लढा कँसरशी…

0
150

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि धातूंना बल देणारी रसायनचिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यासारखे सात्विक रसायन आहार, शतावरी गोक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यासारखी रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन यांचे आचरण असावे.

कँसरची चिकित्सा –
कँसर हा व्याधी असाध्य, चिकित्सा करण्यास कठीण असला तरी रुग्णाची शेवटच्या क्षणापर्यंत चिकित्साही व्हायलाच हवी. विशिष्ट प्रकारच्या कँसरमध्ये विशिष्ट अशी चिकित्सा असते; तरी सुद्धा सर्व प्रकारच्या कँसरवर सामान्य चिकित्साही करावीच लागते. चिकित्सा करूनही त्याचा पुनरुद्भव होण्याची शक्यता अधिक असली तरीही आयुर्वेदीय चिकित्सेने कँसरवर नियंत्रण ठेवता येते.
दुष्ट व्रण – अर्बुदादिंचे कँसरशी साधर्म्य आहे. त्यामुळे दुष्ट व्रण – ग्रंथी – अर्बुदादी व्याधी निर्माण करणार्‍या प्रत्येक घटकाची चिकित्सा म्हणजे कॅन्सरची चिकित्सा होय.
कँसर निर्माण करणार्‍या दोषांचे बल व रुग्णाचे बल यानुसार कॅन्सरची चिकित्सा ४ प्रकारे करता येते.
शोधन चिकित्सा, शमन चिकित्सा, अनुषंगिक उपक्रम व रसायन चिकित्सा.
१. शोधन चिकित्सा ः या चिकित्सेत रुग्णाच्या शरीरातील वाढलेले व दुष्ट झालेले दोष शरीराबाहेर काढले जातात. शोधन चिकित्सेत वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण व नस्य या ५ कर्मांचा समावेश होतो. म्हणून यास पंचकर्म चिकित्सा म्हणतात. व्याधी निर्माण करणार्‍या दोषांची वृद्धी अधिक प्रमाणात असल्यास शोधन करावे.
शोधन चिकित्सा तीन टप्प्यात पूर्ण होते. पूर्वकर्म- स्नेहन, स्वेदन;
प्रधान कर्म- वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण, नस्य.
पश्‍चात कर्म- संसर्जनक्रम, विशिष्ट पथ्यकर आहार-विहार योजना.
पूर्वकर्म ः शोधन चिकित्सेने शरीराबाहेर काढायचे दोष जर संपूर्ण शरीरातून आमाशयात, ग्रहणीत किंवा पक्वाशयात आले असतील तर त्यांचे शोधन प्रक्रियेत सुलभतेने निर्हरण करता येते. यासाठी शोधनापूर्वी स्नेहन व स्वेदन हे दोन उपक्रम केले जातात. तसेच या उपक्रमांमुळे विशेषतः स्नेहनामुळे शरीरधातूंना बल प्राप्त होते व त्यामुळे शोधनानंतर निर्माण होणारे दौर्बल्य व वातप्रकोप यांना प्रतिबंध केला जातो.
स्नेहन ः स्नेहनाचे बाह्य स्नेहन व आभ्यंतर स्नेहन असे दोन प्रकार आहेत.
बाह्य स्नेहन ः यात तूप, तेल, वसा, मज्जा यापैकी कोणत्याही एका स्नेहाने किंवा सिद्ध तेलाने अथवा सिद्ध तुपाने संपूर्ण शरीरास मालीश केले जाते. यास बाह्य स्नेहन म्हणतात.
आभ्यंतर स्नेहन ः ३ ते ७ दिवसांपर्यंत योग्य स्नेहनाची लक्षणे निर्माण होईपर्यंत रोज प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी विशिष्ट मात्रेत स्नेह सेवनास द्यावा. स्नेहाचे प्रमाण प्रतिदिवशी विशिष्ट प्रमाणात वाढविले जाते. स्नेह सेवन केल्यानंतर उत्तम भूक लागेपर्यंत काहीही अन्नसेवन केले जात नाही. त्वचा स्निग्ध होणे, स्नेहाचा द्वेष निर्माण होणे, मलप्रवृत्ती स्निग्ध व शिथिल होणे ही योग्य स्नेहन झाल्याची प्रमुख लक्षणे आहेत.
स्वेदन ः स्नेहनाबरोबर प्रत्येक दिवशी रुग्णाच्या संपूर्ण शरीरास औषधी काढ्याच्या वाफेने पेटीस्वेद देतात. योग्य स्नेहनाची लक्षणे दिसल्यावर वमनापूर्वी १ दिवस व विरेचनापूर्वी २ दिवस केवळ बाह्य स्नेहन व स्वेदन करावे.
प्रधान कार्य ः
* वमन – वामक औषधांची चूर्णे किंवा काढे देऊन रुग्णास उलटी करविणे म्हणजे वमन होय.
* विरेचन – रेचक औषधे देऊन पित्ताशयातील दोष गुदमार्गाने बाहेर काढणे म्हणजे विरेचन होय.
* बस्ति – औषधी तेल/तूप किंवा औषधी काढे गुदमार्गाने देणे याला बस्ति म्हणतात.
* रक्तमोक्षण – जलौका किंवा सिरेचा वेध करून रक्तमोक्षण केले जाते.
* नस्य – नाकपुड्यांतून औषधी तेले/तूप प्रविष्ट करणे यास नस्य म्हणतात.
वरील पाच कर्मांपैकी ज्या व्याधीत जे कर्म आवश्यक आहे ते केले जाते.
पश्‍चात्‌कर्म –
यालाच संसर्जनक्रम म्हणतात. शोधन चिकित्सेनंतर जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे रुग्णांना पूर्ण आहार दिल्यास अपचन होते. म्हणून सुरुवातीला पचनास हलकी अशी पेज देतात. त्यानंतर क्रमाक्रमाने घट्ट पेज, द्विदल धान्याचे कढण, मांसरस असा गुरु आहार देत शेवटी पूर्ण आहारास सुरुवात करतात.
कँसरमध्ये कोणत्या व्याधीत कोणता शोधन उपक्रम आचरावा यासाठी पुढील तत्त्व उपयुक्त आहे.
ज्या स्थानी/अवयवात दुष्ट व्रण – ग्रंथी- अर्बुदादी निर्माण झाले असतील त्यांच्या जवळच्या मार्गाने दोषांचे शोधन करावे. उदा. मस्तिष्कगम दुष्ट अर्बुदाम – शोधन नस्य, आमाशयगम दुष्ट अर्बुदात – वमन, गुदगम दुष्ट अर्बुदात- बस्ति चिकित्सा द्यावी.
सामान्यतः मस्तिष्क , घसा, फुफ्फुस, आमाशय, त्वचेचा कॅन्सर, हॉजकिंग्ज लिंफोमा यात वमन; आमाशय, ग्रहणी, लघ्वन्त्र, पित्ताशय, यकृताचा कॅन्सर, ल्युकेमिया यात विरेचन; मस्तिष्क, बृहदान्त्र, गुद, प्रोस्टेट, पुरुष बीजाण्ड, योनि, गर्भाशय, स्त्री बीजाण्ड, अस्थि यांच्या कॅन्सरमध्ये बस्ति; मस्तिष्क, नासा, तालु यांच्या कॅन्सरमध्ये नस्य व यकृत, पित्ताशयाचा कॅन्सर, ल्युकेमिया यांत रक्तमोक्षण करावे. कॅन्सर या व्याधीमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, शस्त्रकर्म या आधुनिक उपचारांमुळे बरेच कॅन्सरग्रस्त रुग्ण दुर्बल झालेले असतात. त्यामुळे रुग्णाच्या बलाचा विचार करून वैद्याच्या देखरेखीखालीच शोधनोपक्रम करावेत.
पंचकर्म चिकित्सेनंतर या रुग्णांचे पचन सुधारते, थकवा दूर होतो, शारीरिक व मानसिक बल वाढते, पर्यायाने प्रतिकारशक्ती वाढते, ज्यायोगे कॅन्सरचा पुनरुद्भव आटोक्यात आणणे शक्य होते.
शमन चिकित्सा – कँसर व्याधीमध्ये रुग्ण दुर्बल झाला असल्यास शोधन चिकित्सा देता येत नाही. अशा वेळी रुग्णास शमन चिकित्सा देणे आवश्यक ठरते. सारिवा, त्रिफळा, गोक्षुर यांसारखी एकेरी चूर्णे, हिंग्वाष्टक चूर्ण, सितोपलादि चूर्ण, सूक्ष्म त्रिफळा, आरोग्यवर्धिनीसारख्या गुटी, वटी, कुमारी आसवांसारखी आसवारिष्टे, त्रिफळा, गुग्गुळ, कांचनीदि गुग्गुळ यासारखे गुग्गुळ कल्प, षंडगोदकासारखी सिद्ध जल, गुडूचि सिद्ध दुग्ध, शतावरी कल्प, निंब तेल, यष्टीमधु तेल, यष्टीमधु घृत, अशी सिद्ध घृत व तैल, बाह्यप्रयोगासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बदाम तेल, शोथहर लेप, चंदन लेप यांचा वापर कॅन्सरच्या प्रकार व अवस्थांनुसार करावा.
अनुषंगिक उपक्रम ः
शिरोधारा व शिरोबस्ति –
* मस्तिष्काच्या कॅन्सरमध्ये कपाळावर औषधी काढे, औषधांनी सिद्ध तेल-तूप यांची उष्ण धारा अभिषेक पात्रातून सोडली जाते. याला शिरोधारा म्हणतात.
* चामड्याची टोपी डोक्यावर धारण करून त्यात औषधी तेले/तूप डोक्यावर धारण करणे याला शिरोबस्ति म्हणतात.
* औषधांनी सिद्ध तूप/तेलात कापसाचा पिचू बुडवून डोक्यावर धारण करणे म्हणजे शिरोपिचु व याच तूप/तेलाने डोक्यास मालीश करणे.
* नेत्रबस्ति –
विशेषतः डोळ्याच्या कॅन्सरमध्ये या उपक्रमाचा उपयोग होतो. डोळ्याभोवती उडदाच्या पीठाचे आळे तयार करून त्यात त्या त्या व्याधीस योग्य अशा औषधी द्रव्यांचा काढा, दूध, तेल, तूप डोळ्यांवर धारण करणे.
* योनिपिचू –
विशेषतः योनि व योनिमुखाच्या कॅन्सरमध्ये स्थानिक व्रण, दुर्गंध, स्राव यासाठी औषधी सिद्ध तेल/तुपात बुडवलेल्या कापसाचा बोळा योनिप्रदेशी धारण केला जातो.
* योनिधावन –
योनि व योनिमुखाच्या कॅन्सरमध्ये औषधी काढ्यांनी योनिप्रदेशाचे धावन केले जाते.
* अवगाह स्वेद –
नाभीच्या खालील भागातील कॅन्सरमध्ये विशेषतः गर्भाशय, योनी, गर्भाशयमुख, बस्ति, प्रोस्टेट ग्रंथी यासारख्या अवयवांच्या कॅन्सरमध्ये रुग्णाला टबमध्ये किंचित उष्ण औषधी काढा घालून त्यात बसविले जाते.
लेप – कॅन्सरमुळे विशिष्ट स्थानात वेदना असल्यास औषधांचा स्थानिक लेपही उपयुक्त ठरतो.
गंडुष – तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरमध्ये गिळताना त्रास होत असल्यास कढत दूध, किंचित उष्ण जल यासारख्या द्रव्यांच्या गुळण्या केल्यास स्थानिक व्रण, कफ कमी होण्यास मदत होते.
अवचूर्णन – कॅन्सरमधील व्रणातून दुर्गंधी- पूयुक्त स्राव, रक्तस्राव होत असल्यास हळद, कडुनिंब यांसारख्या चूर्णांचे अवचूर्णन केले जाते.
* रसायन चिकित्सा
कँसरमध्ये रसादि सात धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि धातूंना बल देणारी रसायनचिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यासारखे सात्विक रसायन आहार, शतावरी गोक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यासारखी रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन यांचे आचरण असावे.