लढा कॅन्सरशी…

0
282

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी सुरू करण्यापूर्वी रुग्णाचे मनोबल वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. उपचार पद्धतीचे फायदे-तोटे शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगावे. रुग्णाच्या मनामध्ये आजारातून बाहेर पडून पूर्वीप्रमाणे दिनक्रम आचरण्याची तीव्र इच्छा उत्पन्न करावी.

केमोथेरपी-रेडिओथेरपी व आयुर्वेदीय चिकित्सा
कॅन्सरसाठी सध्या आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या प्रचलीत चिकित्सापद्धती आहेत. त्यामुळे बहुतांश कॅन्सरग्रस्त रुग्ण या चिकित्सांचा अवलंब करतात. कॅन्सरचे निदान झाल्यावर रुग्णासह, परिवार, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचा वर्ग, आप्तेष्ट सगळ्यांचेच मनोबल, धैर्य खचते. अशा वेळी प्रत्येकाची चिकित्सा पद्धतीबाबत वेगवेगळी प्रतिक्रिया असते. काहींच्या मते आयुर्वेदिक चिकित्सा घ्यावी, काहींच्या मते होमिओपॅथिक, काहींच्या मते निसर्गोपचार, आधुनिक वैद्यकशास्त्र इत्यादी. अशा वेळी कोणती चिकित्सा घ्यावी असा प्रश्‍न रुग्णाच्या मनाला पडतो. पण कँसर हा असाध्य व्याधी आहे. कोणतीही चिकित्सा पद्धती या व्याधीला समूळ नष्ट करू शकत नाही. हो, पण कँसरमध्ये उत्पन्न होणार्‍या काही लक्षणात निश्‍चितच उपशय मिळू शकतो.
अशा वेळी आधुनिक शास्त्र चिकित्सेवर आयुर्वेदिक चिकित्सा घ्यावी. केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी यांचे काही दुष्परिणाम असतात.
* रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम…
– स्थानिक दाह
– तेथील त्वचा लाल होणे,
– त्वचेवर फोड येणे,
– उष्ण स्पर्श
– ताप येणे… अशी लक्षणे निर्माण होतात.
* केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम…
– भूक मंदावणे
– मळमळ, उलट्या
– जुलाब
– ताप
– केस गळणे
– सर्वांगाची आग होणे… अशी लक्षणे दिसतात.
या लक्षणांच्या भीतीनेच अनेक रुग्ण केमोथेरपी व रेडिओथेरपी टाळण्याचा प्रयत्न करीत असतात व यास पर्याय म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा घ्यावी का असा विचार करू लागतात. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैद्यकशास्त्रात कॅन्सरसाठी कायमस्वरूपी पूर्ण चिकित्सा उपलब्ध नसल्याने पर्यायी चिकित्सा म्हणून आयुर्वेदीय चिकित्सा घेण्याऐवजी केमोथेरपी किंवा रेडिएशनसह उष्णतेचे, पित्ताचे व विषाक्ततेचे शमन करणारी, पित्तशमन करणारी आयुर्वेदिक औषधे, विशिष्ट आहार-विहार, मानसिक संतुलन यांचा अवलंब केल्यास त्यामुळे निर्माण होणारी लक्षणे कमी होतात व रुग्ण उपचारपद्धतीस चांगला प्रतिसाद देतो.
रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी सुरू करण्यापूर्वी रुग्णाचे मनोबल वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. उपचार पद्धतीचे फायदे-तोटे शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगावे. रुग्णाच्या मनामध्ये आजारातून बाहेर पडून पूर्वीप्रमाणे दिनक्रम आचरण्याची तीव्र इच्छा उत्पन्न करावी.
आयुर्वेदीय उपचारांच्या साहाय्याने कॅन्सरमुळे, रेडिओथेरपी व केमोथेरपीमुळे व्यक्त होत असलेली लक्षणे कमी होणे, रोगप्रतिबंधक शक्ती वाढणे यांसारख्या गोष्टी साध्य होतात. या चिकित्सा पद्धतीने रुग्णांमध्ये विशिष्ट लक्षणे कमी करणे, कॅन्सरचा प्रसार व पुनरुद्भव आटोक्यात ठेवणे व रुग्णाच्या जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे या गोष्टी साध्य करता येतात.
रेडिओथेरपी व केमोथेरपी यामुळे मुख-जिव्हा-घसा-अन्ननलिका-आमाशय-आतडे-गुद व त्वचा या अवयवात प्राधान्याने पित्तवर्धक लक्षणे निर्माण होत असल्याने मऊ-हलका असा शामक आहार या कालावधीत रुग्णास उपयुक्त ठरतो.

* आहार ः
– तूपावर भाजलेल्या तांदळाची पेज
– मुगाचे वरण
– मिरची किंवा गरम मसाला अजिबात घालू नये व साजूक तुपाची फोडणी दिलेल्या उकडलेल्या भाज्या.
– फुलके खावे.
– भाज्यांचे सूप घ्यावे.
– गोड ताजे ताक
– लोणी, गायीचे दूध
– नाचणीचे सत्व यांचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर करावा.
– गोड ताजी द्राक्षे.
– डाळिंब
– अंजीर अशी रसाळ व गोड फळे.
– साळीच्या लाह्या
– उकळून थंड केलेले पाणी यांचाही आहारात समावेश करावा.
एकाच वेळी पोटभर न जेवता दर ३-३ तासांनी थोडा-थोडा आहार घ्यावा. जेवताना आजुबाजूचे वातावरण प्रसन्न असावे.

* विहार ः
– विशेषतः उष्ण ऋतूंत रुग्णाने या चिकित्सापद्धतीचा अवलंब करताना घरच्या भिंती/पडदे यांवर वारंवार थंड पाणी शिंपडून घरात शितलता निर्माण करावी.
– गुलाब, कमळ यांसारखी मनास आल्हाद देणार्‍या फुलांनी घर सु्‌शोभित करावे.
– कोंदट-ऊबदार खोलीत झोपू नये.
– दिवसा झोपणे व रात्री जागरण वर्ज्य करावे.
– सर्वांगाचा किंवा विशिष्ट अवयवाचा दाह होत असल्यास चंदनाचा लेप लावावा किंवा त्या ठिकाणी केळीची पाने गुंडाळावी. ज्या भागावर रेडिओथेरपी चिकित्सा चालू आहे त्या भागावर मात्र काहीही लावू नये.
– फिकट रंगाचे सुती व सुटसुटीत कपडे घालावे.
– संताप हाही विशेषतः पित्तप्रकोपाचा हेतू असल्याने या कालावधीत रुग्णाने स्वतः तसेच त्याच्या नातेवाईकांनी ही रुग्णाच्या मनास आल्हाद मिळेल अशा उपक्रमांचे पालन करावे.
– या कालावधीत रुग्णाने स्वतःच्या शक्तीचा विचार करून सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत सोसवेल इतकेच फिरावे.
– रोज किमान ५ मिनिटे तरी प्राणायाम करावा.
– ॐकार उच्चारण करावे किंवा किमान सतत ॐ ध्वनी ऐकत रहावे.

केमोथेरपी व रेडिओथेरपीचे इतर दुष्परिणाम कसे टाळाल?…
– वरील उपचारांमुळे जर लघवीची जळजळ होत असेल तर रुग्णास धने-जिर्‍याचे पाणी द्यावे.
– सर्वांगाची/डोळ्यांची/हातापायांच्या तळव्यांची/लघवीची जळजळ होत असेल तर चंदनाचे पाणी द्यावे.
– तसेच गुलाबाच्या पाकळ्या घातलेले पाणी द्यावे.
– सर्वांगाचा दाह अधिक प्रमाणात असल्यास गुलकंद, मोरावळा द्यावा.
– डोळ्यांची आग होत असल्यास निरसे दूध किंवा गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्या.
– सर्वांगाचा दाह कमी करण्यासाठी तळपायाला गाईचे तूप काशाच्या वाटीने चोळावे.
– केमोथेरपीचा थेट परिणाम केसांवर होत असल्याने नित्यनियमाने खोबरेल तेल डोक्यास चोळावे.
– तूपात कापसाचा पिचू बुडवून डोक्यावर ठेवावा. केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमध्ये शरीराची विशेष बलहानी होते, ती बलहानी भरून काढण्यासाठी रसायन चिकित्सेचा उपयोग करावा.
– रसायन द्रव्यांमध्ये शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यांसारखी रसायन औषधे वापरावीत.
– रोज सकाळी १ चमचा च्यवनप्राश चाटावे.
– सुवर्णसिद्ध जलाचा वापर करावा.
अशाप्रकारे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी उपचार करण्यापूर्वी व उपचार केल्यानंतर काही आहार-विहार-पथ्यपालन व आयुर्वेदीय उपचारांचा अवलंब केल्यास रेडिओथेरपी/केमोथेरपीचे दुष्परिणाम काही अंशी टाळता येतात व त्याचबरोबर उपचारपद्धती सुसह्य होते.