रसिकांच्या काळजात कायमची घुसलेली ‘कट्यार…’

0
443

पं. प्रसाद सावकार
(शब्दांकन ः रामनाथ न. पै रायकर)

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी तिघे गोमंतकीय एकत्र आले आणि त्यांनी एका अजरामर संगीत नाटकाची निर्मिती केली. ते नाटक होते ‘कट्यार काळजात घुसली’ आणि त्याची निर्मिती करणारे ते तिघे गोमंतकीय होते, द्रष्टे नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर, असामान्य प्रतिभेचे संगीत संयोजक पं. जितेंद्र अभिषेकी आणि लोकप्रिय गायक नट पं. प्रसाद सावकार. मराठी रंगभूमीच्या वाटचालीत हे नाटक म्हणजे मैलाचा दगड ठरले. ‘कट्यार’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने पं. प्रसाद सावकार यांनी जागवलेल्या त्याच्या आठवणी…

१९६६ साल असेल. नागपूरचे नाटककार आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हिज मास्टर्स व्हॉईस (एचएमव्ही) च्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत मला भेटायला आले. मला तिथे आचार्य अत्र्यांच्या ‘लग्नाची बेडी’तील दोन गाणी ध्वनिमुद्रित करण्यासाठी बोलावले होते. एचएमव्हीच्या त्या म्युझिक रूममध्ये दारव्हेकर मला म्हणाले की महंमद हुसेन ह्या गायकाच्या दंतकथेवर त्यांना एक नाटक लिहायचे आहे आणि त्यातील खॉंसाहेब आफताब हुसेन बरेलीवाले यांची भूमिका मी करावी अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा मी ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘मंदारमाला’ या दोन संगीत नाटकांत शास्त्रीय गायकाची भूमिका करीत होतो. दारव्हेकरांनी तोवर संगीत नाटक लिहिलेले नव्हते.
योगायोग म्हणजे महंमद हुसेनच्या कथेवर विद्याधर गोखल्यांनी १९६३ साली ‘मंदारमाला’ लिहिले होते. हुसेन हे ग्वाल्हेर संस्थानात दरबारी गायक होते आणि आपल्या संगीतविद्येविषयी ते खूप गोपनीयता बाळगत असत. एवढी की, आपला रियाजदेखील ते कडेकोट बंदोबस्तात करायचे. वार्षिक संगीत मेळ्यात आपली गायकी दाखवून दरबारी गायक व्हायच्या ध्येयाने पछाडलेल्या हद्दू खान आणि हस्सू खान या दोघा भावांनी पहारेकर्‍यांना लाच दिली आणि हुसेन यांची गायकी ते रियाज करीत असताना चोरून ऐकणे सुरू केले.
स्पर्धेच्या दिवशी जेव्हा दोघा भावांनी हुसेन यांना त्यांच्याच शैलीत गाऊन नामोहरम करायला सुरूवात केली, तेव्हा हुसेन सावध झाले आणि त्यांनी त्यांना ‘कडक बिजलीची तान’ घेण्यास फर्मावले. त्या प्रकारची तान घेताना फुफ्फुसांवर प्रचंड ताण येतो. हस्सू खानने तशी तान घेतली खरी, पण हुसेन यांनी त्याला पुन्हा एकदा ती तान घ्यायला फर्मावले. लागोपाठ दोनदा ती तान घेतल्याने त्याच्या फुफ्फुसांवर प्रचंड ताण आला आणि ती फाटून तेथेच त्याचा प्राण गेला.
दारव्हेकरांच्या त्या भेटीनंतर वर्ष निघून गेले. एक दिवस ‘नाट्यसंपदे’तून मला फोन आला. दारव्हेकरांच्या नाटकाची आपण निर्मिती करीत असल्याचे प्रभाकर पणशीकर मला म्हणाले. मी त्यात मुख्य भूमिका करावी असा आग्रह त्यांनी केला. खरे सांगायचे तर त्या नाटकाच्या शुभारंभाला आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेचेच निमंत्रण त्यांनी मला दिले होते. एव्हाना पं. जितेंद्र अभिषेकी हेही त्या नाटकाशी निगडित झाले होते आणि त्याच्या गाण्यांच्या चाली बांधत होते. ते स्वतः मंदिराच्या पुजार्‍याच्या कुटुंबातील असल्याने नव्या नाटकाच्या वाचनापूर्वी त्यांनी मंत्रोच्चारही केला.
आणखी एक योगायोग म्हणजे १९६७ साली डिसेंबरमध्ये भालचंद्र पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक कंपनीला साठ वर्षे पूर्ण होत होती. त्या सोहळ्यात पणशीकरांनी आपले नवे नाटक सादर करावे अशी गळ पेंढारकरांनी घातली.
१९६७ च्या मध्यावधीपर्यंत कलाकारांची निवड वगैरे पूर्वतयारी झाली होती. पण सदाशिवच्या भूमिकेसाठी कलाकार सापडत नव्हता. त्यामुळे पणशीकरांनी विनंती करताच मी ‘सदाशिव’ करायला तयार झालो आणि खॉंसाहेबांच्या भूमिकेसाठी वसंतराव देशपांडे यांचे नाव सुचवले. ते त्या भूमिकेसाठी योग्य ठरतील असे मला वाटले.
खरे तर मी पुण्यात १९४७ ते १९५० या काळात एस. पी. कॉलेजजवळ राहात होतो आणि वसंतराव माझे शेजारी होते. आमच्या इमारतीत एका मुलाला संगीत शिकवायला ते यायचे. अनेकदा मी ते ऐकायला जात असे. वसंतराव १९४० च्या सुमारास लाहोरला वास्तव्याला होते आणि त्यांनी तेथील ऊर्दू छानपैकी आत्मसात केली होती. त्यांच्या त्या सगळ्या गुणांना लक्षात घेऊन मी त्यांच्या नावाची पणशीकरांकडे शिफारस केली.
दुर्दैवाने त्या माझ्या शिफारशीवर दारव्हेकरांची थंड प्रतिक्रिया आली. दारव्हेकरांच्या मते वसंतरावांची ओढून ताणून बोलण्याची लकब या भूमिकेला योग्य नव्हती. पण पणशीकरांनी वसंतरावांशी संपर्क साधला. दारव्हेकर ज्या गोष्टी वसंतरावांच्या उणिवा मानत होते, तीच पुढे त्या भूमिकेची बलस्थाने ठरली. ‘कट्यार’ म्हणजेच ‘वसंतराव’ असे पुढे समीकरण होऊन गेले. त्यामुळे अनेकांना आजही वाटते की हे नाटक वसंतरावांनाच डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेले असावे.
मी ‘सदाशिव’ करायचा अंतिम निर्णय घेतला तेव्हा मला ‘घेई छंद मकरंद’ गायचे होते. दुसर्‍या एका नाटकातील ‘रती रंगी रंगे ध्यान’ या गाण्याच्या मीटरमध्ये ते गाणे लिहिलेले होते. अभिषेकींनीही मूळ चाल कायम ठेवली. मी त्यांना कर्नाटकी संगीतातील सालग वराळी ह्या रागात हे गाणे बांधण्याची शिफारस केली. तो राग मी पूर्वी रेडिओवर गायिलो होतो. माझे दुसरे गाणे होते ‘मुरलीधर श्याम’, त्यासाठी मी ‘पुरिया कल्याण’सुचवला, पण अभिषेकींनी ते मारवा कल्याणमध्ये बसवले. नंतर ही दोन्ही गाणी मी एचएमव्हीसाठी ध्वनिमुद्रित केली.
बाल सदाशिवची भूमिका माझा मुलगा शेखरने केली होती. सुरवातीपासूनच त्याने त्या भूमिकेत रंग भरला. त्याचा आवाज चांगला होता आणि रसिक आपल्याला कुठे टाळ्या वाजवतील याची त्याला त्या वयातही समज होती.
कुठल्याही सर्वसाधारण संगीत नाटकाला तालमींसाठी दोन महिने लागतातच, पण आम्ही तीन महिने तालीम केली. त्याच्या तांत्रिक बाजूही भक्कम होत्या. नाटकासाठी एक मोठा आणि दोन छोटे असे तीन फिरते रंगमंच वापरण्यात आले होते. भारतात हा प्रयोग प्रथमच होत होता.
शेवटी जेव्हा नाटकाचा पहिला प्रयोग २४ डिसेंबर १९६७ रोजी गिरगावच्या साहित्य संघात प्रेक्षकांपुढे सादर झाला, तेव्हा तो प्रयोग जवळजवळ साडे पाच तास चालला. सुरवातीची तीस ते पंचेचाळीस मिनिटे ‘ललितकलादर्श’ च्या षष्ट्यब्दिपूर्ती समारंभानिमित्त भाषणे वगैरे चालली होती. पण नाटकात शेवटपर्यंत प्रेक्षक खिळून राहिल्याचे दिसून आले. मात्र शेवटी निर्मात्यांना नाटकाची लांबी कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे नाटकातील काही उत्तम दृश्ये आणि तीन गाणी काढून टाकावी लागली.
जेव्हा ‘कट्यार’ चे शंभर प्रयोग झाले तेव्हा मला ‘कट्यार’साठी तारखा देणे अवघड बनू लागले, कारण माझ्या इतर नाटकांतही भूमिका सुरू होत्या. त्यावेळी सात ते आठ प्रसिद्ध नाटक कंपन्यांमध्ये काम करणारा मराठी रंगभूमीवरील मी एकमेव नट होतो.
एक दिवस मी दुसर्‍या एका नाटकाच्या दौर्‍यावरून घरी आलो, तर मला दिसले की वृत्तपत्रातील जाहिरातीत माझ्या ऐवजी अतुल ऊर्फ विद्याधर व्यास यांचे नाव देण्यात आले होते. मी दुखावलो. मला काढून टाकण्यात आले आहे हे मला सांगण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही याचा मला राग आला. मी पणशीकरांना असेही सांगितले होते की, माझ्याऐवजी मी सदाशिवच्या भूमिकेसाठी पर्याय देईन आणि जेव्हा जेव्हा मला जमेल तेव्हा मी ‘सदाशिव’ करीन. बहुधा मी माझ्या दीडशे रुपये नाईट या मानधनात वाढ मागितली म्हणून मला काढून टाकण्यात आले असावे. पण तरीही मला वाटते की त्यावर झालेला प्रचंड खर्च पाहिला तर पणशीकरांसाठी ती नफ्यातील नाट्यनिर्मिती नसावी. आमच्या बससोबत नेपथ्याचा ट्रकही दौर्‍यावर न्यावा लागत असे.
‘कट्यार’मधून मला वगळण्यात आले पण त्या नाटकाशी माझे नाते येथेच संपले नाही. कवी बॉंके बिहारीची भूमिका करणारे शंकर घाणेकर यांचे कोकणात एका नाटकाच्या दौर्‍यावर असताना निधन झाले. त्यांच्या जागी प्रकाश इनामदार याना आणावे लागले. पण चित्रपटात जाण्यासाठी त्यांनी नाटक सोडले. एक दिवस बसमध्ये प्रवासात मला फैय्याज भेटली. ती म्हणाली की पणशीकरांना मी बॉंकेबिहारीची भूमिका करावी असे वाटते आहे. मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. घरी गेल्यावर मी नाटकाची संहिता वाचायला घेतली, तेव्हा लक्षात आले की त्या पात्राचे सगळे संवाद मला पाठ आहेत. मग मी ती भूमिका स्वीकारली आणि ‘सदाशिव’च्या भूमिकेपेक्षा अधिक वेळा मी ती भूमिका साकारली.
‘कट्यार’ला मोठमोठा प्रेक्षकवर्ग लाभला. पं. रविशंकर, पं. भीमसेन जोशी, एस. डी. बर्मन, गायक हेमंतकुमार, दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी, संगीत दिग्दर्शक मदनमोहन, अभिनेता कन्हय्यालाल असे दिग्गज ते नाटक पाहायला येत. कन्हय्यालालनी मुंबईतील एकही प्रयोग चुकवला नाही. शंभरहून अधिक प्रयोग त्यांनी पाहिले होते. जोवर वसंतराव ‘खॉंसाहेब’ होते, तोवर म्हणजे १९८३ मध्ये त्यांचे निधन झाले तोपर्यंत हे नाटक चालले.
‘कट्यार’ ला प्रेक्षकांची पसंती लाभणार नाही असे सुरवातीला अनेकांना वाटत होते. काहींना त्याचे नावदेखील तेव्हाचे रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकरांनी लिहिल्यासारखे वाटे. पण ‘लागे कलेजवा कटार’ ह्या ठुमरीवरून ते नाव दिले गेले आहे हे कळताच त्यांची नाराजी दूर होई.
कोणत्याही नाटकाची नियती काय असेल हे सांगणे अवघड असते. यशस्वी ठरतील अशी वाटणारी नाटके पडतात आणि पडतील अशी वाटणारी ‘कट्यार’सारखी नाटके धो धो चालतात!…