सशक्त आणि सहजसुंदर

0
124

एखादी सकाळ नियतीची अतर्क्यता आपल्या मनावर ठसवत उगवत असते. अवघ्या ५९ वर्षांच्या रीमा लागू ह्रदयविकाराने आपल्यातून निघून जातील याची कोणी कल्पना केली असेल? पण गुरुवारी भल्या सकाळी रसिकांना हा धक्का पचवावा लागला. रीमा यांची चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमधील प्रदीर्घ कारकीर्द मागे वळून पाहताना पुन्हा पुन्हा आठवत राहतो तो त्यांचा गोल, चित्पावनी चेहरा, घारे डोळे आणि वैविध्यपूर्ण, सशक्त अभिनय. हिंदी चित्रपटसृष्टीला भले त्यांची ‘आई’च दिसली असेल, ‘मैने प्यार किया’ मध्ये सलमानची आई, ‘हम आपके है कौन’ मध्ये माधुरीची आई, ‘कुछ कुछ होता है’ मध्ये काजोलची आई, ‘कल हो ना हो’ मध्ये शाहरुखची आई अशी त्यांची ‘आई’ सहजसुंदर अभिनयामुळे सर्वांना आपलीशी वाटली हे खरेच, परंतु रीमा या त्याहून कितीतरी पटीने सरस अभिनेत्री होत्या. त्यामुळे नुसती ‘बॉलिवूडची आई’ म्हणून त्यांचे कोडकौतुक करणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. ‘पुरूष’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘झाले मोकळे आकाश’ सारखी गाजलेली नाटके, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’सारखा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट, ‘तुला मी, मला मी’ सारखा गिरीश कर्नाड लिखित एकपात्री कार्यक्रम अशांतून रीमा लागू यांच्या अभिनयाने गाठलेली उंची ही त्यांची खरी उंची होती. बॉलिवूडमधील चित्रपटांतून त्यांनी रंगवलेली बंगल्यातली प्रसन्न, हसरी, ग्लॅमरस आई सुखावणारी होतीच, परंतु ‘वास्तव’ मध्ये रघुनाथ नामदेव शिवलकर ऊर्फ रघुभाई या आपल्या गुन्हेगार मुलाला गोळ्या घालणारी करारी आई त्यांच्या समर्थ अभिनयक्षमतेची चुणूक हिंदी चित्रपटसृष्टीलाही दाखवून गेली होती. नाना प्रकारचा, वेगवेगळ्या जातकुळीचा सशक्त अभिनय त्यांच्या रक्तात होता. आपल्याला निगेटिव्ह भूमिका करायची इच्छा त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. अगदी शाळेत असल्यापासून त्या अभिनयाच्या क्षेत्रात उतरल्या. आई मंदाकिनी भडभडे ‘लेकुरे उदंड झाली’ सारख्या नाटकांतून गाजलेल्या अभिनेत्री असल्याने तो वारसा पाठीशी होताच. पुण्यातल्या हुजूरपागेसारख्या शाळेतले संस्कार त्यांच्या अभिनयगुणांना पूरक ठरले. स्मीता तळवलकरही ह्याच शाळेच्या विद्यार्थिनी. त्यामुळे लहान वयातच ही ‘बेबी नयन’ भडभडे अभिनयाच्या क्षेत्रात आली आणि आपल्या अस्सल अभिनयगुणांच्या जोरावर मराठीतच नव्हे तर हिंदीतही झेंडा फडकावून गेली. नाटक – टीव्ही – चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये असे झगमगते यश मिळवणार्‍या व्यक्तींमध्ये त्यांची गणना करावी लागते. अभिनयातील वैविध्याची कोणत्याही जातिवंत कलाकाराला आस असते. रीमा यांनाही ती होती. त्यामुळे ‘तू तू मै मै’ मालिकेत सुप्रिया पिळगावकरसोबतची धमाल सासू आणि सध्या सुरू असलेल्या ‘नामकरण’ मधील दयावंती मेहता ही खलनायिका अशा दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका त्यांनी तितक्याच समरसतेने आणि सहजतेने साकारल्या. साचेबद्धतेत अडकून न पडण्याची काळजी घेणार्‍या रीमांना आजच्या मालिकांतील खोट्या खोट्या, त्यांच्या भाषेत ‘कचकड्याच्या’ गोष्टी पसंत नव्हत्या. दमदार कथेच्या शोधात त्या नेहमी असत. प्रेक्षकांबरोबर वाहत न जाता आपण त्यांची अभिरूची घडवली पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या अभिनयाचे सर्वांत महत्त्वाचे अंग म्हणजे त्यातील सहजता. ती निव्वळ विलोभनीय असायची. नुसत्या डोळ्यांतून भावना समर्थपणे व्यक्त करण्यातील त्यांची हातोटी विलक्षणच म्हणायला हवी. फिल्मफेअरपासून अनेक पुरस्कार त्यांना लाभले, परंतु त्या कधीच पुरस्कारांमागे धावल्या नाहीत, पण पुरस्कार त्यांच्याकडे चालून आले. लक्षावधी रसिकांच्या मनात त्यांनी मिळवलेले स्थान हा त्यांचा खरा, चिरंतन पुरस्कार असेल!