आनंदी जीवनाचा मार्ग सांगणारे… गौतम बुद्ध

0
456

– सौ. आशा गेहलोत

आज जीवनातील हर प्रकारच्या वासनेच्या तांडवाला शांत आणि शमित करण्याचा एकमेव मार्ग आहे बुद्ध-मार्ग! आज विश्‍वाला पुन्हा एकदा युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि!!

परवा वैशाख शुक्ल पौर्णिमा होती- ज्याला ‘बुद्धपौर्णिमा’ या नावाने ओळखले जाते. त्याच दिवशी सगळं जग करुणा, शांती, अहिंसा, मित्रत्व, ज्ञानाचे अवतार गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव मनवतं. त्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळेच बौद्ध धर्मात त्या तिथीला फार महत्त्व आहे.
सगळ्या विश्‍वाला आपल्या अद्भुत दर्शनाने मार्गदर्शन करणार्‍या या महामानवाचा जन्म भारतभूमीवर झाला, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे पूर्ण जीवन दुःखाचा पूर्ण अंत आणि आत्मिक सुखाच्या शोधाला समर्पित होता. त्यांच्यानुसार इच्छा किंवा कामना हीच दुःखाचं मूळ कारण आहे. कामनामुक्त मनुष्यच सुखाच्या मार्गावर चालू शकतो. बुद्धांचं म्हणणं होतं की मनुष्य जे दुःख भोगतो आहे, त्याचे कारण अपूर्ण ज्ञान हेच आहे. अनुभवाने प्राप्त झालेल्या पूर्ण ज्ञानामुळेच तो दुःखांपासून मुक्त होऊ शकतो. म. बुद्धांच्या याच विचारांना आज जगातील करोडो लोक आपला आदर्श मानतात. भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात, प्रत्येक धर्माचा उद्देश मनुष्यमात्राची सेवा करणे हाच आहे. मानवतेचा हाच धडा म. बुद्धांनी नवीन पद्धतीने शिकवला.
म. बुद्धाचा जन्म नेपाळमध्ये कपिलवस्तुतील लुम्बिनी गावात इसवीसन पूर्व ५६३ व्या वर्षी झाला. त्यांचे नाव सिद्धार्थ होते. शाक्य वंशाचा राजा शुद्धोधन आणि राणी महामायेच्या पुत्राच्या रूपात सगळ्या सुख-सुविधा तर त्यांना विरासतीतच मिळाल्या होत्या. सिद्धार्थच्या जन्मकाळातच एका महान संन्याशाने अशी भविष्यवाणी केली होती की सिद्धार्थ एक तर महान सम्राट तरी बनेल किंवा एक महान संन्यासी! मात्र गौतम बुद्ध सम्राट बनण्यासाठी नाही तर मानवतेचा एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी या दुनियेत आले होते. राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थसाठी सगळ्या सुखसोयींची व्यवस्था केली होती. परंतु सिद्धार्थचे मन विलासी जीवन किंवा राज्यकारभारात कधीच रमले नाही. संसारातील दुःखांमुळेच त्याचं मन नेहमी उदास राहायचं. लहानपणापासूनच त्यांचं मन दयाळू होतं, करुणेने भरलेलं होतं.
घोड्यांच्या शर्यतीत जेव्हा घोडे खूप पळायचे आणि जेव्हा त्यांच्या तोंडातून फेस यायला लागायचा तेव्हा सिद्धार्थ ते थकले असतील असे समजून त्यांना आणखी पळवत नसे आणि जिंकता जिंकता शर्यत हारली तरी त्याचं त्याला दुःख होत नसे. खेळातही सिद्धार्थला हारणंच आवडत होतं. कारण कुणाला हरवणं आणि त्याचं दुःखी होणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. ‘मारणार्‍यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ’ ही म्हण सुद्धा त्याने लहानपणीच खरी करून दाखवली होती- जेव्हा त्याचा भाऊ देवदत्त याच्या बाणाने हंस पक्षी घायाळ झाला होता तेव्हा तो बाण काढून मलमपट्टी करून त्याने त्या पक्षाला वाचवले होते.
जगातील लोकांचे दुःख त्यांच्याच्याने बघवत नव्हते म्हणूनच जेव्हा त्यांनी रोगयुक्त शरीर, सुरकुत्यांनी भरलेलं वृद्ध शरीर, मृत शरीर आणि आनंदी संन्याशाला पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी यशोधरा, पुत्र राहूल आणि राज्याचा त्याग करून ते मनाच्या शांतीच्या शोधात घर सोडून निघाले. बराच शोध घेतल्यानंतरही त्यांना जीवन-मृत्युचे रहस्य तसेच सांसारिक दुःखाविषयी अनेक प्रश्‍न पडायला लागले. या प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी त्यांनी उग्र तपश्‍चर्या करण्यासाठी आपल्या मनाची तयारी केली. म्हणून गया येथे पोचल्यावर एका वटवृक्षाखाली त्यांनी सहा वर्षे कठोर तपश्‍चर्या केली, जेथे वैशाख पौर्णिमेलाच त्यांना साक्षात्कार झाला. तेव्हापासून या वटवृक्षाला ‘बोधिवृक्ष’ म्हणू लागले आणि त्या स्थानाला बोधिगया आणि याच दिवसापासून गोतमाला ‘गौतम बुद्ध’ संबोधायला लागलेत लोक. त्यानंतर त्यांनी वाराणसीच्या जवळ असलेल्या सारनाथ येथे पोहचून आपल्या ज्ञानाचा प्रचार-प्रसार सुरू केला. सफल-संपूर्ण जीवनासाठी अष्टांगमार्गाचे तर्कशुद्ध विश्‍लेषणसुद्धा त्यांनी इथेच केले. हा अष्टांगमार्ग आनंदी जीवनासाठी राजमार्ग ठरला. ते आठ तत्त्व आहेत… १. सम्यक् दृष्टी, २. सम्यक् संकल्प, ३. सम्यक् वाणी,
४. सम्यक् आचरण, ५. सम्यक् जीविका, ६. सम्यक् प्रयत्न,
७. सम्यक् स्मृती व ८. सम्यक् समाधी अर्थात एकाग्रता.
यातील प्रत्येक तत्त्व हे आनंदी जीवनासाठी एक अतुलनीय पुंजी आहे. फक्त मनुष्याने यांचे आचरण करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे. ज्ञानाचे केवढे मोठे भांडार आहे हे! जीवन जगण्यासाठी किती मोठं दर्शन आहे हे!
बालपणापासूनच जर आम्ही या सम्यक मार्गावर चालायला शिकलो तर राष्ट्रासाठी एक संकल्पित पिढी आम्हाला प्राप्त होईल. आज हे ज्ञान पुन्हा एकदा प्रत्येक बालक, प्रत्येक युवकापर्यंत पोहचवण्याची गरज आहे ज्यामुळे व्यक्तीच्या विकासाबरोबरच राष्ट्राचेही उत्थान होईल. भगवान बुद्धांनी आपल्या विलक्षण वाणीनेच या जीवन दर्शनाचे विश्‍लेषण केले. ते म्हणतात, ‘धर्म समजून घेण्यासाठी शास्त्राची नाही तर समज असण्याची आवश्यकता आहे. समजण्याच्या आधी त्यांनी कधी श्रद्धेसाठी आग्रह धरला नाही. किंवा त्यांनी असेही कधी म्हटले नाही की ‘जे मी म्हणतो आहे त्याच्यावर डोळे बंद करून विश्‍वास ठेवा’! ते म्हणतात, ‘विचार करा, समजून घ्या, विश्‍लेषण करा, अनुभव घ्या आणि मगच विश्‍वास ठेवा’. बौद्ध धर्माशिवाय जगात असलेल्या सगळ्या धर्मामध्ये श्रद्धा ही प्राथमिक आहे पण बुद्ध म्हणतात, अनुभव प्राथमिक आहे. अनुभवानेच विश्‍वास बसेल, श्रद्धा जडेल जी आजीवन टिकेल. अनुभवाशिवाय आस्था डगमगेल. त्यांच्या म्हणण्यानुसार अनुभवशून्य अध्यात्म म्हणजे कोरा शब्दजंजाळ आहे.
तुम्हा सगळ्यांना शोकमग्न त्या आर्ईची गोष्ट तर माहीतच असेल जी आपल्या मृत मुलाचे पार्थिव शरीर मांडीवर घेऊन भगवान बुद्धाकडे धावत आली. त्या शोकमग्न आईला भगवान बुद्धांनी कसं शांत केलं? तिला सांगितलं की अशा घरी जा की ज्या घरी आजपर्यंत कुणाचाच मृत्यू झाला नसेल आणि त्या घरून मोहरीचे काही दाणे घेऊन ये..! ती घर-घर हिंडली आणि शेवटी रिकाम्या हातानी परत आली. तेव्हा तिला कळलं की मृत्यूला कुणी टाळू शकत नाही, जो अटळ आहे. त्यामुळे त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे. नंतर संसाराचा त्याग करून ती बुद्धांना शरण आली.
अशीच गोष्ट आहे अंगुलीमालाची. मगध देशातील सारनपूर गावातील जनता अंगुलीमाल नावाच्या डाकूमुळे त्रस्त होती. भयभीत झाली होती. तो लुटायचा, हत्या करायचा आणि त्यांच्या बोटांच्या माळा बनवून गळ्यात घालायचा. पण गौतम बुद्ध अंगदी शांत होऊन त्याच्याकडे गेले. त्यांना मुळीच भीति वाटत नव्हती. अंगुलीमालाने त्यांना जेव्हा म्हटले, ‘‘थांबा, सगळं द्या जे काही तुमच्याजवळ आहे… ’’ बुद्धांनी एकाच वाक्यात सांगितलं, ‘‘मी तर केव्हापासून थांबलो आहे. तू केव्हा थांबशील?’’ ‘‘मला थांबता नाही येत. मी सर्वांत शक्तिशाली आहे. एकाच वेळेला कितीही लोकांना मारू शकतो’’.
‘‘तुमच्यामध्ये इतकी शक्ती असेल तर फक्त समोरच्या झाडाची दहा पाने तोडून आणा.’’ ‘‘बस, इतकी छोटी गोष्ट!’’ अंगुलीमालाने आणली दहा पानं तोडून. बुद्ध म्हणाले, ‘‘आता ही पानं जिथून तोडून आणली होती तिथेच पुन्हा जोडून दे.’’ अंगुलीमाल म्हणाला, ‘‘असंभव आहे हे.’’
मग शांत चित्ताने बुद्ध म्हणाले, ‘‘ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा काय अधिकार? जो जीवन देऊ शकत नाही त्याला मारण्याचा काय अधिकार!!’’ बस्, अंगुलीमालाला सर्वकाही समजून गेलं. तो पण बुद्धाला शरण आला. असे होते हे महात्मा!
भगवान बुद्धांनी आत्मविकासासाठी जो मंत्र दिला तो आहे – ‘अंतःदीपो भव’. ते म्हणतात, ‘‘आत्मविकासासाठी आत्मानुभूती आणि आत्मविश्‍वासाची खूप आवश्यकता आहे. याच्याच बळावर स्वतःसाठी स्वतःलाच प्रकाश निर्माण करावा लागेल. दुसर्‍याने दाखवलेल्या प्रकाशात मार्गक्रमण करणे कठीण आहे. आपल्या प्रकाशात उठलेलं भरवशाचं पाऊल बेभरवशाच्या हजारो पावलांपेक्षा वेगळं महत्त्व राखेल. बौद्ध धर्माचा खरा अर्थ आहे – स्वतःचा शोध आणि तोही आत्मदीपाच्या प्रकाशात!!
अजून एक गोष्ट ः प्रेम, करुणेने युक्त मैत्रीही बौद्ध धर्माची आधारशीला आहे. त्याच्यानुसार स्वर्ग आणि नरक याच पृथ्वीतलावर आहे. मैत्रीच्या भावात स्वर्ग आहे तर वैर भावात नरक. वैराने वैर कधीच संपत नसतं. आज असमानता, युद्ध, असहिष्णुतेच्या या युगात शांती, प्रेम आणि मैत्री भावाची नितांत गरज आहे.
आज जेव्हा की चारही बाजूंनी युद्ध, गृहयुद्ध, आतंकवादाचे तांडव चालू आहे, त्याच्या मूळाशी आपले वर्चस्व स्थापित करण्याची आकांक्षा आणि आपल्या देश किंवा समाजासाठी जास्तीत जास्त संसाधन जोडण्याची प्रतिस्पर्धाच आहे. म्हणून आज जीवनातील हर प्रकारच्या वासनेच्या तांडवाला शांत आणि शमित करण्याचा एकमेव मार्ग आहे बुद्ध-मार्ग! आज विश्‍वाला पुन्हा एकदा युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि!!