कार्यशाळा घेत आहेत, शिबिरं घेतली जात आहेत. म्हणजेच काय की एकंदर गोव्यातील म्हणा किंवा इतरही ठिकाणची परिस्थिती पाहता सकारात्मक पाऊले मोठ्या प्रमाणात आज उचलली जात आहेत आणि ही निश्‍चितपणे चांगली गोष्ट आहे.
शालेय जीवनानंतर प्रश्‍न येतो तो करिअरचा किंवा रोजगाराचा. आज काही ना काही कारणांमुळे (कामगारांचा अभाव, प्रदूषण, यांत्रिकीकरण इ.) मोठमोठ्या कंपन्या, कारखाने बंद पडत आहेत, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करताना दिसते आहे. म्हणूनच तरुणांमध्ये नैराश्य, डिप्रेशन, वेडेपणा आणि आत्महत्या यांचे वाढते प्रमाण आहे. अगदी वयात आलेला एकुलता एक मुलगा, किंवा लग्नाचे वय निघून गेलेली मुलगी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना येणार्‍या आरोग्याच्या तक्रारी यामुळे आजचे पालक अगदी मेटाकुटीला आलेले आहेत. ते त्यांच्या अपत्याबद्दल बाहेर कुणाजवळ मोकळेपणाने काही बोलूनही दाखवू शकत नाही व घरची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे होणारी त्यांची ससेहोलपट टाळूही शकत नाहीत. असे पालक जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा खरंच असं वाटतं की देव इतका का निष्ठूर आहे… त्याला यांची दया येत नाही? यांचं काय चुकलं म्हणून यांच्या सोन्यासारख्या अपत्यावर ही वेळ यावी? असे अनेक प्रश्‍न मनात येतात. यांच्या मानसिक आजार झालेल्या रुग्णांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते तर अगदी कपड्याच्या शोरूममध्ये असलेल्या पुतळ्यांसारखीच भासतात. कुणाशी बोलणं नको, हासणं नको, मिसळणं नको… आपल्याच राज्यात पण निराश, उदास, मौन अशा अवस्थेत दिसतात. अशा वेळी हृदयाला पीळ पडतात आपल्या. वाटतं अशी वेळ कुणावरही येऊ नये. पण ही आजची सत्यपरिस्थिती आहे हे मात्र खरे!!
याशिवाय ज्या मुलींना लग्नानंतर त्यांच्या सासरच्यांच्या पैशांच्या मागण्या पूर्ण करता येत नाही, त्यांना मुलगा होत नाही (मुलीच होतात), त्या कमी शिकलेल्या आहेत म्हणून नवर्‍याची किंवा सासरच्या मंडळींची खोटी प्रतिष्ठा त्या सांभाळू शकत नाही, इत्यादी इत्यादी अशा अनेक कारणांमुळे वेडे होण्याची पाळी येते. त्यांच्या हयात असलेल्या पालकांवर किंवा भावंडांवर संकटांचा पहाडच कोसळतो. त्यांच्या अपत्यांचा सांभाळ, त्यांच्यावर उपचार, त्यांचा सांभाळ म्हणजे एक न संपणारा अडथळ्यांचा प्रवासच म्हणा ना!! कसं काय जीवन जगत असतील अशा मुला-मुलींचे पालक? ते जिवंत असल्याचा आभास निर्माण करत असतील कदाचित पण त्यांचे मरण त्यांनी स्वतःच बघितलेले असेल अनेक वेळा.
शेवटी पण ज्यांचे प्रमाण आजच्या काळात सर्वांत जास्त आहे ते म्हणजे घरातील, विभक्त कुटुंबातील वृद्ध-वयस्कर मंडळी. त्यांचे हाल तर सुपरिचितच आहेत. कारण ज्यांची मुलं जवळ आहेत ती चांगली वागत नाहीत म्हणून ते बेजार, ज्यांची मुलं-सुना चांगली आहेत पण नोकरीनिमित्त ती परदेशात स्थायिक झाली आहेत म्हणून ते बेजार, काहींना अपत्यच नाही म्हणून एकटे तर काहींची तरुण मुलं अपघातात मरण पावली म्हणून निराधार. त्यांची अवस्था तर आज दयनीय झालेली आढळून येते. कारण वयोमानानुसार त्यांची गात्रे शिथिल झालेली असतात, त्यांना निरनिराळ्या शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रासलेले असते, त्यांचे दैनंदिन व्यवहारही त्यांना सुरळीतपणे पार पाडता येत नाहीत आणि वृद्धाश्रम किंवा महिलाश्रमात नेऊन टाकले तरी तिथेही त्यांना काही नियम पाळावेच लागतात. त्यामुळे तेथेही ते इतरांना नकोसे होतात किंवा तेथूनही त्यांना परत घरी पाठवले जाते. हाय रे दुर्दैवं! खरंच विचार करून करून डोकं शिणायला होतं नव्हे डोकं दुखायला लागतं. प्रत्येक सूज्ञ नागरिकाने जरी आज या लोकांना मदत करायचे ठरवले तरी आपण कुठेतरी कमीच पडणार इतकी या समस्यांची संख्या अनियंत्रित झालेली दिसून येते.
मला तरी यावर आता एकच उपाच दिसतो की पुन्हा फिरून झालेल्या चुका दुरुस्त करणे, यांची कारणे शोधून ती नाहीशी करणे, अशा केसेस होऊ नयेत म्हणून काळजी घेणे, प्रत्येकाने स्वतः स्वावलंबी बनून स्वतः होईल तितकी इतरांना मदत करणे, मुख्य म्हणजे एकमेकांवर प्रेम करणे, मनापासून एकमेकांना जपणे, स्वतः आनंदी राहणे व इतरांनाही आनंद देणे, परमेश्‍वरी शक्तीवर विश्‍वास ठेवणे, थोडी उपासना व होईल तितके नाम घेणे आणि शेवटी सर्व मानवजात ही एकच जात अस्तित्वात असून मानवा मानवामध्ये भेद न करता गुण्यागोविंदाने राहणे… या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण अमलात आणणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं मानसिक आजारांच्या संकटाचं हे सावट त्याचा परिणाम आपल्याला याचि देही याचि डोळा बघावे लागेल. शेवटी पराधीन आहे जगती… पुत्र मानवाचा… दोष ना कुणाचा!!